अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०५-२०१८

‌सायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…

प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘सायकल’ चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव आणि भाऊ कदम ही जोडगोळी अत्यंत वेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या भूमिका आणि चित्रपटातील काम करण्याच्या अनुभवाबद्दल प्रियदर्शन आणि भाऊ कदम यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत.
——–

प्रियदर्शन जाधव : खूप धमाल पण तरीही काहीतरी छान सांगून जाणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी ‘मंग्या’ हे पात्र साकारलं आहे. त्याला काही चोरी केल्याचं वाईट नाही वाटत. परंतु, विशेष अडचण होतेय ती त्या सायकलमुळे. भाऊ कदमनं साकारलेल्या गजाला असं सतत वाटत असतं की आपण एका भल्या माणसाची सायकल चोरली आहे आणि त्यामुळे त्याला फार त्रास होत असेल. या गोष्टीचा भाऊ कदमला खूप त्रास होत असतो. भाऊ या गोष्टीचा त्रास करून घेत असतो. त्यामुळे पर्यायानं मलाही त्रास होत असतो. हृषिकेश एक प्रसिद्ध ज्योतिषी असतो. त्याचे आजोबाही ज्योतिषी असतात. आजोबांची सायकल ही त्याच्यासाठी विद्येचं प्रतिक आहे. आजोबांची सगळी विद्या ही त्या सायकलीमध्ये आहे आणि ती आपल्याकडे आली आहे असं त्याला वाटत असतं. म्हणून त्याचा त्या सायकलीवर भारी जीव आहे. म्हणूनच तो त्या सायकलीवर कोणाला बसू देत नाही की कोणाला तिला हात लावू देत नाही. ती सायकल आम्ही चोरतो आणि मग नंतर काय धमाल घडते ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
आपल्यातल्या प्रत्येकानंच लहानपणी काही ना काही तरी चोरी केलेली आहे. तशी मीदेखी चोरी केली होती. लहानपणी वडिलांच्या खिशातून मी पैसे चोरायचो. जवळपास वर्षभर हा प्रकार चालला होता. माझे वडील पाकीट वापरत नव्हते. त्यामुळे त्यांना माझा हा चोरीप्रकार कळायला वेळ लागला. माझी शाळा घराजवळ होती. दुपारी मधल्या सुट्टीत मी घरी जेवायला यायचो. एके दिवशी वडिलांच्या पॅंटच्या खिशात हात घातल्यानंतर मला १० रुपयांची नोट मिळाली. ती मी घेतली नि शाळेत गेलो.

शाळा सुटायच्या आधीच माझे वडील शाळेत आले. सदरा, जीन्सची पॅंट आणि रंगवलेले केस अशाच अवस्थेत ते शाळेत आले. वडिलांना पाहताक्षणीच मला १० रुपयांच्या पायी पुढं काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना आली. त्यानंतर ‘फाट्’ असा आवाज आला नि नंतर जे व्हायचं तेच झालं. त्या चोरीनंतर मी आज या चित्रपटासाठी सायकल चोरली आहे.

प्रकाश आणि अदितीचा मी आवर्जून उल्लेख करीन. खूप छान पद्धतीनं हा चित्रपट लिहिला गेलाय आणि प्रकाशनं तितक्याच सुंदर पद्धतीनं तो दिग्दर्शितही केला आहे. हृषीकेशचा ट्रॅक खूप तरल आहे. त्याचा रोल साकारण्यासाठी खूप कठीण होता. शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा मला आणि भाऊ कदमला खूप सुचत होतं. मी त्याला म्हणालोदेखील, ‌‘भाऊ आपण असं करूया… तसं करूया…’ प्रकाशला आम्ही ते जाऊन ऐकवायचो. परंतु, त्याची त्यावर काही प्रतिक्रियाच नसायची. थोड्या वेळानं मग आम्ही जे सुचवायचो त्याला तो नकार द्यायचा. नंतर आमच्या सांगण्याला त्याच्याकडून नकार मिळण्यात धार येत गेली. नटानं कितीही स्क्रीप्ट वाचली तरी दिग्दर्शकाला जसं दिसत नाही नि तो सांगत नाही तोपर्यंत नटाला परफॉर्म करता येत नाही. मग हळूहळू आमच्या कामामध्येही लज्जत यायला लागली. ब्रिलियंट भट्टी जमलीय असं मी म्हणेन. विशेषत: भाऊ कदममुळे.
भाऊ कदम : या चित्रपटामध्ये मी ‘गजा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. मंग्या आणि गजा हे साधेसुधे चोर नसतात. ते सज्जन, सोज्ज्वळ, प्रेमळ चोर असतात. त्यामुळेच खूप छान गमतीजमती चित्रपटामध्ये घडतात. चोरांची आमची ही पाचवी पिढी. प्रत्यक्ष वास्तव जीवनाबद्दल सांगायचं झालं तर लहानपणी मी चिल्लरच चोरायचो. मला हवी तेवढी चिल्लर मी घ्यायचो नि बाकीची तशीच ठेवून द्यायचो. १ रुपयात १ तास अशी भाड्यानं सायकल मिळायची. ती मी अनेकदा चालवायचो. परंतु, या चित्रपटाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा सायकल चालवायला मिळाली. हृषिकेश आणि प्रियदर्शनबरोबर काम करतानाही मजा आली. हृषिकेशनं हा चित्रपट पाहून मला जी प्रतिक्रिया कळवली ती मोलाची आहे. हृषीकेश म्हणाला, ‘असा भाऊ आम्ही यापूर्वी चित्रपटामधून पाहिलेला नव्हता. असं तू काम केलं आहेस.’ अशी प्रतिक्रिया आल्यामुळे साहजिकच आनंद झाला. यामधील माझ्या पात्राकडून झालेला विनोद हा ओढूनताणून केलेला नाही. जेवढ्या सहजतेनं विनोद साकारता येईल, तसा साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे. आता प्रेक्षकवर्ग या चित्रपटाचं कसं स्वागत करतो ते पाहायचं.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

मकरंद डोईजड

अभिनेत्री अनुपमा यांच्या फेसबुकवर दिलेल्या माहितीवर आलेली प्रतिक्रिया
:-गेली १ वर्ष या अभिनेत्रीचे पूर्ण नाव शोधत होतो. खूप खुप धन्यवाद.💐
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया