अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०९-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌कलानगरीतील कुशल दिग्दर्शक



तब्बल पाच दशके चित्र-नाट्य प्रवास करणारे कोल्हापूरचे कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचा आज ३३वा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या कन्या जयश्री दानवे यांनी त्यांचे केलेले हे स्मरणरंजन.

——

ज्यांचा उमेदीचा काळ कोल्हापुरात गेला आणि ज्यांनी कोल्हापूरच्या नाट्यकलेची धुरा यशस्वीपणे सांभाळली असे मराठी रंगभूमीचे दिग्दर्शक व कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे. त्यांनी रुपेरी पडदाही आपल्या खलनायकी अभिनयाने गाजवला. पुण्यात जन्माला आलेल्या जयशंकरजींनी सिनेमा-नाटकाच्या वेडापायी घरादारावर तुळशीपत्र ठेवले आणि त्यांना सावलीचे झाड भेटले बेंजामिन साहेबांच्या रूपाने. त्यांच्यामुळे हिंदी उर्दूवर प्रभुत्व गाजवलेले जयशंकरजी रुस्तुम मोदी यांच्या ‘आर्य सुबोध’ नाटक कंपनीत दाखल झाले. त्याकाळात या कंपनीची एका महिन्याला २०-२० वेगवेगळी हिंदी-उर्दू-मराठी नाटके सादर होत.त्यात विविध भूमिका पार पाडत असताना त्यांना दिग्दर्शनाची हातोटी गवसली.

महाराष्ट्रात जशी बालगंधर्वांची ख्याती होती तशीच प्रसिद्धी महाराष्ट्राबाहेर हैद्राबाद, मद्रास येथे दानवेंना लाभली. त्यांच्या नाटकांची छायाचित्रे बाजारात विक्रीला असत.पण कंपनी बंद पडल्याने आणि चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांच्या बोलावण्याने ते कोल्हापूरला आले आणि हिंदी-उर्दू रंगभूमीवरचा त्यांचा हा प्रवास थांबला. आपल्या कोल्हापुरातील रांगड्या मातीत ते मूकपटापासून बोलपटापर्यंत रमले. सरस्वती सिनेटोन,शालिनी सिनेटोन येथे प्रथम नायक म्हणून त्यांनी हजेरी लावली. बाबुराव पेंटर सारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली हा प्रवास सुरु झाला.‘सावकारी पाश’ या पहिल्या मराठी बोलपटात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.त्यानंतर ‘उषा’, ‘प्रतिभा’, ‘गोपीचंद’, ‘माझी लाडकी’, ‘भगवा झेंडा’, ‘देवयानी’, ‘नारद नारदी’ अशा अनेक चित्रपटानंतर भालजी पेंढारकरांच्या दिग्दर्शनाखाली ‘संत कान्होपात्रा’ या चित्रपटात नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर या खलनायकाचे हस्तक म्हणून त्यांनी प्रथमच खलनायकी भूमिका साकारली आणि मग ही खलनायकी भूमिका त्यांना चिकटली. बाबांच्या ‘मीठभाकर’ चित्रपटातील सुंदरराव सातपुते हा खलनायक आजही जुनी जाणते लोक स्मरतात. त्यांनी ‘बहिर्जी नाईक’, ‘थोरातांची कमळा’, ‘सासुरवास’, ‘सूनबाई’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘मोहित्यांची मंजुळा’ या सारख्या जयप्रभा स्टुडीओतील चित्रपटाव्यतिरिक्त ‘भाव तेथे देव’, ‘गावची इज्जत’, ‘वरदक्षिणा’, ‘सुभद्राहरण’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘धनंजय’, ‘फकीरा’, ‘कोर्टाची पायरी’, ‘सुरंगा म्हणत्यात मला’, ‘लाखात अशी देखणी’, ‘एक माती अनेक नाती’, ‘रंगू बाजारला जाते’, ‘डोंगरची मैना’, सख्या सजणा’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘आम्ही जातो आमुच्या गावी ’ अशा दिनकर द.पाटील, अनंत माने, होमी वाडिया, कमलाकर तोरणे या दिग्दर्शकांच्या चित्रपटातूनही दर्जेदार खलनायक साकारला. त्यांचे शेवटचे दोन चित्रपट दादा कोंडके दिग्दर्शित ‘आंधळा मारतो डोळा’ आणि प्रभाकर पेंढारकरांचा ‘प्रीत तुझी माझी’. त्यांनी एकूण ६७ चित्रपटात अभिनय केला.

प्रत्येक नाटक वा सिनेमात खलनायकाचे विविध पैलू साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हा खलनायकी रोल सांभाळतानाच त्यांनी जयप्रभा स्टुडिओत भालजींचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरु केला. जयप्रभा स्टुडिओमध्ये कोणताही कलाकार प्रथम जयशंकरजींच्याकडे तालमी करत असे आणि मग त्याला भालजींच्या समोर उभे केले जात होते हा त्यावेळचा शिरस्ता होता.म्हणूनच सुलोचना, रमेश देव, चंद्रकांत, सूर्यकांत, शांता जोग, राजशेखर, गणपत पाटील, रत्नमाला हे त्यावेळचे नवखे कलाकार प्रथम जयशंकर दानवेंच्या तालमीत तयार झाले.

१९४६ साली जयप्रभा स्टुडीओतील हिंदी ‘वाल्मिकी’ चित्रपटासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमन राजकपूर यांना प्रथम अभिनय शिकवण्याची संधी त्यामुळेच जयशंकरजींना मिळाली.राजकपूर घडले ते प्रथम त्यांच्या दिग्दर्शनाखाली.त्यांनी निळ्या डोळ्यांचा नारद उभा करण्यासाठी राजना नारदाचे भजनातील हातवारे,वीणा चिपळ्यांचा तालनाद,चेहऱ्यावरील हास्य या सर्व गोष्टी इतक्या पद्धतशीर शिकवल्या की,स्वत: पृथ्वीराज कपूर आणि भालजीबाबासुद्धा राजना ओळखू शकले नाहीत. तसेच सुलोचनादीदी सारख्या दिग्गज अभिनेत्रीला पहिला अभिनयाचा पाठ त्यांनीच दिला.

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जयभवानी’ चित्रपटात दीदींचा नायिका म्हणून प्रथम रुपेरी पडद्यावर प्रवास सुरु झाला. त्याआधी ‘करीन ती पूर्व’ या नाटकातून त्यांनी दीदींना रंगभूमीवरही प्रथम आणले.गणपत पाटील यांना नाच्याच्या भूमिकेसाठी निवडताना जयशंकरजींनी ‘ऐका हो ऐका’ या नाटकात प्रथम नाच्याची पहिली टाळी शिकवली आणि राजशेखरना आपल्या खलनायकी अभिनयाचा साथीदार करून घेतले.हिंदी व मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील महान कलाकार विक्रम गोखले यांना रंगभूमीवर ‘रायगड गातो शंभू गाथा’ या नाटकात अभिनय शिकवून प्रथम संधी दिली.

चित्रप्रवास सुरु असतानाच त्यांनी कोल्हापूरातील देवल क्लब, करवीर वाचन मंदिर, करवीर भगिनी मंडळ, मेडिकल असोसिएशन, शुगरमिल-जीवन कल्याण अशा संस्थांची दर्जेदार नाटके दिग्दर्शित करून अनेक कलाकारानाच नाही तर अनेक मध्यमवर्गीयांनाही रंगमंचासाठी सक्षम बनविले. तसेच विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनीना सुद्धा पद्माराजे हायस्कूल, न्यू हायस्कूल ,विवेकानंद कॉलेज अशा संस्थाच्या माध्यमातून नाटकात अभिनय करण्यास प्रवृत्त केले.आज अनेक त्यांचे विद्यार्थी अन शिष्य सिने-नाट्य क्षेत्रात कार्यरत असून आपल्या या गुरूविषयी भरभरून बोलतात.आयुष्यभर अभिनयकलेची व्रतस्थपणे सेवा करून कलानगरीतील नाट्य वारसा त्यांनी जिवंत ठेवला,चालता बोलता ठेवला हे त्यांचे योगदान स्मरणीय तर आहेच पण वाखाणण्याजोगेही आहे. त्यांनी जवळजवळ १३४ नाटकांतून व त्यांच्या असंख्य प्रयोगातून अभिनयाचा वारसा जपला.

– जयश्री जयशंकर दानवे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया