अतिथी कट्टा

दिनांक : २९-०४-२०१८

‌चित्रपटसृष्टीच्या वडिलांची कथा

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आजवर बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अगदी अलीकडे डिंपल प्रकाशन प्रकाशित आणि ज्योती निसळ लिखित ‘ध्येयस्थ श्वास दादासाहेब फाळके’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाची ही समीक्षा.
——–

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लेलँड स्टॅनफोर्ड नामक जिज्ञासू माणसाने आपला फोटोग्राफर मित्र एडवर्ड मयब्रीजच्या साहाय्याने घोड्याच्या शर्यतीत कोणकोणता घोडा अव्वल येतो, याचे अत्यंत सूक्ष्म नि तंतोतंत मूल्यमापन व्हावे, यासाठी कल्पकतेने फोटो काढण्याचे सांगितले. एडवर्ड मयब्रीज फोटो काढण्यात तरबेज होता. त्याने मोठ्या कल्पकतेने अनेक कॅमेर्‍यांद्वारे घोड्यांचे फोटो काढले. हे सर्व अँगलमधून आलेले फोटो चक्राकार तबकडीवर फिरवून पाहिले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे हे घोड्यांचे फोटो चल अवस्थेमुळे पळाल्यासारखे भासू लागले.

एडवर्ड मयब्रीजची जिज्ञासू वृत्ती अधिक चोखंदळ होत गेली. त्याने ही सारी फोटोरूपी चित्रे एका पारदर्शक पट्टीवर घेतली. त्याच्या मागे प्रकाशझोत लावून ही चित्रे एकापाठोपाठ पडद्यावर पाहिली. चलचित्रांमुळे या चित्रात एकसंधपणा येऊन चित्रे सजीवासारखी चालल्यासारखी दिसायला लागली. अशा धडपड्या खटपटीतून एडवर्डने जगातील पहिला चित्रपट ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’ निर्माण केला. पुढे यशावकाश मयब्रीजच्या संशोधनाने चित्रपट क्षेत्रात बदल होत गेला आणि जगात सिनेमा युगाची पहाट उजाडली. समस्त जगात लेलँड स्टॅनफोर्ड, एडवर्ड, थॉमस अल्वा एडीसन यांच्या जादूई कर्तृत्वातून सिनेमाची उत्तरोत्तर यांच्या प्रगतीच होत गेली. चलचित्र, कॅमेरा यामध्येही बरेचसे प्रयोग झाले.

भारतात चित्रपटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्रपट व्यवसायाने हजारो कलाकार, तंत्रज्ञांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न मिटविलेला आहे. चित्रपट निव्वळ मनोरंजन नव्हे ते समाजप्रबोधनाचं प्रभावी साधन आहे. मनोरंजनातून ज्ञान देणारं अत्युच्य दृकश्राव्य माध्यम म्हणजे चित्रपट. भारतीय सिनेमाने आज कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. जगात नावलौकिक मिळविला आहे. चित्रपटांची निर्मिती कशी झाली? त्याचा निर्माता कोण? चित्रपट तयार करताना कोण-कोणत्या समस्या आल्या असतील? चित्रपट बनतो तरी कसा? असे नानाविध प्रश्‍न अनेकांना पडतात. अशाच प्रश्‍नांची उकल करण्याची चित्तरकथा म्हणजे ज्योती निसळ लिखीत ‘ध्येयस्थ श्वास दादासाहेब फाळके’ हे पुस्तक ‘डिंपल’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.

३० एप्रिल १८७० रोजी दादासाहेबांचा जन्म झाला. दादासाहेबांचे मूळ आडनाव ‘भट’ होते. केळाचे फाळके (खाण्याचा पदार्थ) करण्याच्या त्यांच्या हातखंड्यामुळे त्यांचे नाव ‘फाळके’ पडले. लहान वयापासून ते चौकस, संशोधक वृत्तीचे होेते. त्यांच्या अंगी अनेक कला होत्या. आई-वडिलांकडून त्यांना कलेचा वारसा मिळाला होता. ते सुश्राव्य कीर्तनही करीत. प्रत्येक कलेकडे ते जिज्ञासेने बघत. प्रत्येक कला येण्यासाठी धडपडत. ‘गिरगाव रोड’वर एक फिरते थिएटर होते. सिनेमा पाहण्यासाठी दादासाहेब तिथे गेले. पडद्यावरच्या हलणार्‍या चिटपटाचा धंदा आपण केला तर? अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनी स्थिरावली. त्यानुसार त्यांनी नाना अडथळे पार करत आपल्या ध्येयाचा झेंडा फडकवित ठेवला. नाशिकसारख्या पावन भूमीतून दादासाहेबांनी मोठ्या कष्टाने चित्रपटांची गंगोत्री प्रवाहित ठेवली. पदरमोड करून त्यांनी स्वप्नातले सत्यात उतरविले. ३ मे १९१३ रोजी ‘राजा हरिश्‍चंद’ तयार करून चित्रपटाला जन्म दिला. मूकपट, कृष्णधवल चित्रपटांपासून ते आजच्या मल्टिप्लेक्समधील चित्रपट प्रवास! केवढी ही प्रगती! याचे सारे श्रेय धुंडीराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांनाच जाते. एक चित्रपट काढणे म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखे आहे. हे अवघड कार्य दादासाहेबांनी लीलया पेलले. शासनदरबारी दादासाहेबांच्या कार्याची दखल घेतली गेली. पुढे त्यांच्या नावाने अत्यंत प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार अत्युच्च विजयाचा मापदंड ठ़रला. १९६९ साली सदरील पुरस्कार देविकाराणी यांनी प्रथमत: स्वीकारला. दादासाहेब जन्मले नसते तर आपण आपल्या अत्यंत आवडीच्या सिनेमाला मुकलो असतो.
चंद्रशेखर पुसाळकर यांनी आपल्या आजोबांच्या सांगितलेल्या या आठवणी म्हणजे प्राजक्तांची फुलेच होत. एकेक आठवण हळवी, आशयघन, मनात रेंगाळणारी, एखादं दुसरी मन कुरतडणारी. बालपण ते अखेरचे दिवस वाचणे म्हणजे एक चित्रपटच बघणे अनुभवणे. सिनेमा हाच आपला श्वास मानणारे दादासाहेब सिनेमाप्रती अतिशय गंभीर होते. त्यांनी सांगितलेली सिनेमाची पंचसूत्री अभ्यासनीय आहे. चित्रपटाची लांबी ९ हजार फुटांपेक्षा जास्त नसावी. चित्रपटांबरोबर शैक्षणिक प्रवासपट वा व्यंगपट दाखवावेत. कथा लिहिताना अपेक्षित ते भान ठेवून दृश्ये लिहावीत. गरज असेल तिथेच संवाद घालावेत. भारतीय सामाजिक चित्रपटांनी आपल्या संस्कृतीशी विसंगत अशी पाश्‍चात्य वातावरणनिर्मिती करू नये. कलावंतांना त्यांच्या योग्यतेएवढे पैसे द्यावेत. कलाकारांनी व्यसनांपासून दूर राहावे. निरोगी मन आणि शरीरच राष्ट्र संवर्धनाला पोषक चित्रपट देवू शकतो. या पाच सूत्रांतून त्यांनी सिनेमाची आचारसंहिताच मांडली. या त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांच्या जगावेगळ्या भरीव कार्याची विशालता अधोरेखीत होते. कुठलेही तांत्रिक शिक्षण न घेता ह्या माणसाने एवढे तांत्रिक कसब कसे काय केले हा कुतुहलाचा विषय आहे. ‘कायनोटोग्राफ’मध्ये लिहिले आहे… दादासाहेब फाळके इंग्लंडमध्ये का जन्मले नाहीत… एवढा हिमालयासारखा हा चित्रपट अवलिया.
काही आठवणी सुन्न करणार्‍या आहेत. सिनेजगतातील या अनभिषिक्त सम्राटाला अखेरची वंदना द्यायला फक्त काही लोकच उपस्थित असावेत. आपणच केलेला चित्रपट स्वत:च पैसे खर्च करून बघणं… एकंदरीत एका स्वप्नवेड्या, ध्येयवेड्या पण असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तीच्या आठवणी, अनुभव, जीवनपट वाचणे सुखद अनुभव होय. दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे, प्रसंगचित्रे पुस्तकाची श्रीमंती वाढवतात. आवर्जून वाचावे, संग्रही ठेवावे असे हे पुस्तक होय.

– रा. कों. खेडकर
पुस्तकाचे नाव – ध्येयस्थ श्वास दादासाहेब फाळके
लेखक – ज्योती निसळ
प्रकाशक – डिंपल प्रकाशन
पृष्ठे – ११६, मूल्य – १२० रु.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

मकरंद डोईजड

अभिनेत्री अनुपमा यांच्या फेसबुकवर दिलेल्या माहितीवर आलेली प्रतिक्रिया
:-गेली १ वर्ष या अभिनेत्रीचे पूर्ण नाव शोधत होतो. खूप खुप धन्यवाद.💐
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया