अतिथी कट्टा

दिनांक : ३०-०५-२०१८

‌दिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…

छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर मोजकेच परंतु चांगले चित्रपट बनले आहेत. शिवइतिहास सांगणारा ‘फर्जंद’ हा चित्रपट येत्या १ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यानं केलं असून शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं साकारली आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल चिन्मयचं हे मनोगत.

——

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपण करतो आहोत हीच फार जबाबदारीची गोष्ट आहे असं मला वाटतं. शाहू मोडक, चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरे यांच्यापासून ते महेश मांजरेकर, अमोल कोल्हे यांच्यापर्यंत सर्व कलाकारांनी प्रचंड आब राखून ही भूमिका प्रेक्षकांसमोर आणली. या चित्रपटाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यानं मला पहिल्यांदा या चित्रपटाचं ‌‘स्क्रीप्ट’ एक मित्र म्हणून ऐकवलं होतं. ते ऐकल्यावर मी त्याला म्हणालो, ‘हा तू जसा कागदावर लिहिला आहेस तसा ‌‘सेल्युलाइड’वर उतरवणारा निर्माता पाहिजे तुला. तसा नाही मिळाला तर मग तू हा सिनेमा करू नकोस.’ काही काळानं दिग्पालचा मला फोन आला आणि त्यानं मला या चित्रपटाला निर्माता मिळाला असल्याचं सांगितलं तसेच त्यानं या चित्रपटातील छत्रपतींची भूमिका साकारण्याबाबत मला विचारलं. माझ्यासाठी हे खूप छान ‘सरप्राइज’ होतं. कारण छत्रपतींची भूमिका आपण साकारू शकू असं मला वाटत होतं. परंतु, आपल्याबरोबर दिग्दर्शकालाही तसंच वाटलं पाहिजे. दिग्पाल हे चालतंबोलतं इतिहासाचं पुस्तक आहे. इतिहासावर त्याचं प्रचंड प्रेम नि अभ्यासही आहे. इतिहास हे त्याचं पॅशन आहे. त्यामुळे तो हा चित्रपट दिग्दर्शित करतोय म्हटल्यावर मी त्याला आणखी काही प्रश्न विचारणं मला योग्य वाटलं नाही.

आपल्याला तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम ठाऊक आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे कर्तृत्व प्रेक्षकांसमोर आलेलं आहे. परंतु कोंडाजी फर्जंद यांच्यासारखे बरेच ‘अनसंग हीरोज’ आहेत. त्यांचा पराक्रम खूप मोठा आहे. फक्त साठ सहकाऱ्यांना घेऊन ते अडीच हजार फौजेशी लढले. विशेष म्हणजे साठपैकी एकही मावळ्याला आपलं प्राण गमावावं लागलं नाही.

अवघ्या साडे तीन तासांमध्ये त्यांनी तो किल्ला ताब्यात घेतला. एक अत्यंत अविश्वसनीय असा हा विजय मानावा लागेल. या चित्रपटात माझ्या वाट्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी भूमिका आली आहे. या चित्रपटात महाराज रागावताना दिसतात, प्रसंगी ते इमोशनल होतात. ते दडपणाखालीही दिसतात. तसेच ते युद्ध करतानाही पाहायला मिळतात. हे सगळं करताना त्या व्यक्तिरेखेत चिन्मय मांडलेकर डोकावला न पाहिजे याची मी काळजी घेतली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजच वाटतील याची मी काळजी घेतली आहे.

कोंडाजी फर्जंद आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग खूपच छान झाला आहे. या प्रसंगात महाराज त्यांच्या छत्रपतींच्या वेशभूषेत दिसत नाहीत. हा रात्रीचा प्रसंग आहे. खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रसंग चित्रीत झालाय. या चित्रपटासाठी मी तलवारबाजी शिकली. त्यासाठी तब्बल दीड महिना मी प्रशिक्षण घेतलं. इतर कलाकारांनाही विविध शस्त्रं शिकली. खुद्द महाराजांच्या हाती दिग्पालनं ढाल न दाखवता दोन तलवारी दाखविल्या आहेत. एका प्रसंगात महाराज आठ जणांशी लढत असल्याचं आम्ही दाखवलं आहे. विशेष म्हणजे आपल्या शत्रूच्या हातामधील शस्त्र हस्तगत करून महाराज त्यांच्याशी लढत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दिग्पालनंच मला खूप काही शिकवलं. दिग्पाल स्वत: लेखक-दिग्दर्शक आहे. मीही स्वत: लेखक-दिग्दर्शक आहे. मी अभिनेता आहे, तोही अभिनेता आहे. ‌‘तू माझा सांगाती’मध्ये त्यानं लिहिलेले संवाद म्हणताना खूप मजा यायची. त्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास होता. ‘रमा माधव’ या चित्रपटासाठी त्यानं सहदिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटाच्या हाताळणीचा त्याला चांगलाच अनुभव होता. त्याचं ‘स्क्रीप्ट’ खूप उत्तम होतं. त्यानं त्याला आपल्या दिग्दर्शनाची चांगली जोड दिली आहे. या चित्रपटात फारशी घोडेस्वारी नाही. गनिमी काव्याचं युद्ध इथं पाहायला मिळतं. कर्जतच्या एनडी स्टुडिओत आम्ही या प्रसंगाचं चित्रीकरण केलं. ज्या रात्री आम्हाला चित्रीकरण करायचं होतं तेव्हा खूप पाऊस झाला. त्यामुळे आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. अखेर पहाटेच्या वेळी पाऊस थांबला आणि हा प्रसंग ‌‘वन शॉट वन टेक’ आम्ही ओके केला. २०१६ मध्ये आम्ही हा चित्रपट चित्रीत केला. तो आता प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांचं या चित्रपटाला प्रेम मिळेल अशी मी अपेक्षा करतो.

– चिन्मय मांडलेकर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया