हे’ प्रोजेक्ट आयुष्यभर लक्षात राहणारं
——
बऱ्याच जणांची ही गोष्ट असते की मनात एक ठरलेलं असतं आणि प्रत्यक्षात वेगळंच करायला लागतं. ती गोष्ट करताना बहुतेकांचा प्रवास नकारात्मकतेच्या दिशेनं होतो. मला खरं तर ते करायचं होतं यार, पण नाही करता आलं, अशी खंत अनेक जण व्यक्त करताना पाहायला मिळतात. पण हे नाही करता आलं असं म्हणतानाही खूप काही मिळालं असं सांगणाऱ्या मुलीची कथा ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटामधून मांडण्यात आली आहे. नकारात्मकतेमधील सकारात्मकतेचा मुद्दा मला खूप आवडला. मधला एक काळ असा होता की माझ्या कारकीर्दीत फक्त लग्न आणि लग्नाच्या आसपासच्या गोष्टी अशाच प्रकारचे सिनेमे माझ्याकडे येत होते. मग तो मंगलाष्टक वन्स मोअर असेल, लग्न पाहावं करून असेल. मी आत्ता केलेल्या चित्रपटाचं नाव ‘वेडिंगचा शिनेमा’ असं असलं तरी त्यात माझ्या लग्नाची गोष्ट दाखविण्यात आलेली नाही. पण मी या लग्नाची साक्षीदार आहे. या लग्नाची मजा अशी आहे की ते दोन अत्यंत वेगळ्या कुटुंबात होतं. दोन माणसांचं लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं लग्न असतं, हे घासूनपुसून गुळगुळीत झालेलं वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे. परंतु, ते या चित्रपटात प्रत्यक्ष पाहायला मिळतं.
दिग्दर्शक सलिल कुलकर्णीचा हा पहिलाच चित्रपट असला तरी त्याला आपल्या कलाकारांकडून नेमकं काय हवंय हे पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे आपण घेतलेला शॉट परत घ्यायचा की आहे तोच राहू द्यायचा याबद्दलचा गोंधळ त्याच्या मनात अजिबात नव्हता. आम्ही कलावंतांनी त्याला एखादी गोष्ट सुचवली तर तो तिचं स्वागतच करायचा. परंतु, त्याच्या मनात जे काही असेल ते तो ठामपणे करायचा. थोडक्यात दिग्दर्शकाला आपल्या कामाबाबत ‘क्लॅरिटी’ असेल तर मग कलाकारांना आपापल्या भूमिका चोख बजावणं सोपं जातं. तसं सलिलबरोबर काम करताना वाटलं. तो संवेदनशील तर आहेच. गीतकार, गायक, लेखक, संगीतकारही आहे. परंतु, दिग्दर्शकाची भूमिका ही एखाद्या कुटुंबप्रमुखासारखी असते. ही भूमिका त्यानं खूप छान पद्धतीनं निभावली आहे असं मी म्हणेन.
या सिनेमात आम्ही कलावंत मंडळी खूप ‘रिअल झोन’मध्ये वावरलो आहे. त्यामुळे कोणत्याही कलाकाराला आपल्या अभिनयाबाबत काही वेगळं ‘बेअरिंग’ घ्यावं लागलं नाही. आम्हा सगळ्या कलाकारांचं परस्परांबरोबरील ‘ट्युनिंग’ खूप झालं. अलकाताई असेल, अश्विनी असेल, ऋचा किंवा प्राजक्ता हणमघर असेल, प्राजक्ता तर माझी खूप जुनी मैत्रीण आहे. आयुष्यभर लक्षात राहावं असं हे प्रोजेक्ट आहे. सुनील बर्वे खऱ्या आयुष्यात माझा काका आहे. परंतु, आम्ही आजवर कधीही एकत्र काम केलं नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदाच एकत्र काम करताना खूप मजा आली. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकार एकत्र आल्यामुळे खूप वेगवेगळे अनुभव, गमतीजमती आमच्या वाट्याला आल्या. ‘कास्टिंग’ला मदत करायला मला आवडते. सुदैवानं आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत खूप चांगले चांगले कलाकार काम करतात. पण योग्य कास्टिंग झाली तर खूप मजा येते. त्यामुळे कोणत्याही चित्रपटाची गोष्ट ऐकताना मी दिग्दर्शकांना मला वाटते तशी नावं मी त्यांना सांगत जाते. त्यामुळे या चित्रपटासाठी काही नावं मी सलिलला हक्कानं सुचवली. त्यानुसार काही कलाकारांशी त्यानं संपर्क साधला. त्यांनाही आपापल्या भूमिका आवडल्या. त्यांच्याकडे वेळ होता नि सगळं काही जुळून आलं.
– मुक्ता बर्वे
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया