अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०६-२०१८

‌चित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर

विख्यात चित्रकार, निर्माते, दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांचा ३ जून हा जन्मदिन. भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या काळात पेंटर यांनी आपली प्रतिभा पणाला लावून अतिशय सुंदर कलाकृती रसिकांना सादर केल्या. पेंटर यांनी उत्तमोत्तम कलाकृतींबरोबरच भविष्यात चित्रपटसृष्टी गाजविणारे शिष्यही तयार केले. पेंटर यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा एक लेख समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी ‘चित्रसंपदा’ या विशेष संदर्भ अंकासाठी १९८९ मध्ये लिहिला होता. पहिल्या जागतिक मराठी परिषदेनिमित्त या अंकाची निर्मिती करण्यात आली होती. पेंटर यांच्या जन्मदिनानिमित्त हा लेख आम्ही पुनर्प्रकाशित करीत आहोत.

——

चित्रपटांचा कला माध्यम म्हणून विकास करणारे भारतातले पहिले दिग्दर्शक बाबूराव पेंटर ! पेंटरांनी या दृश्यकलेला अद्भुत पुराणकथांतून इतिहासाच्या वास्तव भूमीत आणले.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात तरी कोणाचे नाव घ्यायचे असेल तर ते बाबुराव पेंटर यांचे होय. बाबुरावांचे कर्तृत्व दुहेरी होते. एक तर ते फार मोठे चित्रकार होते आणि दुसरे म्हणजे ते सव्यसाची चित्रपट दिग्दर्शक होते. सुदैवाने त्यांना तेवढ्याच ताकदीचे शिष्य लाभले. परंतु परंपरा सुरु झाली ती बाबुरावांपासून. त्यांचे समकालीन असे काही महाराष्ट्रीय चित्रपटनिर्माते जमेला धरले तरी फाळक्यांचा वारसा बाबुरावांनीच चालविला असे म्हटले पाहिजे.

बाबुराव पेंटर हे कोल्हापुरातील प्रतिभावंत कलावंतांपैकी एक. या श्रेष्ठ प्रतिभावंतांमध्ये कोल्हापुरात स्थायिक झालेले गायक खॉंसाहेब अल्लादिया खॉं होते, चित्रकार आबालाल रहेमान होते, खुद्द बाबुरावांचेच आतेभाऊ आनंदराव पेंटर होते. झालेच तर संगीतकार, नाटककार आणि नट गोविंदराव टेंबेसुद्धा या अव्व्ल दर्जाच्या कलाकारांपैकीच.

अशा कोल्हापुरात बाबुरावांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला, त्यांचा पिढीजात व्यवसाय म्हणजे सुतारकामाचा, म्हणूनच त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे समजायचे. मात्र त्या काळाला अनुसरून चित्रकलेचा पेशा पत्करलेल्या माणसाला ‘पेंटर’ हेच आडनाव लावीत. आपल्या घरी बाबुराव वडिलांकडून कोरीव काम, चित्रकला, सुतारकाम, यंत्रविज्ञान हे सारे काही शिकले. आनंदराव पेंटर हे साधारणतः त्यांच्याच वयाचे. त्यांच्या सहवासात चित्रकला, छायाचित्रकला इ. छंद विशेष प्रिय वाटू लागले.
बाबुराव आणि आनंदराव जिथे राहत त्याच्यासमोरच श्रीपतराव काकडे नावाचे शिंपी पेशातील तरुण राहत. ते तिघेही मित्र आणि या तिघांचे चौथे मित्र म्हणजे नटवर्य केशवराव भोसले हे होत. केशवराव भोसल्यांनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, १९०८ साली हुबळी मुक्कामी आपली ‘ललितकलादर्श’ ही नाटक मंडळी स्थापन केली.

आनंदराव व बाबुराव या बंधूंना या काळात पोट्रेट वगैरे करण्याची फुटकळ कामे मिळत असत. परंतु आनंदरावांना केशवरावांच्या नव्या कंपनीला लागणारे पडदे व सीनसीनरी रंगविण्याचे काम हवे होते. सुरुवातीला आढेवेढे घेतल्यावर १९०९-१० मध्ये मुंबईला मुक्काम असताना केशवरावांनी त्यांना बोलावून घेतले. याच वेळी बाबुरावही वडिलांबरोबर मुंबईला गेले आणि त्यांनी माधवबागेच्या कोपऱ्यावर फोटोग्राफीचा स्टुडियो काढला. त्यांचे वडील कृष्णराव हे माधवबागेत गुजराथी मंडळींना देवदेवादिकांच्या संगमरवरी मूर्ती करून देत असत.
प्रभात फिल्म कंपनीच्या भावी संस्थापकांपैकी एक विष्णुपंत दामले हे सुद्धा याच काळात आनंदराव पेंटरांकडे चित्रकला शिकण्यासाठी आले. दामल्यांनी आनंदराव व बाबुराव या दोघांना गुरु मानले.

मुक्कामात आनंदराव व बाबुराव यांना त्या काळात रूढ झालेले मूकपट पहावयास मिळाले. एप्रिल, १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला देशी चित्रपट मुंबईत लागला. आनंदराव आणि बाबुराव यांनी तो पाहिल्यावर त्यांची निराशा झाली. आपण स्वतःच चित्रपट निर्माण करण्याची अनावर इच्छा त्या दोघा बंधूंच्या मनात निर्माण झाली. त्याच वर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी ते कोल्हापूरला परत आले आणि त्यांनी शिवाजी थिएटरमध्ये डेक्कन सिनेमा सुरु केला.

या सिनेमाच्या निमित्ताने आनंदराव व बाबुराव या दोघांना बरेचसे प्राश्चात्य मूकपट पाहायला मिळाले. परंतु त्यांची स्वतः चित्रपट निर्माण करण्याची कल्पना भांडवलाअभावी तशीच राहिली. डेक्कन सिनेमातील त्यांचे भागीदार शंकरराव वाशीकर यांच्याकडून भांडवल मिळण्याची आशा दिसेना तेव्हा पेंटर बंधूनी त्या उपक्रमातून आपले अंग काढून घेतले.

मध्यंतरीच्या काळात दोघांनी मुंबईला जाऊन केशवराव भोसल्यांच्या ‘राक्षसी महत्वाकांक्षा’चे पडदे व सीनसीनरी रंगविण्याचे काम केले. कोल्हापूरला परत आल्यावर त्यांची बाबुराव रुईकर नावाच्या एका रसिक सावकारपुत्राशी ओळख झाली. रूईकरांच्या भागीदारीत आनंदराव व बाबुराव यांनी सिनेमाची सुरुवात केली. सिनेमागृहाची त्यांची सजावट इतकी कलापूर्ण होती की ती पाहून त्यांच्या उद्घाटनासाठी आलेले शाहूमहाराज खुश झाले. असे म्हणतात, की त्या प्रसंगी महाराज आसपासच्या लोकांना म्हणाले, ‘काय पोरांनी किमया केली आहे ! पण ही सर्व कला लोकांना अंधारात दिसणार कशी?’
फाळक्यांचा ‘राजा हरिश्चन्द्र’ पाहताना पुरुषांनी स्त्री भूमिका केलेली पाहून आनंदराव व बाबुराव नाराज झाले असे म्हणतात. ‘माझ्या चित्रपटात मी बायकांनाच बायकांच्या भूमिका देईन !’ असे उद्गार बाबुरावांनी काढले. मात्र ‘महाराष्ट्र’ सिनेमामध्ये दाखविण्यासाठी आनंदनानी फाळक्यांचे ‘राजा हरिश्चंद’, ‘भस्मासुर मोहिनी’, ‘सत्यवान – सावित्री’ इ. चित्रपट मागविले होते. कोल्हापुरात या चित्रपटांनी धंदाही चांगला केला.

पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर बाजारात फिल्म कॅमेरा मिळणे जवळ जवळ अशक्य झाले. परंतु एक थोडासा नादुरुस्त असलेला ‘विल्यमसन’ कॅमेरा आनंदरावांना मुंबईत मिळाला. त्यांनी तो कोल्हापुरास आणला आणि दोघा बंधूनी तो उलगडून दुरुस्त केला. त्यांनी थॊडी कच्ची फिल्मही मिळविली आणि काही दृश्ये ट्रायलदाखल घेतली. फिल्म धुणे, तिची प्रिंट काढणे, या गोष्टी त्या दोघांना नव्याच होत्या. पण त्यांनी त्याही केल्या आणि स्वतःच्या सिनेमातच ट्रायल्स फारशा यशस्वी झाल्या नाहीत, परंतु त्यांच्यामुळे पुढचा मार्ग स्पष्ट झाला होता.

१९१४ सालच्या अखेरीला आनंदरावांनी आपला जुना ‘विल्यमसन’ कॅमेरा बाजूला ठेवून स्वतःच कॅमेरा तयार करायचे ठरविले. परंतु या प्रयत्नांना यश येईपर्यंत आणखी चार वर्षे जावी लागली. १९१८ सालात हा नवा कॅमेरा तयार झाला. एका लाकडी पेटीसारखा हा दिसायचा. इतर देशी कॅमेऱ्यात डायरेक्त्त फॉक्सची सोय नव्हती. ती अत्याधुनिक यंत्रणा बाबुराव पेंटरांनी या कॅमेऱ्यात उपलब्ध केलेली होती. दुर्दैवाने हा कॅमेरा तयार झाला त्या आधीच आनंदराव पेंटरांचे निधन झाले होते.

लौकरच बाबुराव आणि रुईकर या महाराष्ट्र सिनेमाच्या दोघं भागीदारांचे मार्ग विभक्त झाले. याच काळात गोविदराव टेंब्यांनी आपल्या शिवराज कंपनीसाठी बाबुरावांकडून नेपथ्य करून घेतले. ‘प्रभात’चे आणखी एक भावी संस्थापक साहेबामामा फत्तेलाल हे या वेळी त्यांच्या हाताखाली काम करायला होते. या कामामुळे काही काळ बाबुरावांनी उदरनिर्वाहाची विवंचना कमी झाली. टेंब्यांसाठी ‘मानापमाना’चे पडदे रंगवून झाल्यावर १९१६च्या पावसाळ्यात बाबुराव मुंबईला गंधर्व कंपनीत ‘स्वयंवर’ नाटकाचे पडदे रंगविण्यासाठी जाऊन राहिले.
मुंबईला जाण्याचा एक हेतू असा होता की, आपल्याला पुष्कळ चित्रपट पाहावयास मिळतील ! आणि प्रत्येक चित्रपट म्हणजे त्या कलेचा एकेक महत्वाचा धडा होता !

१९१७ सालात बाबुरावांचे स्वतंत्र कॅमेऱ्यावर जे प्रयोग चालले होते ते यशस्वी होण्याची चिन्हे दिसू लागली. या किचकट काळात बाबुरावांना दामल्यांची खूपच मदत झाली होती. होता होता स्वतः चित्रपटनिर्मिती करावयाचा त्यांचा विचार बळावला. ३० नोव्हेंबर १९१७च्या म्हणजे दिवाळीच्या रात्री श्रीपतराव काकड्यांच्या माडीवर फिल्म कंपनी स्थापन करण्याचा विचार बाबुरावांनी बोलून दाखविला.

दुसरे दिवशी सकाळी आंघोळ करून देवदर्शन घेऊन पॅलेस थिएटरमध्ये गेले. थिएटरच्या रंगमंचावर आनंदराव पेंटरांचा फोटो ठेवण्यात आला. बाबुरावांनी त्या फोटोला एक पुष्पहार घातला आणि ‘मी आज महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन केली आहे’ एवढेच वाक्य त्यांनी उच्चारले.

महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्थापनेच्या तारखेबाबत बाबुराव पेंढारकर, केशवराव धायबर इ. त्या कंपनीत पुढे वावरलेल्या मंडळींमध्ये मतभेद आहेत. त्यांच्या आत्मचरित्रात वेगवेगळे सण दिलेले दिसतात. परंतु आपल्याला येथे त्याबाबत काथ्याकूट करण्याचे कारण नाही.

महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना होताच प्रथम बाबुरावांनी १९१८ साली मुंबईला जे काँग्रेसचे खास अधिवेशन भरले त्याचा वृत्तपट घेतला. त्यांची भांडवलाची व्यवस्था तानीबाई कागलकर यांनी केली. दामले आणि फत्तेलाल या उपक्रमात सहाय्यक म्हणून सहभागी झालेले होते. हा वृत्तपट लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीच्याच ‘सैरंध्री’ या मूकपटाबरोबर दाखविण्यात येत असे.
महाराष्ट्र फिल्म कंपनीचे अर्थखाते बाबुरावांचे सहकारी बाबा गजबर हे सांभाळीत. (कला दिग्दर्शक बाळ गजबर हे त्यांचे चिरंजीव होत) ग. रं. भिडे यांच्याबरोबर त्यांनी लिहिलेल्या ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’ या पुस्तकात त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्यात बाबुरावांच्या चित्रपटनिर्मितीची अत्यंत वेधक हकीकत सापडते.

‘सीता स्वयंवर’ हा महाराष्ट्र फिल्म कंपनीचा पहिला चित्रपट काढण्याची योजना होती. परंतु सीतेसाठी कोणी योग्य स्त्री कलावंत मिळेना. तेव्हा त्याऐवजी ‘सैरंध्री’ हा चित्रपट काढण्याचे ठरले. यासाठी रंगभूषा, वेशभूषा कशी असावी याची बाबुरावांनी रेखाटने केली. भीम, कीचक व सैरंध्री यांच्या कामांसाठी बराच शोध करून नटनटी मिळविल्या गेल्या. भीमाच्या भूमिकेसाठी बाळासाहेब यादव नावाचे एक मल्ल निवडण्यात आले, तर कीचकाची भूमिका मित्रपरिवारातल्या दत्तोबा पवारांना दिली गेली. सैरंध्रीच्या कामासाठी मोठ्या मुष्किलेने गुलाबबाई (कमलादेवी ) नावाच्या नवागत बाई मिळाल्या. कसून तालमी झाल्यावर ‘सैरंध्री’चे चित्रीकरण सुरु झाले.

त्या काळात स्त्रियांनी चित्रपटांत भूमिका करणे म्हणजे एक धाडसच होते. सामाजिकदृष्ट्या त्यात अनेक अडचणी होत्या. परंतु त्यांना धीराने तोंड देऊन बाबुरावांनी ‘सैरंध्री’ पुरा केला. त्या काळातसुद्धा ‘सैरंध्री’चे नेपथ्य डोळ्यांत भरण्यासारखे वाटले. ते खुद्द बाबुरावांच्या हातच्या कसबामुळे.
कोल्हापुरात विजेची सोय नसल्यामुळे चित्रित केलेल्या फिल्मवर रासायनिक प्रक्रिया फार कष्टाने कराच्या लागल्या. चित्रपटक्षेत्रात आज आपण रिफ्लेक्टर पेपर्स बाह्यचित्रणासाठी वापरतो, त्यांची योजना बाबुरावांनी त्यावेळी पात्रांच्या चेहऱ्यावरील भाव दिसण्यासाठी केली होती. ‘सैरंध्री’च्या टायटल कै. नानासाहेब सरपोतदारांनी बनविल्या होत्या आणि त्याही मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी इतक्या भाषांत ! पुण्याला हा मूकपट ‘आर्यन’ मध्ये लागला. तेथे तो लोकमान्य टिळकांनी पहिला आणि त्याची खूप प्रशंसा केली. बाबुरावांना त्यांनी सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला. ‘केसरी’त ‘सैरंध्री’वर स्तुतीपर अभिप्राय छापून आला. अच्युतराव केळकरांनीसुद्धा आपल्या ‘संदेश’मधून त्याची आवर्जून शिफारस केली.

बाबुराव पेंढारकर सुरुवातीपासून महाराष्ट्र फिल्म कंपनीत होते. ‘सैरंध्री’त त्यांनी कृष्णाची एक छोटी भूमिका केलेली होती, दामले व फत्तेलाल हे सुद्धा बाबुराव पेंटरांच्या दिमतीला असत. यानंतर ‘ट्रिक सीन्स’ ना भरपूर वाव असलेली ‘वत्सला हरण’ ही कथा बाबुरावांनी निवडली. दादासाहेब फाळक्यांच्या ‘लंकादहन’ सारख्या चित्रपटांतील ट्रीक सीन्स पाहून त्यांनी स्फूर्ती घेतली होती. याच काळात फिल्मची निगेटिव्ह डेव्हलप करण्याच्या पद्धतीतही त्यांनी खूप सुधारणा केली. या सुमाराला बाबुराव पेंढारकरांच्या हाताला धरून त्यांचा पोरसवदा मावसभाऊ शांताराम (पुढे व्ही. शांताराम ) हाही कंपनीत आला. शांताराम हौसेने सारी तंत्रे शिकू लागला. त्याने त्या काळात मजुरांची सुद्धा कामे केली. ‘वत्सला हरण’ मध्ये त्याला कृष्णाची भूमिका मिळाली.
‘वत्सला हरणा’तील मायाबाजाराचे ट्रिक सीन्स मोठे बहराचे आहेत. खरे म्हणजे दामले, सीताराम कुलकर्णी (‘प्रभात’ चे नंतरचे भागीदार) व शिवराम वाशीकर (‘प्रभात’चे पटकथालेखक ) यांनी सुद्धा ‘वत्सला हरण’ मध्ये छोटी कामे केलेली आहेत ! याच काळात श्रीमंत नेसरीकर हे रु. १२ हजार देऊन कंपनीचे भागीदार झाले. ही कुमक लक्षात घेऊन बाबुरावांनी कोडॅक कंपनीचा ‘बेल अँड हॉवेल’ कॅमेरा विलायतेतून मागविला. या कॅमेऱ्याने चित्रपटातले काही महत्वाचे ट्रिक सीन्स घेण्यात आले.

यानंतर बाबुरावांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी खूप खपून शिवाजी थिएटरलगतच्या जागेवर एक बंदिस्त स्टुडियो उभारला. इथेही स्टुडियोला रंग आणि डांबर लावण्याचे काम शांतारामने स्वखुशीने केले असे बाबा गजबर सांगतात. याच काळात गावातील एक पॉवर हाऊस बाबुरावांनी जसेच्या तसे विकत घेतले आणि आपल्या स्टुडियोजवळ आणून उभे केले.

बाबुरावांचा यानंतरचा चित्रपट म्हणजे ‘सिंहगड’ हा होय. यात बाळासाहेब यादव तानाजी, झुंझारराव पवार उदयभानू आणि शांताराम शेलारमामा अशी भूमिका योजना होती. ऐतिहासिक वातावरण वास्तववादी वाटावे यासाठी बाबुरावांनी खूप कष्ट घेतले. याच चित्रपटाची निर्मिती चालू असताना त्यांनी पत्नी निधन पावली. परंतु चित्रपट हाच आपला संसार अशी बाबुरावांच्या मनाची धारणा असल्यामुळे दुःख गिळून ते ‘सिंहगड’च्या कामाला लागले.
हिंदू-मुसलमानांच्या दंग्यामुळे मुंबईतल्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमाच्या चालकांनी ‘सिंहगड’ दाखवायचे नाकारले. तेव्हा तो ग्रँट रोडच्या ‘नॉव्हेल्टी’मध्ये झळकला. असे सांगतात की सिनेमावर लावण्यासाठी बाबुरावांनी जी पोस्टर्स तयार केलेली होती ती पाहण्यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे त्या वेळचे प्रिन्सिपल ग्लॅडस्टन सॉलोमन आपल्या सहकाऱ्यांसह येत असत. ती तासन्तास सूक्ष्मपणे पाहून झाल्यावर ते बाबुरावांना म्हणाले, ‘या चित्रांना मी ऍकेडमीची पेंटींग्ज समजतो. कृपा करून ती जपून ठेवा. अशी उन्हात अन् रस्त्यावर लावून त्या चित्रांचा,तुमच्या व आमच्या कलेचा अपमान करू नका !’

यानंतर आणखी पाच-सहा मूकपट बाबुरावांनी दिग्दर्शित केले. बाबुरावांचा यानंतरचा चित्रपट म्हणजे ‘सावकारी पाश’. (कालांतराने हा बोलपटाच्या स्वरुपातसुद्धा त्यांनी दिग्दर्शिला.) शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा सावकार त्यांनी या मूकपटात अत्यंत वास्तववादी शैलीत उभा केला होता. यात शांतारामने वृद्ध शेतकऱ्याच्या (पवार) मुलाची भूमिका केलेली आहे. (पुढे बोलपट आवृत्तीत सावकाराच्या भूमिकेत विष्णुपंत औधकरांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला)’सावकारी पाश’ हा त्या काळात महाराष्ट्रभर गाजला आणि त्याच्या दिग्दर्शकाची तुलना विख्यात अमेरिकन दिग्दर्शक डी. डब्ल्यू. ग्रिफिथ याच्याशी करण्यात आली.

‘सावकारी पाश’ नंतर त्यांनी पुन्हा पौराणिक कथांकडे नजर वळविली. ‘मायाबाजार’ (१९२५), ‘भक्त प्रल्हाद’ (१९२६), ‘सती सावित्री’ (१९२७) आणि ‘कर्ण’ हे त्यातील काही मूकपट. या सुमारास महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये काही कटू घटना घडल्या आणि दामले, फत्तेलाल, व्ही. शांताराम व धायबर हे कंपनी सोडून गेले. १९३० साली ‘लंका’ चित्रपट दिग्दर्शित केल्यावर बाबुराव स्वतःच कंपनी सोडून गेले.

त्यानंतरच्या काळात त्यांनी दिग्दर्शिलेल्या चित्रपटात ‘उषा’ (१९३५) व ‘प्रतिभा’ (१९३७) हे विशेष उल्लेखनीय म्हणत येतील. त्यांच्या चित्रात नेहमी दिसणारी मॉडेल उषा मंत्री ‘उषा’ मध्ये होती तर ‘प्रतिभा’ मध्ये दुर्गा खोटे व केशवराव दाते यांच्या प्रमुख भूमिका होती. ‘सावकारी पाश’ हा बोलपट १९३६ मध्ये निघाला. बालगंधर्वांची स्त्रीभूमिका असलेले ‘मीराबाई’ (अमृतासिद्धी) हे सुद्धा बाबुरावांनीच दिग्दर्शित केले होते. १९४६ साली विष्णुपंत पागनीसांची भूमिका असलेले ‘महात्मा विदूर’ हे त्यांनी दिग्दर्शित केले, तर १९४७ मध्ये ‘राजकमल’च्या ‘शाहीर राम जोशी’चे ते व्ही. शांताराम यांच्याबरोबर सहदिग्दर्शक होते.

१६ नोव्हेंबर १९५४ रोजी हृदयविकाराचा झटका येऊन बाबुराव पेंटरांचे निधन झाले. एका महान कलावंताचा अंत झाला.

– ज्ञानेश्वर नाडकर्णी

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रिशिकांत राऊत

पडद्या मागच्या कलावंतांची देखील चांगली माहिती देता याबद्दल अभिनंदन!
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया