अतिथी कट्टा

दिनांक : २५-०६-२०१८

‌‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर

मराठी चित्रपटसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या ‌‘सैराट’ चित्रपटावर आधारलेला ‘धडक’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्याची सध्या बरीच चर्चाही आहे. ‘धडक’ची निर्मिती करणारे करण जोहर तर ‘सैराट’च्या प्रेमातच आहेत. याबद्दल त्यांचं हे मनोगत.
——

शशांक खेतान एके दिवशी माझ्या केबिनमध्ये आला नि म्हणाला, ‌‘मी आत्ताच एक सिनेमा पाहून आलोय नि पुरता भारावून गेलोय. त्या सिनेमाचं नाव आहे ‘सैराट’. तेव्हा पहिल्यांदा ‌‘सैराट’ या नावाशी माझी पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतरच्या काळात ‘सैराट’ आणि नागराज मंजुळे हे नाव सतत माझ्या कानावर पडलं. या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीच्या व्यवसायाच्या आघाडीवर जो काही चमत्कार घडविला तो सर्वज्ञात आहेच. परंतु, नुसता व्यवसायच नव्हे तर हा चित्रपट आता मराठी चित्रपटसृष्टीसाठी गौरवशाली ठरला आहे. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील सर्वभाषिक चित्रपटांच्या मनाशी या चित्रपटाची तार जोडली गेली. ‘धडक’ हा ‘सैराट’चा रीमेक आहे, असं मी म्हणणार नाही. कारण गाजलेल्या कलाकृती जशाच्या तशा पुन्हा बनत नाहीत, किंवा त्या बनवूही नयेत या मताचा मीदेखील आहे. त्यामागचं कारण म्हणजे आम्ही जे काही पडद्यावर दाखवू त्याची मूळ कलाकृतीशी निश्चितच तुलना केली जाणार. म्हणूनच आम्ही ‘सैराट’चा रीमेक केलेला नाही. शशांक खेताना हा ‘सैराट’च्या प्रेमात पडला आणि त्यामधून ‘धडक’चा जन्म झाला. ‘धडक’ हे ‘सैराट’चे ‘अॅडॅप्टेशन’ आहे असं मी म्हणेन. ‘सैराट’चा आम्ही ‘सोर्स मटेरियल’ म्हणून उपयोग केला आणि शशांक तसेच त्याच्या टीमनं त्यांना हवा तसा चित्रपट बनविला. ही खरोखरीच एक चांगली गोष्ट आहे, असंच आता म्हणावं लागेल.

‘सैराट’ची निर्मिती ‘झी स्टुडिओज’नं केली होती. त्यामुळे ही कंपनी ‘धडक’साठी आमच्याबरोबर असणं ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे असं मी मानेन. जान्हवी कपूर आणि इशांत खट्टर ही नवीन जोडी आमच्यासाठी ‌‘स्पेशल’ आहे. सहा वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा एक नवी जोडी रसिकांसमोर सादर केली होती. आता पुन्हा आम्ही तसाच प्रयत्न करीत आहोत. या दोघांनाही कलाक्षेत्राचं पाठबळ असलेलं कुटुंब मिळालेलं आहे. तारुण्याचा एक नवा जोश त्यांच्यात आहे, असं मला वाटतं. त्यामुळे हे दोघेही रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी अजरामर केलेल्या ‘आर्ची’ आणि ‘परशा’ या दोन व्यक्तिरेखांना न्याय देतील, अशी मला अपेक्षा आहे. ‘सैराट’ची मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचं संगीत. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला दिलेलं संगीत खरोखरीच अद्वितीय स्वरूपाचं होतं. यापूर्वी आमच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटासाठी आम्ही एकत्र काम केलेलं होतं. त्यामुळे या जोडीचं कर्तृत्व आम्हाला ठाऊक होतं. ‘सैराट’चं संगीत हे नुसतंच लोकप्रिय नाहीय, तर त्यात एक सुरेख ‌‘मेलोडी’ आहे. अशाप्रकारची मेलोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीतामध्ये होती. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा ‘साऊंड’ तसेच अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रेशन हे या जोडीचं वैशिष्ट्य आहे. ‘सैराट’चं ‘अॅडॅप्टेशन’ करताना त्याच्या संगीतावर आम्ही खूप विचार केला. भरपूर बैठकांनंतर आम्ही त्यातली २ गाणी जशीच्या तशी घेतली. फक्त त्यांचं हिंदीत भाषांतर केलं आणि २ गाणी नव्यानं बनवली. ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्यानं तर आता जगाला वेड लावलंय. त्यामुळे हे गाणं ‘धडक’मध्ये फक्त शब्द बदलून आलंय. त्याची चाल जशीच्या तशी आहे. तसेच ‘याड लागलं’ हे गाणंदेखील आम्ही तसंच घेतलंय. ही गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहेत. ‘सैराट’चं कथानक घडलं होतं महाराष्ट्रात. ‘धडक’ उलगडतो ते उदयपूरमध्ये. आमच्या टीमनं मूळ कलाकृतीला न्याय देण्याचा १०० टक्के प्रयत्न केला आहे. जबरदस्तीनं काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला नाही. नागराज मंजुळे यांना लवकरच आम्ही हा चित्रपट दाखवणार आहोत.

– करण जोहर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया