अतिथी कट्टा

दिनांक : १८-०६-२०१८

‌‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…

२०१८चा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून ‘फर्जंद’चा उल्लेख करावा लागेल. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून ते आजतागायत हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये उत्तम व्यवसाय करीत आहे. या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर असला तरी निर्मिती, वितरण आणि प्रसिद्धीची धुरा संदीप जाधव यांनी पेलली होती. ‘फर्जंद’चे यश आणि त्याच्या निर्मितीमागच्या कष्टाबद्दल त्यांचं हे मनोगत.
——

‘फर्जंद’ला प्रेक्षकांनी ज्या पद्धतीनं प्रेम दिलं, ते अभूतपूर्व म्हणावं लागेल. हे प्रेम पाहिल्यानंतर आमच्या कष्टाचं सार्थक झालं असंच आता वाटतंय. पहिल्या आठवड्यात फर्जंदला राज्यभरात ३०२ थिएटर्स आणि ४५० शो मिळाले होते, तर दुसऱ्या आठवड्यात २४० थिएटर्स ३९१ शो असताना फर्जंदच्या कमाईत २ ते ३ टक्क्यांचा फरक होता. कमी थिएटर आणि शो असूनही मिळणारा प्रतिसाद उत्तम होता. शुक्रवारी सुरु झालेल्या तिसऱ्या आठवड्यात १६२ थिएटर्स आणि २३० शो ‘फर्जंद’ ला मिळाले. ‘वादळवाट’, ‘अवघाचि संसार’ या मालिकांचा मी क्रिएटिव्ह हेड होतो. ‘लक्ष्मणरेषा’ नावाच्या मालिकेचीही मी निर्मिती केली. हे सगळं काम करीत असताना एखादी अफलातून ‘स्क्रीप्ट’ आपल्याकडे यावी असं मला मनापासून वाटायचं. त्या चित्रपटापासून आपण मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करावं अशी माझी इच्छा होती. दिग्पाल लांजेकर गेल्या दहा वर्षांपासूनचा माझा चांगला मित्र आहे. यापूर्वी अनेक प्रोजेक्ट्स त्यानं माझ्यासोबत केले आहेत. एके दिवशी मी त्याला ‘काहीतरी सॉलीड असेल तर सांग…’ असं म्हटलं होतं. त्याचवेळी मी दूरदर्शनसाठी संत ज्ञानेश्वरांवरील मालिकेचा एक पायलट एपिसोड बनवला. त्यासाठी मी भरपूर खर्चही केला. मात्र ही मालिका काही बनली नाही. परंतु, हा भाग बनवीत असतानाच दिग्दपालनं मला ‘फर्जंद’ची कथा ऐकवली. दिग्पालचं नरेशन संपल्यानंतर मी त्याला हा चित्रपट आपण करतोय असं सांगितलं. गेल्या दोन दशकांमध्ये मी खूप बारकाईनं काम केलं आहे. मालिकांच्या निर्मितीमधील प्रत्येक घटकात माझा सक्रिय सहभाग असायचा. दिग्पालची ‘स्क्रीप्ट’ ऐकल्यानंतर लगेचच माझ्या लक्षात आलं होतं की या चित्रपटासाठीही तेवढ्याच बारकाईनं आणि पॅशननं आम्हाला काम करावं लागणार होतं. त्यामुळे एवढ्या सर्व वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन आम्ही हा चित्रपट केला.

ऐतिहासिक चित्रपट करताना सर्वात मोठी गोष्ट असते ती ‘बजेट’ची. हा चित्रपट तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा असल्याने आम्हाला भव्यतेमध्ये कसलीही काटकसर करायची नव्हती.

सुरुवातीला आम्ही या चित्रपटासाठी जे ‘बजेट’ ठरवलं होतं, तेदेखील आत्ता बनणाऱ्या सर्वसाधारण चित्रपटांच्या दुप्पट होतं. अनिरभान सरकार हे माझे मित्र या चित्रपटाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यानं ‘बजेट’चा प्रश्न निकालात निघाला. तसेच माझ्यासह आणखी तीन मित्र निर्मितीसाठी एकत्र आल्यामुळे आम्हाला जे जे करायचं होतं, ते प्रत्यक्षात करायला मिळालं. कालांतरानं चित्रपटाचं ‘बजेट’ वाढलं. तेही आम्हाला अपेक्षितच होतं. परंतु, त्याचा परिणाम चित्रपट निर्मितीवर झाला नाही. वाढलेल्या ‘बजेट’ला अनिरभान सरकार यांनी कधी नकार दिला नाही, की कधी त्यासंदर्भात कुरकुर केली नाही. चित्रपट पडद्यावर पोचण्यापूर्वी त्याचे दोन भाग पडतात. पहिला मेकिंग आणि दुसरा म्हणजे त्याचं वितरण-प्रसिद्धी.
वितरणासाठीही निर्मात्याकडे मोठ्या निधीची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर विविध वाहिन्यांकडे काही जण जातात. मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर सरकार यांनी आपणच हा चित्रपट वितरीत करावं असं ठरवलं. त्यादृष्टीनं मग आम्ही प्रदर्शन, वितरणासाठी आमची ‘स्ट्रॅटेजी’ ठरवली. एक एक पाऊल आम्ही खूप विचारपूर्वक उचललं. ही ‘स्ट्रॅटेजी’ बनविण्यात माझा पुढाकार होता. त्याचा मला खूप आनंद आहे. कारण आपल्याकडे अनेक निर्माते-दिग्दर्शक असे आहेत की जे स्वत: चित्रपट बनवितात आणि वितरण-प्रसिद्धीसाठी दुसऱ्याच्या हाती आपला चित्रपट सोपवतात. परंतु, ती स्वत:च प्रेझेंट केल्यानं खूप चांगलं झालं.

‘फर्जंद’ बनविण्यासाठी खूप अवघड चित्रपट असण्यामागचं कारण म्हणजे त्यातले जवळपास ६० टक्के प्रसंग हे लढाईचे होते. ही लढाई आजच्या प्रेक्षकवर्गाला खरीखुरी वाटणं आवश्यक होतं. दिग्पाल आणि आमच्या टीमपुढचं हे सर्वात मोठं आव्हान होतं. परंतु, या गोष्टीत दिग्पालचा अनुभव कामी आला. तो आणि त्याचा भाऊ निखील यांना शस्त्रास्त्रांची चांगली माहिती आहे. त्याचं त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतलं आहे, इतरांना दिलंही आहे. निखीलनं या चित्रपटाचा ‘साउंड डिझायनर’ म्हणूनही काम केलं. या दोघांनी चित्रपटामधील लढाईचे प्रसंग अस्खलित बसवले. हे प्रसंग प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जातात. बहुतेक सर्व व्यक्तिरेखांच्या हातात शस्त्र होतं. त्याचं क्रेडिट मी सर्व कलावंतांनाही देईन. ही सर्व मंडळी तब्बल दोन महिने शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेत होती. पुण्यातला एक साठ जणांचा ग्रुप आम्ही लढाईच्या दृश्यांसाठी तयार केला. या सगळ्या मंडळींची शरीरयष्टी लढाईच्या दृश्यांसाठी साजेशी तसेच होती. तसेच अभिनयाशीही त्यांची बऱ्यापैकी ओळख होती. त्यामुळे या चित्रपटातील लढाईची दृश्यं ही लुटूपुटूची न वाटता ती खरीखुरी लढाई वाटते. दिग्पालनं आम्हाला जी ‘स्क्रीप्ट’ ऐकवली होती, ती प्रत्यक्षात पडद्यावर उतरली आहे. विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवरायांवर बनविलेल्या चित्रपटानंतर तब्बल ४० वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढ्या भव्य प्रमाणावर चित्रपट बनला, याचाही आम्हाला अभिमान आहे.

– संदीप जाध‌व

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया