अतिथी कट्टा

दिनांक : २५-०१-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌बाळासाहेब माझ्यात संचारले होते : नवाजुद्दिन
बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट आजपासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी यानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याबद्दल सिद्दीकी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं हे मनोगत.

——

नवाजुद्दिन सिद्दीकी?

बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व रुपेरी पडद्यावर साकारणं हे खरोखरीच माझ्यासाठी खूप अवघड काम होतं. त्यामागचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या आयुष्यात खूप वेगवेगळे रंग आहेत. त्यामुळे अशा विविधरंगी व्यक्तीवरील आयुष्यावरील चित्रपटात किंवा ती व्यक्तिरेखा साकारायला जगभरातील कोणत्याही अभिनेत्याला आवडेलच. त्यामुळे ही भूमिका माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान मानतो. राऊतसाहेबांनी जेव्हा मला हा चित्रपट तू करतोयस असं सांगितलं होतं, तेव्हापासून बराच काळपर्यंत माझा त्यावर विश्‍वासच बसत नव्हता. त्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग जेव्हा जवळ आलं होतं तेव्हा मी खूप नर्व्हस झालो होतो. परंतु, याचवेळी मी त्यांच्याबाबतचा खूप ‘रीसर्च’ केला. त्यांच्याबाबत खूप वाचलं. ‘यू ट्यूब’वरील त्यांचे भाषणाचे सर्व व्हिडीओज मी पाहिले. राऊतसाहेबांकडून बाळासाहेबांबाबतच्या अनेक गोष्टी समजावून घेतल्या आणि प्रत्यक्ष सेटवर दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना माझ्याकडून त्यांना अपेक्षित असलेलं काम काढून घेतलं. एक मित्र या नात्यानं त्यांनी मला सेटवर ट्रीटमेंट दिली. कलाकार हा खूप नाजूक असतो. त्याला जर का तुम्ही थोडा जरी आत्मविश्‍वास दिला तरी तो तुमच्यावर जीव ओवाळायला तयार असतो. तो आत्मविश्‍वास मला अभिजित पानसे यांनी दिला. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व माझ्यात एवढं संचारलं होतं की झोपेतून मला अचानक उठवलं तरी मी त्यांचं अर्ध्या तासाचं भाषण करू शकायचो. बाळासाहेबांची भाषणाची शैली, लोकांमध्ये जाऊन त्यांचं मिसळणं मला अचूक पकडायचं होतं. टीमच्या पाठबळामुळे मला ते शक्य झालं.

उद्धव ठाकरे

बाळासाहेब आणि मॉंसाहेब यांचा पुत्र होण्याचं भाग्य मला लाभलं. ५२ वर्षांचा सहवास मला लाभला. बाळासाहेबांचं आयुष्य पडद्यावर दोन तासांमध्ये संजय आणि त्याची टीम कशी दाखवते, हे पाहायला मीदेखील उत्सुक आहे. परंतु, मला कल्पना आहे, की हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. बाळासाहेबांनी जगण्याचं धाडस दिलं. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे माझ्या वडिलांना सांगायचे की, तुझ्यात आत्मविश्‍वास पाहिजे. तो तुझ्यात असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा. तुला मरण नाही. काही दशकांपूर्वी हा आत्मविश्‍वास मराठी माणसांनी गमावला होता. तो आत्मविश्‍वास आपल्या देशात हिंदूंनी गमावला होता. तो आत्मविश्‍वास पुन्हा मिळवून देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. त्याच आत्मविश्‍वासाच्या बळावर आजवर आपण पुढं चाललो आहोत.

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया