अतिथी कट्टा

दिनांक : १५-०३-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌‘छत्रपती शासन’मधून आजच्या काळातील वैचारिक द्वंद्व पडद्यावर




चतुरस्त्र अभिनेता मकरंद देशपांडे आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छत्रपती शासन’ या चित्रपटामध्ये त्याने प्रा. डॉ. समर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यानिमित्तानं त्याचं हे मनोगत.

——

छत्रपती शिवाजी महाराज हृदयातून डायरेक्ट रक्तात आले, जरा मेंदूंत डोकावले असते तर बरं झालं नसतं का? “छत्रपती शासन” सिनेमातील हा झणझणीत संवाद अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. १५ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मी प्रा. डॉ. समर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा माझ्यासाठी खूप विशेष चित्रपट आहे. आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक सिनेमे आले. पण मला त्याच्यात काम करायला हवी तशी संधी मिळाली नव्हती. तशी संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे. या सिनेमाचे सर्वेसर्वा निर्माता दिग्दर्शक आणि लेखक खुशाल म्हेत्रे यांनी मला लक्षात ठेवून गुंफलेली भूमिका खरंच मला साजेशी आहे. या सिनेमात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज नाहीत. पण त्यांचे विचार दिग्दर्शकाने नेमकेपणाने मांडले आहेत.

सिनेमातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा अभ्यासक, राजकारणी आणि तरुण युवक यांच्यामधील वैचारिक द्वंद सिनेमात दाखवलं आहे. समाजातील एकंदरीत आताचे वातावरण पाहता या तीन व्यक्तिरेखा म्हणजे तीन प्रवृत्ती आहेत. ज्या सिनेमात परखडपणे मांडल्या आहेत. काहीशा भरकटलेल्या तरुणाईचा कान पिळण्यापेक्षा कान उघडण्याचं काम नक्की हा सिनेमा करेल. प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा ‌‘जय शिवाजी’ जोशात म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे.छत्रपती शिवरायांच्या काळातील शासन नेमकं कसं होतं आणि त्यातून आपण आजच्या काळासाठी काय घ्यायचं आहे, हे या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. आपण शिवभक्त आहोत असं अभिमानाने मिरवितो, छातीठोकपणे सांगतो, पण आपण त्यांच्या आदर्शाप्रमाणे वागतो का ? चालतो का? बोलतो का? सगळ्यात महत्वाचे विचार करतो का? याचे उत्तर आपसूक हा सिनेमा पाहिल्यावर मिळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी मला काही वेळा फोन केले. नंतर बरेच मिस्ड कॉलही झाले. त्यावरून आपण खरोखरीच दिग्दर्शकाला हवे आहोत, याची जाणीव मला झाली आणि प्रत्यक्ष भेटीत या दिग्दर्शकाचा खरेपणा त्यांना भावला आणि लगेचच हा चित्रपट मी स्वीकारला. नवोदित दिग्दर्शक म्हटलं की त्याचा वैयक्तिक संघर्ष असलेला ‘बायोपीक’ पडद्यावर झळकण्याची दाट शक्यता असते. परंतु, तसं काही खुशाल म्हेत्रे यांनी केलेलं नाही. म्हणूनच मला ते आणि त्यांचा हा चित्रपट अधिक भावला.तो खरा वाटला. मनोरंजनात्मक चित्रपटाची नेमकी व्याख्या काय? माझ्या मते लेखन, दिग्दर्शनातील खरेपणामधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन होऊ शकतं. त्यामुळे मी या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. निर्माता-दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठी आर्थिक बाजू भक्कम करताना किती संकटांना तोंड दिलंय याची मला कल्पना आहे.

– मकरंद देशपांडे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया