अतिथी कट्टा

दिनांक : १२-०७-२०१८

‌भारतीय चित्रपट खराब आहेत ?

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे प्रख्यात लेखक श्री. वसंत साठे यांचा १२ जुलै हा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने श्री. साठे यांनी १९९१ मध्ये लिहिलेल्या ‘बखर सिनेमाची’ या पुस्तकामधील काही भाग आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. यामध्ये श्री. साठे यांनी विदेशी नियतकालिकांचा भारतीय चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोण तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील वास्तववादी चित्रपटांची वाटचाल यावर प्रकाशझोत टाकला आहे. जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश म्हणून भारताची ख्याती असली तरी हिणकस चित्रपटांच्या निर्मितीसाठी आपल्याला हिणवले जाते. मात्र पाश्चात्य देशांमध्येही असे चित्रपट बनत असतात यावरही श्री. साठे यांनी या लेखातून भाष्य केले आहे. विदेशी समीक्षकांची भारतीय चित्रपटांकडे पाहण्याची दृष्टी यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. तसेच विविध महोत्सवांमधील मोजकेच विदेशी चित्रपट पाहून भारतीय चित्रपटांवर टीका करणाऱ्या समीक्षकांवरही श्री. साठे यांनी या लेखातून टीका केली आहे.

——

अमेरिकन नियतकालिकांतून भारतीय चित्रपटांबद्दल अधून मधून बरंच काही लिहून येतं. विशेषतः ‘टाईम’, ‘न्यूजवीक’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या मान्यवर पत्रांनी आपल्या चित्रपटांवर काही वेळा निमित्ताने तपशीलवार लेख प्रसिद्ध केले आहेत. या सर्व लिखाणात आपल्या चित्रपटांची स्तुती, भलामण असलं काही अजिबात नाही. आहे ती फक्त कठोर टीका ! भारतीय चित्रपट सर्व अंगांनी मागासलेले आणि भडक असतात, असेच निष्कर्ष त्यात काढले गेले आहेत. ते निष्कर्ष पटणारे आहेत का ? आपले चित्रपट खरेच इतके वाईट आहेत का ? आपले चित्रपट इतके वाईट आहेत की नाहीत या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी चांगल्या चित्रपटाचे निकष कोणते, हे सर्वप्रथम कळले पाहिजे आणि त्यासाठी जगात विविध देशांत चित्रनिर्मिती कधी आणि कशी सुरू झाली त्याचाही इतिहास तपासला पाहिजे.

पूर्वी फक्त पाश्चिमात्य देश चित्रपटनिर्मिती करीत असत. परंतु साम्राज्यांच्या सरत्या काळात चित्रपटाचे लोण इतरत्रही पोचले आणि विविध देशांत चित्रपट बनू लागले. लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि रशियाई देशांतही चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. आफ्रिकेतील सेनेगलसारख्या राष्ट्राने तर अनेक उल्लेखनीय चित्रकृती दिल्या. शंभराहून अधिक देश आज आपापले चित्रपट निर्माण करीत आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा दर्जा आहे, मानदंड आहेत, परंतु तरीही पश्चिमी राष्ट्रांचा वरचष्मा जगभर आहेच. तिसऱ्या आणि चौथ्या दशकात हॉलीवूडचा प्रभाव अधिक होता. हॉलिवूडचे चित्रपट जगभर दाखविले जात. अगदी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातही हॉलिवूड किंवा अमेरिकन चित्रपटांची मक्तेदारी चालूच राहिली. या चित्रपटांनी व्यावसायिक चित्रपटांचा एक दर्जा ठरवून टाकला आणि इतर देशांनीही तो स्वीकारला. याचाच अर्थ असा की जगभर चित्रपटअभिरुचीचे एक निश्चित परिमाण या हॉलीवूडपटांनी ठरवून टाकले आहे. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक चित्रपटांत काही महत्वाच्या घटना घडल्या आणि त्याचे जाणवण्याइतपत परिणाम सर्वत्र दिसून आले. इटलीतला नववास्तववाद, फ्रान्समधला नवप्रवाह, समाजवादी देशांतील वास्तववादी चित्रपट, जपानमध्ये अकिरा कुरोसावा व स्वीडनमध्ये इंगमार बर्गमनचा उदय यामुळे काही काळ हॉलीवूडपटांचे वर्चस्व कमी झाले. या सर्व नव्या मंडळींनी चित्रपटांना एक नवे कलात्मक भान दिले आणि चित्रपट हीदेखील इतर अनेक पारंपारिक कलांप्रमाणे स्वयंभू, संवादी कला आहे, याची जाण पसरविली. जागतिक चित्रपटात आलेल्या या नव्या लाटेच्या प्रभावाने प्रेरित होऊन विविध देशांत अनेक कलावादी चित्रकर्ते पुढे आले आणि सर्वत्र व्यावसायिक चित्रपटांहून वेगळा, आपलं कलापूर्ण व्यक्तिमत्व जपणारा ‘नवा’ चित्रपट निर्माण होऊ लागला. चित्रपटांत फार मोठं मन्वंतर आणणारी ही इतिहासातील फार मोठी घटना ठरली. वर नमूद केलेल्या विविध मार्गांनी आलेल्या या नव्या लाटेचा प्रभाव त्या काळात विशेष जाणवत असला तरी हॉलीवूडपटांची मक्तेदारी कमी झालीच नाही. काही काळ त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले, हे खरे, परंतु त्यांचा ठसा पुसला गेला नाही. या सर्व घडामोडीतच ‘जेम्स बॉण्ड’ आणि ‘गॉडफादर’च्या आवृत्त्या देशोदेशात निघतच राहिल्या.

अमेरिकन व हॉलीवूडपटांचा प्रभाव भारतीय चित्रपटांवरही तेवढाच दिसून येतो. दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांचा शुभारंभ केला. त्यांना हा चित्रपट करण्यासाठी प्रेरणा मिळाली ती ‘लाईफ ऑफ ख्राईस्ट’ या परदेशी चित्रपटातूनच ! नंतरच्या काळात, म्हणजे विशेषतः तिसऱ्या व चौथ्या दशकात, तर हॉलीवूडपटांच्या लोकप्रियतेने आपल्या चित्रकर्त्यांना सातत्याने अशी प्रेरणा लाभत गेली. हॉलीवूडचा हा प्रभाव भारतीय चित्रपटांवर आजतागायत जाणवतो आहे. हॉलिवूडच्या तुलनेत आपण कमी पडतो अशा न्यूनगंडाचा परिणामही मधल्या काळात दिसून आला. आपल्या चित्रपटांना हॉलिवूडची मान्यता मिळावी ही महत्वाकांक्षा या न्यूनगंडातूनच भारतीय चित्रकर्त्यांत आली. या काळात अनेक कलावंतांनी हॉलीवूडपटात भूमिका मिळविण्याचा प्रयत्न केला तर मान्यवर दिग्दर्शकांनी आपले चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकेकाळी भारतीय कलावंत, दिग्दर्शक यांची ‘भारताचा डग्लस फेअरबॅक’, ‘भारताची ग्रेटा गार्बो’, ‘भारताचा सेसिल बी डिमिल’ अशी प्रसिद्धी केली जात असे. हे सारे त्या न्यूनगंडाची द्योतक आहे. एकूणच आपल्या चित्रकर्त्यांना हॉलिवूडचे भलतेच आकर्षण वाटत राहिले. काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश चित्रपटकर्त्यांनी हॉलिवूडचे अनुकरण केले अगदी आजही त्याचा प्रत्यय येतो आहे. आजही हॉलिवूडच्या कथा आणि त्यांची शैली यांच्या नकला पहायला मिळतात.

आपल्याकडील हॉलिवूडच्या या वर्चस्वाला पहिला हादरा जानेवारी १९५२ मध्ये मुंबईत भरलेल्या पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दिला. भारतीय प्रेक्षक आणि चित्रकर्ते यांना या महोत्सवानेच हॉलीवूडबाहेरचा जागतिक चित्रपट पाहण्याची पहिली संधी प्राप्त करून दिली. इतरत्र होणारे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व जागतिक चित्रपट बाजारपेठ यांत खळबळ उडवून देणारे इटलीच्या रॉबर्टो रोझेलिनी व डी चिकाचे नववास्तववाद शैलीतले चित्रपट याच महोत्सवाद्वारा भारतात आले. आपल्या प्रेक्षकांचा त्यांना चांगला प्रतिसाद लाभला, इतकेच नव्हे तर आपल्या सजग आणि सर्जनशील चित्रकर्त्यांनाही त्यांनी विचार करायला लावले, आपल्याकडे आकर्षित केले. तिसऱ्या आणि चौथ्या दशकात आपल्याकडे जरी ‘तुकाराम’, ‘दुनिया ना माने’, ‘देवदास’, ‘जिंदगी’, ‘आदमी’, ‘सावकारी पाश’, ‘धरती के लाल’, ‘सीता’ असे वास्तववादी चित्रपट बनले होते, तरी या महोत्सवानंतरच्या म्हणजे सहाव्या दशकातल्या चित्रपटांचीच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.

कारण या चित्रपटांना निश्चित अशा एका एकॅडेमिक चळवळीचे, कलावादी थिअरीचे अधिष्ठान होते. वर नमूद केलेले चित्रपट हे वास्तववादी शैलीतले तुरळक प्रयत्न होते. त्यामागे कुठेही एका व्यापक चळवळीचे, एका नव्या पठडीचे, परिभाषेचे भान नव्हते. ते भान प्रथम दिले इटालियन निओरिऍलिझमने ! या नववास्तववाद शैलीने प्रभावित होऊन ‘दो बिघा जमीन’, ‘बुटपॉलीश’, ‘मुन्ना’ असे काही चित्रपट बनले आणि त्यांनी भारतीय चित्रपटात एक नवा दृष्टिकोन आणला. या चित्रपटांना, विशेषतः ‘दो बिघा जमिन’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. आणि १९५६ मध्ये जेव्हा सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ चा फ्रान्समध्ये पारितोषिक देऊन गौरव झाला तेव्हा पाश्चिमात्य टीकाकारांनी ‘भारतीय चित्रपटांकडे दुर्लक्ष करता येणार नाही’ याची खूणगाठ बांधली. सत्यजित रायना पश्चिमेत खूप मानसन्मान लाभले. न्यूयॉर्कच्या आर्ट थिएटर्समध्ये ‘पाथेर पांचाली’ ने एक नवा उच्चांक प्रस्थापित केला. त्याच्या या यशापाठोपाठ रे यांच्या ‘अपराजिता’ला १९५७ साली व्हेनिस येथे ग्रां. प्री. हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला. तर तोच सन्मान त्याच वर्षी कार्लोव्ही व्हेरी येथे राजकपूरच्या ‘जागते रहो’ ला लाभला. पुढच्याच वर्षी शांतारामबापूंच्या ‘दो आँखे बारह हाथ’ला बर्लिन येथे परीक्षकांचे खास पारितोषिक मिळाले. तसेच अमेरिकन समीक्षकांनीही पुरस्कार देऊन त्याला गौरविले. या सर्व पुरस्कार, मानसन्मानामुळे भारतदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट चित्रपट बनवू शकत याची जाणीव जगभर पसरली. त्यानंतर आजतागायत, विशेषतः सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत अशी गौरवशाली कामगिरी केली. जपानचे कुरोसावा, स्वीडनचे बर्गमन, इटलीचे अँतोनिओनी, फ्रान्सचे फ्रान्स्वा त्रुफॉ, तसे भारताचे सत्यजित रे यांची जगातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या गणना होऊ लागली.

‘पाथेर पांचाली’पासून असे, आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या सत्यजित रे यांच्या चित्रपटांच्या दर्जाचे चित्रपट भारतात थोडे आगेमागे इतर दिग्दर्शकांनीही दिले. रे यांच्या ‘जण अरण्य’ ह्या चित्रपटाचा कार्लोव्हिव्हेरी येथे गौरव झाला. त्याच वर्षी त्याला आपल्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी बी. व्ही. कारंथ यांच्या ‘चोमन्ना दुडी’व गुलजारच्या ‘मौसम’शी स्पर्धा करावी लागली. अखेर त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘चोमन्ना दुडी’ व ‘मौसम’ची निवड होऊन सत्यजितना मात्र फक्त सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एवढ्या गौरवावरच समाधान मानावे लागले. त्यांच्या ‘अशनी संकेत’च्या बाबतीतही हेच घडलं. परदेशात मानसन्मान मिळविणाऱ्या या चित्रपटाला निर्माल्यम, काडू, स्त्रीरपत्र या चित्रांच्या स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारात यश लाभले नाही. इथे सत्यजित यांच्या, आंतरराष्ट्रीय सन्मान लाभलेल्या चित्रपटांना कमी लेखण्याचा हेतू नाही. मुद्दा हा आहे की त्या चित्रपटांच्या तोलामोलाचे चित्रपट इतरही दिग्दर्शक इतर भारतीय भाषांत बनवीत होते. कारणे काहीही असोत, रे यांचे चित्रपट परदेशात जात होते, त्यांचा गौरव होत होता आणि वर नमूद केलेल्या अशा अनेक चित्रपटाना ती संधी लाभत नव्हती. यातून एक निष्कर्ष मात्र काढता येऊ शकतो, आणि तो म्हणजे आपणही जागतिक पातळीवर श्रेष्ठ ठरणाऱ्या दर्जाचे चित्रपट तयार करत आहोत. गुणवत्तेत ते इतर अनेक देशांतील चित्रपटाना मागे टाकतात. हॉलीवूडपटांपेक्षाही ते सरस असतात.

अमेरिकन नियतकालिकात लिहिणाऱ्या लेखकांना फक्त सत्यजित राय माहित असतील आणि ते जर भारतीय चित्रपटात फार मोठे मन्वंतर घडवून आणणाऱ्या ऋत्विक घटक, मृणाल सेन, मणी कौल, कुमार सहानी, तपन सिन्हा, गिरीश कर्नाड, बी. व्ही. कारंथ, एम. एस. सथ्यू, बासू चटर्जी, शाम बेनेगल, वासुदेवन नायर, अदूर गोपालकृष्णन, अरविंदन, गिरीश कासारवल्ली, गुलजार आदी पुरोगामी चित्रकर्त्यांकडे दुर्लक्ष करणार असतील तर भारतीय चित्रपटांच्या दर्जात काही उणेपण नसून या अमेरिकन लेखकांच्या अज्ञानात त्यांच्या निष्कर्षांचे बीज आहे, असे म्हणावे लागेल.

श्रेष्ठ दर्जाचे भारतीय साहित्य आणि समृद्ध कलापरंपरा यांच्या सहाय्याने भारतीय चित्रपट सातत्याने आंतराष्ट्रीय दर्जा राखू शकतात / पश्चिमी राष्ट्रांनी त्यांचं अमर्याद साहित्यविश्व आणि श्रेष्ठ दर्जाचं तांत्रिक ज्ञान या जोरावर सतत भारतापेक्षा चांगली कामगिरी केलीय, हे खरं. भारताला यंत्रसामग्री व कच्ची फिल्म यासाठी आजही परदेशावर अवलंबून राहावे लागते आहे. स्पेशल इफेक्टसचा अत्यंत शास्त्रशुद्ध परिणाम साधण्यासाठी आजही आपल्या चित्रकर्त्यांना परदेशी वाऱ्या कराव्या लागतात. या साऱ्या मर्यादा आणि उणिवा यांच्या परिघात राहूनदेखील आपले चित्रकर्ते सतत आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट देत आले आहेत, हे कौतुकास्पद आहे.

भारतीय चित्रपटांवर केवळ झोड उठविणारे अमेरिकन समीक्षक भारतीय चित्रपटांचा गेल्या काही वर्षांतला प्रवास वस्तुनिष्ठपणे पाहात नाहीत असंही त्यांच्या एकूण लेखनावरून जाणवतं. सत्यजित रे यांच्याशिवाय इतर अनेक कलावादी दिग्दर्शकांचा चित्रपट त्यांच्यापर्यंत पोचला नाही व त्यांनी तो जाणून घेतला नाही हा जसा मुद्दा मी वर मांडला, तस माझं त्यांच्याविषयीचा आणखी एक निरीक्षण इथे मला मांडायला हवं. भारतीय चित्रपटांवर सरसकटपणे ते मागासलेले आणि भडक आहेत अशी टीका करताना त्यांच्या समोर फक्त आपला बॉक्स -ऑफिसवाला चित्रपट आहे. हा चित्रपट कलात्मक पातळीवर हिणकस आहे, हे मान्यच करायला हवे. पैसा आणि भरपूर पैसे मिळविण्यासाठी सेक्स, व्हायोलन्स, गुन्हेगारी व मेलोड्रामा विकण्याचा धंदा या चित्रपटाने सातत्याने केला, करीत आहेत हे ही खरे. चित्रपट ही एक कला आहे हा विचार दूर लोटून, केवळ धंद्याची काळजी घेत, केलेले असे हिणकस चित्रपट फक्त भारतात तयार निघतात असे नाही. अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, जपान आदी अनेक देशांत लैंगिक दृश्यांची रेलचेल असलेले बाजारू चित्रपट निघतात, ते धंद्यावर डोळा ठेवूनच. परदेशात देखील सेक्स, व्हायोलन्स यांचा अतिरेक असलेले चित्रपट निघतच असतात. आणि तेही आपल्या चित्रपटांइतकेच हिणकस असतात. जगभर सर्व देशांत कलात्मक आणि बाजारू चित्रपट बनतात. त्यांचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी कमीअधिक असतं, इतकंच. भारत जगात संख्येने सर्वात अधिक चित्रपट निर्माण करणारा देश आहे. त्यामुळे आपल्या हिणकस चित्रपटांची संख्या मोठी दिसते, आणि म्हणूनच नीट अभ्यास न करता बेधडक अशी विधान केली जातात.

अमेरिकन समीक्षकांप्रमाणे आपले समीक्षकदेखील आपल्याकडच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात येणारे देशोदेशीचे मोजके चांगले चित्रपट पाहून आपल्या चित्रपटांवर टीका करतात. त्यांनीही जगभरची एकूण चित्रपटनिर्मिती, विविध देशांतील चांगल्यावाईत चित्रपटांचे प्रमाण लक्षात घेऊनच आपली मते बनवायला हवीत. म्हणजे त्यांची ही टीका अमेरिकन समीक्षकांसारखी एककल्ली होणार नाही.


पुस्तकाचे नाव :- बखर सिनेमाची
लेखक :- वसंत साठे
मुद्रक, प्रकाशक :- किरण व्ही. शांताराम

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर

जयश्री दानवे यांचा स्मिता पाटील यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा "तेजस्विनी" हा लेख अत्यंत उत्तम असा आहे .स्मिता पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे अत्यंत समर्पक शब्दात लेखिका जयश्री दानवे यांनी मुल्यमापन केलेले आहे .

संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया