अतिथी कट्टा

दिनांक : १६-०१-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला




मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चांगले विषय हाताळले जात आहेत. प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या कलाकृती नवीन दिग्दर्शक मंडळी सादर करीत आहेत. अभिनय क्षेत्रात चांगलं यश मिळवल्यानंतर श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शक बनले आहेत. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.

——

वर्षाअखेरीस चांगल्या वाईट गोष्टींची गोळाबेरीज करताना नव्या वर्षात एक गोष्ट नव्याने जोडली जाते, ती म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प आणि निर्णय. आयुष्यातल्या एखाद्या महत्त्वाच्या वळणावर प्रत्येकाला स्वत:चा असा एक निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येकाचा हा निर्णय आयुष्याला वेगळं वळण देणारा असतो. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा ‘फक्त तुमच्या मनाचाच कौल ऐका’ असं सांगू पाहणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा मराठी चित्रपट १८ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं लेखन, निर्मित व दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी मी सांभाळली आहे.

आजची पिढी नेमकी कशी विचार करते? यावर कोणी फारसा विचार केलेला दिसत नाही. या पिढीला काय हवंय, त्यांचे विचार, त्यांचा जीवनाविषयी दृष्टिकोन कसा आहे? ते आपल्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतात? हे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून व त्यांनी घेतलेल्या निर्णयांतून दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. दोन पिढ्यांच्या विचारांमधील तफावतही यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखविण्यात आली आहे. हा विषय जरी आजच्या तरुणाईशी निगडित असला तरी घरातील प्रत्येकाचे दृष्टिकोन आणि विचार यामध्ये प्रतिबिंबीत झाले आहेत. ‘स्वरंग प्रोडक्शन’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून कुंजीका काळवीट हा एक नवा गोड चेहरा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती स्वरात बांधली आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडें यांचे असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांचे असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. निहिरा जोशी देशपांडे, ऋषिकेश कामेरकर, जयदीप वैद्य, श्रुती आठवले, अंजली मराठे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.

माणसाची निर्णयक्षमता, त्याला अनुसरून त्याने स्वतःसाठी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयांचे होणारे दूरगामी परिणाम यावर ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट भाष्य करणार आहे. हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असून त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मी आता एक एक पाऊल टाकत आहे. माझ्या सगळ्या आप्तस्वकीयांची साथ आणि गुरूंचे आशीर्वाद यांच्यामुळेच मी माझ्या ध्येयापर्यंतचा हा प्रवास करू शकलो. चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल.

चित्रपटाच्या कथेला पूरक आणि पोषक अशी चार वेगवेगळ्या मूडची गाणी ‘एक निर्णय’ या चित्रपटात आहेत. अंजली मराठे, ऋषिकेश कामेरकर, निहिरा जोशी-देशपांडे, जयदीप वैद्य, श्रुती आठवले या सुप्रसिद्ध गायकांनी ही गाणी गायली असून, गाण्यांचे गीतकार वैभव जोशी तर संगीतकार कमलेश भडकमकर आहेत. माझा मुलगा रोहन याने सुद्धा चित्रपटातील एक गाणं संगीतबद्ध केले आहे.
माझ्या सगळ्या टीमनं खूप मेहनत केली. सगळ्या टीमची ‘पॉझीटिव्हीटी’ चित्रपटाच्या मुहूर्तापासून माझ्यासोबत होती. त्याचा मला खूप लाभ झाला. त्या सगळ्या सुहृदांमुढे नतमस्तक. माझ्या चित्रपटांच्या निर्मात्यांचा केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर मनोरंजन क्षेत्राशी तसा काहीच संबंध नव्हता. त्यांनी केवळ माझ्या प्रेमाखातर ही निर्मितीमधील उडी घेतली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या ‌‘वनलाइन’व्यतिरिक्त काहीही माहिती नसताना माझ्या पाठीशी उभं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. खरं तर माझी मैत्रीण हर्षदा खानविलकरच्या प्रेरणेमुळे मी हा चित्रपट बनवला. गेली सहा वर्षं आम्ही एकत्र काम करीत होतो. तिची धडाडी, वागणं, बोलणं, सगळ्या टीमला सांभाळणं हे बघून कदाचित आपणही असं काहीतरी करू शकतो असा माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळेच तसा एक निर्णय घेऊन बघायला काहीच हरकत नाही असं मला वाटलं. कुठचंही स्वप्न सकारात्मक विचार आणि टीमशिवाय पूर्ण होत नाही. या चित्रपटासाठी सर्वांनी खूप कष्ट घेतले. या चित्रपटाच्या संगीतावर खूप काम करण्यात आलं आहे.
वैभवनं गाणी लिहिण्यापूर्वी मी किती पाण्यात आहे हे जोखलं. मी जे करतोय त्याबद्दल माझ्या मनात पूर्ण ‘क्लॅरिटी’ आहे की नाही हेदेखील त्यानं तपासलं. गाणं हवंय म्हणजे नेमकं काय हवंय हे त्यानं समजून घेतलं. आपल्या महाराष्ट्राला परंपरा, समृद्धी आहे.

आपल्याकडे खूप मोठमोठे गीतकार, संगीतकार होऊन गेलेत. माझ्यासाठी हे सगळे गीतकार नव्हे तर कवी आहेत. वैभवसारखा सिद्धहस्त कवी मला पाच गाण्यांसाठी लाभला. कमलेश भडकमकर हा माझ्या कॉलेजमध्ये मला ज्युनिअर. कमलेश बरीच वर्षं अनेक कार्यक्रम करतोय. वेगवेगळ्या वाहिन्यांवर तो वेगवेगळी कामं करताना दिसतोय. काही वर्षांपूर्वी त्यानं एका चित्रपटाला संगीतही दिलं होतं. त्यासाठी त्याला पुरस्कारही मिळाला होता. सहज मी त्याला विचारलं नि त्यानं होकार दिला. पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला पटकन होकार देणं ही खूप सुखावणारी बाब असते. ती मला माझ्या प्रत्येक टीम मेंबरकडून अनुभवायला मिळाली. मी त्यांचा खूप ऋणी आहे.

-श्रीरंग देशमुख

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया