अतिथी कट्टा

दिनांक : २७-१०-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…


चित्रपट क्षेत्राशी कसलाही संबंध नसताना गावाकडे वाढलेल्या एका मध्यमवर्गीय घरातल्या मुलानं चित्रपट दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड कष्ट घेतले. या कष्टपूर्तीचा प्रवास असलेला ‘पाटील’ हा चित्रपट घेऊन दिग्दर्शक संतोष मिजगर हे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.

——

अगदी लहानपणापासून मला सिनेमाची आवड. आवड नव्हे वेडच म्हणा ना. एक वेळ मला जेवण नाही मिळालं तरी चालायचं. परंतु, चित्रपट पाहायला नाही तर मला काहीच करमायचं नाही. मला आठवतंय, तिसरी की चौथीत असताना माझ्या बाबांनी मला निवगीच्या (जि. नांदेड) यात्रेमध्ये नेलं होतं. तिथं पाहिलेला पहिला सिनेमा अजूनही माझ्या लक्षात आहे. ‘जय बजरंगबली’ असं त्या सिनेमाचं नाव. पडद्यावर हलणारी चित्रं पाहून तेव्हा माझा विश्वास बसायचा नाही. याच सुमारास दुसर्‍याच्या घरी जाऊन मी टीव्हीवर सिनेमे पाहायचो. गंमत म्हणजे ज्याच्या घरी सिनेमे बघायचो, त्याच्या घरी पडेल ती कामंही मी करायचो. काही करून आपण चित्रपट पाहिले पाहिजेत एवढंच मला वाटायचं.

चौथीत असताना मी निवग्याला शिकण्यासाठी आलो. तिथं एक टुरिंग टॉकीज होतं. तेव्हा बाबा मला वह्या, पेन, पुस्तकांसाठी पैसे द्यायचे. या पैशांमधून जे काही उरायचं त्यामधून मी चित्रपट पाहायचो. या टुरिंग टॉकीजमुळे मला सिनेमाची गोडी लागली. त्यात भर पडली ती आमच्या घराशेजारीच असलेल्या एका व्हिडीओ पार्लरमुळे. तिथं असलेल्या पांडुमामांबरोबर माझी ओळख झाली. खरं तर एवढ्या लहान वयात मीच ते व्हिडीओ पार्लर चालवायचो. १२, ३, ६, ९ अशा चार खेळांमध्ये व्हिडीओ कॅसेट्सद्वारे चित्रपट दाखवायचो. शाळा सुरू असताना मास्तर ङ्गळ्यावर काहीतरी लिहीत असले तरी मला त्यावर चित्रपटच दिसायचा. ते जे शिकवायचे, ते सगळं माझ्या डोक्यावरून जायचं. चित्रपट माध्यमाचा एवढा मोठा पगडा त्या काळात माझ्यावर होता. शाहरुख खान-दिव्या भारतीचा ‘दीवाना’ हा चित्रपट मला खूप आवडायचा. तो १५-२० वेळा मी बघितला असावा. जवळपास पाच वर्षं मी व्हिडीओ पार्लरचं काम बघितलं नि शेकडो चित्रपटही बघितले. १९९१ ते १९९५ या काळामधील सर्व हिंदी-मराठी चित्रपट मी त्या काळात अनेकदा पाहिलेले आहेत. दहावीत असताना मी थिएटरमध्ये ‘शिवमहिमा’ हा चित्रपट पाहिला. तो पाहिल्यानंतर मला या माध्यमात आणखीनच रस वाटू लागला. याच वेळी मला शाळेच्या लेझिमच्या पथकातून काढून टाकण्यात आलं. तेव्हा या चित्रपटामधील ‘आया बाबा का त्योहार’ या गाण्याच्या पगड्यातून मी लेझिम वादनाची एकट्यानंच तयारी केली. शाळेच्या वर्गातच मला नाकारणार्‍या सरांसमोर मी लेझिम वाजवून दाखवलं. ते ऐकून नि पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हेच गाणं मी पुढं शाळेच्या कार्यक्रमात सादर केलं. माझ्यातील दिग्दर्शक मला सापडण्याचा तो पहिला प्रसंग होता. त्यानंतर एक नाटकही मी केलं. त्यात एका भिकार्‍याची भूमिका मी केली होती. अशा पद्धतीनं चित्रपट माध्यमाबरोबरची माझी नाळ पुढं जोडली गेली. दहावी झाल्यावर ‘दिलवाले’, ‘हम आपके है कौन’, ‘माहेरची साडी’ यासारखे अनेक चित्रपट पाहिले. या चित्रपटांमधील चुका मला पाहताना समजायच्या. त्या कशा टाळता आल्या असता यावरही मी विचार करायचो. थोडक्यात, मी अकरावी-बारावीला असतानाच माझ्यातील दिग्दर्शक तयार झाला होता. परंतु, त्याला संधी द्यायला कोणी तयार नव्हतं.

गावात असताना चित्रपट माध्यमाकडे पाहणार्‍यांचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोण ङ्गारसा चांगला नव्हता. त्यामुळे तिथं चित्रपटात आपलं करियर करायचं हे सांगण्याचीही सोय नव्हती. उच्च शिक्षणासाठी मी नांदेडला आलो. इथं तर भरपूर चित्रपटगृहे होती. जत्रेत गेल्यानंतर तिथली असंख्य खेळणी पाहून लहान मुलाला जसा आनंद व्हावा, तसा आनंद मला नांदेडमधील चित्रपटगृहं पाहून झाला होता. इथं मी अवघ्या ३५ दिवसांमध्ये १०० चित्रपट पाहिले होते. पुढे मी ‘आयटीआय’चं शिक्षण घेतलं. आयुष्यानं असं वळण घेतलं की मी नोकरीसाठी महाराष्ट्रातून बाहेर पडलो. परंतु, तिथल्या नोकरीत माझं काही मन रमलं नाही. तिथं असतानाही मला आपला स्वत:चा चित्रपट बनला पाहिजे असं सतत वाटत राहायचं.

तेव्हा मग मी निर्णय घेतला की आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपण मुंबई गाठायची. त्याच वेळेला माझ्या आईचा मेंदूचा आजार उद्भवला. त्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक होती. ती वाचेल की नाही हे सांगता येत नव्हतं. तेव्हा मी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की मला आयुष्यात खूप मोठं बनायचंय. त्यानुसार मी बनलो तर माझं कौतुक नंतर बघायला माझी आई मला माझ्यासोबत हवी आहे. माझं हे बोलणं ऐकून डॉक्टरही हेलावले. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं नि माझी आई या आजारातून सहीसलामत बाहेर पडली.

हा काळ होता २००२-२००३चा. मुंबईत त्यावेळी मी गोरेगावच्या चित्रनगरीला भेट द्यायचो. परंतु, माझी काहीच ओळख नसल्यामुळे मला तिथले सुरक्षारक्षक आत सोडायचे नाहीत. तब्बल तीन वेळा त्यांनी मला तिथून हाकलूनही दिलं. तेव्हा मी असा निश्चय केला की, भविष्यात अशी वेळ येईल की लोक मलाच विचारून चित्रनगरीत दाखल होतील. आज योगायोगानं चित्रनगरीची ‘ङ्गिल्म टूर’ काढण्याचं कंत्राट माझ्याच कंपनीला मिळालं असून ज्या प्रवेशद्वारावरून मला परत पाठविण्यात आलं होतं, त्याच्या बाजूलाच माझ्या कंपनीचं कार्यालय आहे. माझ्या मते स्वप्नं पाहायला पैसे लागत नाहीत, तसेच स्वप्नपूर्तीसाठीदेखील पैसे लागत नाहीत. लागते ती ङ्गक्त मेहनत. तिथून मग माझा चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू झाला. ‘बालाजी टेलिङ्गिल्म्स’ तसेच इतर काही कंपन्यांमध्ये मी छोटी-मोठी कामं करू लागलो. एवढी कामं केली की आज मला आठवतही नाही की मी कुठं कुठं गेलो ते. सध्या अंधेरीमध्ये जिथं माझं कार्यालय आहे, तिथं मी काही काळ ‘नाईट वॉचमन’ म्हणूनही काम केलं आहे. थोडक्यात प्रचंड ‘स्ट्रगल’ केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की चित्रपटाचा दिग्दर्शक बनणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुख्य म्हणजे आपण केलेल्या चित्रपटावर पैसे कोण लावणार… तेव्हा आपलं स्वत:चं काहीतरी भांडवल हवं हे माझ्या लक्षात आलं. त्यानुसार मग मी एक ‘मल्टीलिंक’ नावाची ट्रॅव्हल कंपनी सुरू केली. त्यात थोडा जम बसल्यावर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. ‘मल्टिलिंक’ची सुरुवातीला माझी एजन्सी होती. आता तिचा मी एक भागीदारदेखील बनलो आहे. ‘स्टारक्राफ्ट’ या इव्हेंट कंपनीद्वारे देशभर वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या आयोजनात माझा सहभाग होता. यामध्ये खासगी इव्हेंट्सबरोबर सरकारी कार्यक्रमांचाही समावेश होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीचं काम केलं. तेव्हा श्रीकांत भारती या मोठ्या व्यक्तिमत्त्वाशी माझी ओळख झाली. त्यावेळी मी पहिल्यांदा ‘पाटील’ या चित्रपटाच्या विषयाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना तो आवडला नि त्यांनी मला माझा पहिला चित्रपट करण्यासाठी प्रोत्साहित केलं. चित्रपटनिर्मितीसाठी थोडंङ्गार भांडवल जमवलं. परंतु, संकटं आली की एकटी येत नाहीत. ज्या दिवशी चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं, त्याच दिवशी नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यातून मग नवीन समस्या उभ्या राहिल्या. परंतु, त्यावरही मार्ग काढला. काही मित्रांनी पाठिंबा दिला. नांदेडला टीमला घेऊन गेलो नि शूटिंग सुरू झालं. या चित्रपटाचे जवळपास वीस व्यक्ती निर्मात्या आहेत.

या चित्रपटाची कथा-पटकथा नि संवाद मी अवघ्या पाच दिवसांमध्ये लिहिले. कारण विषयाचा ‘ग्राङ्ग’ बरीच वर्षं माझ्या डोक्यात होता. आई-वडिलांच्या सुखासाठी जी मुलं धडपडतात, त्यांना आपल्या आयुष्यात काहीच समस्या येणार नाहीत, हे मी या चित्रपटातून दाखवलं आहे. बर्‍याच अंशी मी स्वत:च या विषयाचा एक भाग आहे. पाटील या व्यक्तिरेखेसाठी मी काही कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या. परंतु, त्या मला काही पसंत पडल्या नाहीत. एके दिवशी मीच स्वत: आरशासमोर उभा राहिलो आणि मलाच माझ्यात चित्रपटातील ‘पाटील’ दिसला. इतकी वर्षं लोकांच्या मनात रुजलेला पाटील मला अपेक्षित नव्हता. बदलत्या काळातील पाटील मला रंगवायचा होता. मी माझ्या सहाय्यकांना माझं काम दाखवलं. त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं. तेव्हा मला असा प्रश्न पडला की, मी कॅमेर्‍याच्या समोर असताना मला माझ्या कामाबाबत प्रतिक्रिया देणारी कोणीतरी तटस्थ नि जाणकार व्यक्ती हवी. मग मी त्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांची मदत घेतली. त्यांनी या चित्रपटात एक भूमिकाही साकारली आहे. त्यांची मला खूप मदत झाली. माझ्याकडून चांगलं कामही त्यांनी करवून घेतलं. या चित्रपटाला आनंद-मिलिंद, उदय देवराज यांनी संगीत दिलं आहे. आमचं गाव नि नांदेड परिसरात शूटिंग केलं. या चित्रपटात फक्त दोन-तीनच असे कलाकार आहेत की ज्यांनी यापूर्वी काम केलं आहे. बाकी सगळे गावातले कलाकार आहेत. ज्या व्यक्तिरेखा ज्या हुद्यावर आहेत, त्याच व्यक्ती मी कलाकार म्हणून घेतले. त्यामुळे माझ्या या चित्रपटात तीन ‘आयएएस’ अधिकारी पाहायला मिळतील. या चित्रपटात ‘झी नेटवर्क’चे सुभाष चंद्राजी यांनीही काम केलं आहे. ‘पाटील’चं प्रदर्शनही धडाक्यात करणार आहोत. या चित्रपटानंतर पुढच्या चित्रपटाची लगेचच सुरुवात होईल. जवळपास माझ्याकडे दहा ‘स्क्रीप्ट्स’ शूटिंगच्या दृष्टीनं पूर्णत: तयार आहेत. माझा जन्मच सिनेमासाठी झाला आहे. माझं ध्येय चांगला ‘फिल्ममेकर’ बनणं हेच आहे. मला लोकांसाठी बरंच काही करायचं आहे. आई-वडिलांच्या अपुर्‍या सामाजिक इच्छा पूर्ण करायच्या आहेत.

– संतोष मिजगर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  अभिनव बेनोदेकर

  जयशंकर दानवे यांच्या अतिथिकट्ट्याच्या लेखाविषयीची फेसबुक प्रतिक्रिया

  मी त्यांचा "जावई माझा भला "हा मला वाटते खलनायकाची भूमिका कोकणाच्या कथेवर चित्रपट पाहिलाय. पण एव्हडी तपशीलवार माहिती नव्हती. धन्यवाद!

  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया