अतिथी कट्टा

दिनांक : १७-१२-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आता मराठीची कक्षा ओलांडून विदेशात पोचला आहे. गजेंद्रचा इंडो-स्वीडिश प्रॉडक्शनच्या वतीने निर्मिला गेलेला ‘डियर मौली’ हा पहिलाच हिंदी-इंग्रजी द्विभाषिक चित्रपट पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत स्वतंत्रपणे सहभागी झाला असून त्याचे प्रदर्शन नुकतेच ऑस्कर ज्युरींसमोर झाले आहे. या चित्रपटाबद्दल गजेंद्र अहिरे यांचं हे मनोगत.

——

जागतिक चित्रपटांची ओढ मला नेहमीच लागून राहिलेली आहे. त्यामुळेच एखादा विदेशी चित्रपट करण्याची इच्छा बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात होती. तशी संधी मला या स्वीडन को-प्रॉडक्शनमध्ये मिळाली. प्रवीण निश्चल, मनमोहन शेट्टी या मंडळींनी माझ्यावर विश्वास दाखवला. ‘डियर मौली’ हा चित्रपट मी स्वीडनमध्ये चित्रीत केला गेला. त्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शन होऊन ती पुन्हा पाहिल्यानंतर मला तिच्यात प्रचंड ‘पोटेन्शियल’ जाणवलं. तसेच या वेळी मला हा चित्रपट खऱ्या अर्थाने ‘क्रॉस ओव्हर कंट्री’ सिनेमा आहे, याचीही जाणीव झाली.

भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी जो चित्रपट पाठवला जातो तो ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या गटासाठी इतर चित्रपटांशी स्पर्धा करतो. मात्र हा चित्रपट तसा नाही. स्वतंत्रपणेही एखाद्या निर्मात्याला आपला चित्रपट ऑस्करसाठी पाठवता येतो. मात्र त्यासाठी एकच अट म्हणजे, लॉस एंजिलिसमधील चित्रपटगृहामध्ये त्याचं रीतसर प्रदर्शन करावं लागतं. आपला चित्रपट ऑस्करच्या ज्युरींना आधी दाखवावा लागतो. त्यासाठी आम्ही या चित्रपटाचे सलग २१ शोज तिथं लावले. या प्रदर्शनानंतर ऑस्करतर्फे काही चित्रपट शॉर्टलिस्ट म्हणजे निवडले जातात. आता त्यात आमचा चित्रपट निवडला गेला आहे की नाही, हे लवकरच कळेल.

या चित्रपटाची कथा २०१६पासून माझ्या डोक्यात होती. या चित्रपटात ‘इमिग्रेशन’चा विषय हाताळण्यात आला आहे. हा विषय केवळ भारत, स्वीडन किंवा अमेरिकेचा नसून संपूर्ण जगाची ती एक मोठी समस्या बनली आहे. मौली नावाची एक मुलगी आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेत युरोपात जाते. ही मुलगी पाच वर्षांची असताना तिनं आपल्या वडिलांना शेवटचं पाहिलेलं असतं. तिचे वडील स्वीडनमध्ये एक प्रख्यात शास्त्रज्ञ असतात. ते आता गायब झालेले असतात. त्यानं आपल्या मुलीसाठी काही पत्रं लिहिली होती. ती खूप ‘पोएटिक’ होती. त्या पत्रांचा आधार घेत ती आपल्या वडिलांचा शोध सुरू करते. अशी ती एका वडील आणि मुलीची कथा आहे. माणसं काहीतरी स्वप्नं घेऊन कुठंतरी जातात. तिथल्या ‘सिस्टीम’मध्ये किंवा संस्कृतीमध्ये आपण ‘फिट’ बसू शकत नाही. त्यामुळे आपली स्वप्नं कशी उद्ध्वस्त होतात. तसेच त्यातून काहीतरी नवीनही गवसते आणि त्या व्यक्तीचा वेगळाच प्रवास उलगडतो. त्या वडिलांबाबतही काहीतरी विचित्र घडलं आहे. या गोष्टीत मी मुख्यत: नातेसंबंधांवर भर दिला आहे आणि नातेसंबंध हा असा प्रकार आहे की, तो जगातल्या कोणत्याही प्रेक्षकाला अपील होऊ शकतो. स्वप्नांच्या मागे धावणारी लोकं कुठं कुठं निघून जातात. त्यांच्या मागे काय काय राहिलेलं असतं आणि या माणसांचा शोध घेताना काय काय घडतं, याचंही चित्रीकरण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याची कथा-पटकथा आणि संवाद मी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये लिहिले. तसेच एकाचवेळी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन आवृत्त्यांचं चित्रीकरण झालं. बहुतेक वेळा आपल्याकडे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत चित्रपट परावर्तिक करताना केवळ त्याचं डबिंग केलं जातं. मात्र, हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये स्वतंत्रपणे बनला आहे. तसेच हिंदी आवृत्तीमधील विदेशी मंडळी त्यांच्यात भाषेत बोलतील. त्यांना आम्ही विचित्र उच्चारांमधील हिंदीमध्ये बोलताना भाग पाडलेलं नाही.

स्वीडनमधील उकसाना, स्टॉकहोम, विराब्रुक, नॉटेलिया आदी ठिकाणी हा चित्रपट मी चित्रीत केला. हे इंडो-स्वीडन ‘जॉइंट प्रॉडक्शन’ असल्यामुळे त्यातले कलाकार आणि तंत्रज्ञ हे अर्धे भारतीय आणि अर्धे तिकडचे नागरीक होते. या चित्रपटात जर्मनीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्टार लिया बॉयसननं काम केलं आहे. आपल्याकडील कलाकारांमध्ये आलोक राजवाडेचा समावेश आहे. मौलीची मुख्य व्यक्तिरेखा गुरबानी गिल या तरुणीनं साकारली आहे. ऑस्करमधील ज्युरींसमोर हा चित्रपट प्रदर्शित केला असल्यामुळे तो आता जगभरामधील इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही निवडला जाईल, अशी मला आशा आहे. या चित्रपटाची हिंदी तसेच इंग्रजी आवृत्ती भारतात कधी प्रदर्शित होईल, याचा निर्णय प्रवीण निश्चल प्रॉडक्शनतर्फेच घेतला जाईल.

-गजेंद्र अहिरे

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया