अतिथी कट्टा

दिनांक : २९-०७-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌बाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.

स्वरतीर्थ सुधीर फडकेंची जन्मशताब्दी २५ जुलै २०१८ ला सुरु झाली. त्यांची पुण्यतिथी २९ जुलै २००२.

——

महाराष्ट्रातील थोर संगीतकार स्व. सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा सुरु होत आहे. जेष्ठ संगीतकार, पार्श्वगायक, चित्रपट निर्माते अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. जीवनभर त्यांनी संगीताची साधना केली. गीत रामायणाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देश व विदेशात कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी माणसांना मंत्रमुग्ध केले. मराठी व हिंदी चित्रपटातील गीतांना संगीत देऊन, स्वतः गाऊन त्यांनी ती अजरामर केली. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान हे लक्षणीय आहेच. परंतु बाबुजींची आणखी एक ओळख म्हणजे ते प्रखर देशभक्त होते. पोर्तुगीजांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झालेल्या दादरा – नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात त्यांनी हिरीरिने भाग घेतला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची निर्मिती हा त्यांच्यातील देशभक्तीचा आणखी एक उत्तम असा वस्तुपाठ होता. स्वा. सावरकर त्यांचे दैवत होते. त्यांच्या वरचा चित्रपट निर्मिती त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण होता.

स्वा. सावरकरांचे जीवन कार्य भारतातील नागरिक व तरुण पिढीपर्यंत पोचवण्याचे त्यांचे स्वप्न होते. स्वा. सावरकर हे केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचे आहेत त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून स्वा. सावरकरांचे व्यक्तिमत्व त्यांचे विचार, त्यांनी केलेली सामाजिक क्रांती, स्वातंत्र्यलढ्यात घेतलेला सहभाग अधिकाधिक जनतेपर्यंत पोचला पाहिजे, तरुणांना त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे अशी बाबुजींची धारणा होती. त्यामुळे त्यांनी व हिंदी भाषेतून चित्रपट निर्माण केला सावरकरांवरील चित्रपट निर्माण करणे हे आपले एक मिशन ठरविले. वास्तविक, रणभूमी व कला क्षेत्रातील मंडळी बऱ्याचदा वैचारिक तत्वज्ञानाशी बांधील न राहणेच पसंद करतात, परंतु बाबूजी त्याला अपवाद होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावरकर, हिंदुत्व या विषयांशी असलेली बांधिलकी त्यांनी कधी लपविली नाही. सावरकर चित्रपट, हा लोकांनी लोकांसाठी केलेला चित्रपट व्हावा, असे त्यांनी ठरविले व यासाठी त्यांनी सावरकर दर्शन प्रतिष्ठान या न्यासाचे १९८५ मध्ये मुंबईत स्थापना केली. सर्वसामान्य लोकांनी अर्थ साहाय्य करावे व त्या निधीतून चित्रपट व्हावा अशी त्यांची भूमिका होती. सावरकरांवर चित्रपट काढणे हे सोपे काम नव्हते तर ते शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. बाबूजींनी त्यासाठी अथक परिश्रम केले. त्यासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही करायचे सोडले. पार्श्वगायनाचाही जवळ – जवळ त्याग केला. सुमारे चार- पाच वेळा जगभ्रमण केले. परदेशात निधी संकलनासाठी गीत रामायणाचे कार्यक्रम केले. इंडिया हेरिटेज फाउंडेशन या संस्थेचीही विदेशात धन संकलन करण्यासाठी संस्था स्थापन केली. या चित्रपट निर्मितीत अनेक अडचणी आल्या. बाबूजींनी अनेक लेखकांचे सहाय्य घेतले. दिग्दर्शक बदलले. त्यांच्या मनासारखे काम झाले नाही तर ते चित्रीकरणातून बाद करावयाचे. यामुळे चित्रपट निर्मितीत अनेक वर्ष गेली. पण या सर्व काळात ते डगमगले नाहीत कारण स्वा. सावरकर त्यांची प्रेरणा व आदर्श होते.. सावरकर चित्रपट निर्माण करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता.

सावरकर चित्रपटाची ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी त्याच्याशी संबंधित असलेली माणसे म्हणत की ‘वीर सावरकर’ चित्रपट झाला तो सुधीर फडके यांच्यामुळेच व तो लांबला तो ही सुधीर फडके यांच्यामुळेच. बाबूजींनी संकल्पना मांडली होती ती १९८५ – ८६ मध्येच. या चित्रपटाचे प्रत्यक्ष शूटिंग (चित्रीकरण) सुरु झाले १९९२ मध्ये व चित्रपट प्रदर्शित झाला २००२ मध्ये.

बाबूजींच्या स्वभावाचे, विशेषतः त्यांच्या हट्टी पणाचे अनेक प्रसंग त्यांच्या चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात दिसतात. बाबूजींचा स्वभाव हेकट जरूर होत, परंतु ते ‘परफेक्टनिस्ट’ होते. सावरकरांच्या जीवनावर चित्रपट काढणे मोठे आव्हानच होते. कारण सावरकरांसारख्या जेष्ठ व श्रेष्ठ महापुरुषाचे जीवन तीन तासांच्या चित्रपटात दाखवणे हे महाकठीण काम. त्यामुळे त्यातील पटकथा, प्रसंग, कलाकार निवड, भाषा, दिग्दर्शन इ. च्या बाबतीत बाबूजींचे अनेक जणांशी मतभेद झाले. आपण जे – जे प्रसंग व चित्र दाखवणार आहोत ते जनतेपर्यंत पोचणार होते. त्यामुळे ते सर्व निर्दोष व सर्वोत्तमच असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असावयाचा.

कोणतेही काम एकदा स्वीकारलं की ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होतोत पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता. पलंगावर चादर अंथरुण असो, पत्राची नीट घडी घालून ते पाकिटात व्यवस्थित घालणे असो, चादरीला घडी पडता कामा नये, पत्राची घडी करताना कागदाचा एकही कोपरा दुमडता काम नये किंवा सही खाली ‘अध्यक्ष’ हा शिक्का तरी वेडावाकडा मारता कामा नये. याबद्दल ते स्वतः अतिशय काळजी घेत आणि दुसऱ्यालाही काळजी घ्यायला लावीत. हा हट्ट किंवा वेडेपणा नव्हता. पण घडी न पडलेल्या बिछान्यावर झोपताना मन किती प्रसन्न होईल, आपण पाठवलेलं सुंदर घडी घातलेलं पत्र पाहून ते वाचणाऱ्यांचं मन किती प्रसन्न होईल याचा ते विचार करीत. कार्यालयातील मंडळी सुरुवातीला विचारात पडायची पण हळूहळू हे सारं त्यांच्याही अंगवळणी पडायचं आणि मनोमनी ते बाबूजींचे आभार मानीत. बाबूजींच्या या स्वभावाचे प्रतिबिंब चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत दिसते.

बाबूजी हे फणसासारखे होते. बाहेरून जेवढे कडक, शिस्तशीर तेवढेच मृदू हृदयाचे व हळवे होते. संवेदनशील होते. आपल्या सहकाऱ्यांवर एकीकडे रागवायचे पण दुसरीकडे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही ते मारत असत.

पोर्ट ब्लेअरला चित्रीकरणासाठी बाबूजी, दिग्दर्शक वेद राही व कलाकार मंडळींसह सुमारे ७५-८० जणांचा ताफा गेला होता. त्यावेळेस अंदमानला जाण्यासाठी विमाने आत्ताच्या तुलनेत फारच कमी होते. चेन्नई विमानतळावरून पोर्ट ब्लारचे विमान उडण्यासाठी ४-५ तासांचा अवधी होता. रात्र झाली होती. बाबूजी, वेद राही इ. मान्यवरांसाठी खोल्या आरक्षित होत्या. परंतु बाबूजींनी व्यवस्थापकांना असे सांगितले की माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी विश्रांतीच्या खोल्या उपलब्ध नसतील तर मी ही त्यांच्याबरोबर बाहेरच थांबीन आणि बाबूजींनी हा शब्द खरा केला. सहकाऱ्यांविषयीच्या प्रेमाचे हे आणखी एक वानगीदाखल उदाहरण.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांची नितांत श्रद्धा व निष्ठा होती. सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध असताना त्यांच्या वडिलांनी छोट्या रामला रत्नागिरीला मुद्दम नेले होते. सुधीर फडकेंचे पाळण्यातले नाव राम होते. त्यांचे वडील कोल्हापूरमधले प्रख्यात वकील होते. आपल्या गोड गळ्याच्या मुलाने स्वा. सावरकरांना गाणे ऐकवून त्यांची शाबासकी मिळवावी, हा त्यामागचा हेतू होता. आपल्या सुरेल आवाजात मोठ्या धीटपणे दोन तीन गाणी त्या ११ वर्षांच्या मुलाने त्या महान क्रांतिकारकापुढे म्हटली. त्या गाण्यावर लुब्ध होऊन त्याला प्रेमाने जवळ घेऊन सावरकरांनी आपले एक पुस्तक त्यावर स्वाक्षरी करून बक्षीस म्हणू दिले. त्या पुस्तकाचे नाव होते ‘मोपल्यांचे बंड’ अर्थात ‘मला काय त्याचे?’ आपल्या देशाची व समाजाची स्थिती फार दयनीय आहे. तेंव्हा हे पुस्तक तू परत परत वाच, समजून घे आणि तुझ्या सर्व मित्रांना ते वाचयला दे. पुस्तकाचा प्रचार कर, असा सल्ला त्या लहानग्या मुलाला सावरकरांनी दिला. व्हीडिओपार्जीत धनाप्रमाणे सुधीर फडकेंनी ते पुस्तक जपून ठेवले. सावरकरांवर चित्रपट काढण्याची मुहूर्तमेढ त्याचवेळी बाबूजींच्या मनात बहुधा बसली होती.

ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरच्या चित्रीकरणाचा आणखी एक प्रसंग. चित्रपटातील एक सहकारी कलाकार बाबूजींना म्हणाला, “या चित्रपटातला एक कलाकार म्हणून इथं तुमच्या समोर आहे. माझ्या आयुष्यातला किती सुंदर आणि अविस्मरणीय योगायोग आहे. बाबूजी, माझ्या मित्राचे वडील सावरकर प्रेमी आहेत. त्यांनी ह्या किनाऱ्यावरची, ही, सावरकरांचा स्पर्श झालेली रंगीत वाळू घेऊन ये म्हणून सांगितलं आहे. तुम्ही तुमच्या हाताने ही वाळू द्या. ” मी असं म्हणताच बाबूजींचा गळा दाटून आला. बाबूजींनी हातातले मोजे काढले आणि त्या बर्फासारख्या गार वाळून हात घालून पसाभर वाळू माझ्या हातात दिली. मोडक्या तोडक्या स्वरात बाबूजी म्हणत होते, ‘सागरा प्राण तळमळला’.

स्वा. सावरकरांना बाबूजी भेटले ते १९३० मध्ये. आणि तेव्हापासून त्यांच्या हृदयात सावरकर बसले ते कायमचेच. सावरकरांवरील चित्रपट पूर्ण करूनच त्यांनी आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता संपवली. इंग्रजी भाषेतील determination, devotion, dedication आणि discipline या चार ‘डी’ मुळेच बाबूजी आपले ध्येय साध्य करू शकले.

स्व. बाबूजींनी ज्या सावरकर दर्शन प्रतिष्ठानची स्थापना केली, ती संस्था बाबूजींचे स्वप्न पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. बाबूजींनी वीर सावरकर चित्रपट हिंदी भाषेतून काढला. हा चित्रपट भारतातील प्रमुख १४ भाषांमधून तयार व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार प्रतिष्ठानने हा चित्रपट मराठी आणि गुजराती भाषांमधुन ‘डब’ केला आहे. पुढील काळात तो अन्य भाषांमध्येही तयार करून भारतातील सर्व भागांमध्ये स्वतंत्र्यवीर सावरकरांचे विचार पोचतील असा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न राहिली. चित्रपट निर्मितीबरोबरच सावरकर दर्शन प्रतिष्ठान संस्था राष्ट्रवादी विचारांचे संक्रमण करण्यासाठी आपले वेगवेगळे उपक्रम योजत असते. बाबूजींच्या प्रेरणेने सुरु झालेली ही संस्था त्यांचा वसा पुढे नेईल. बाबुजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

रवींद्र माधव साठे

सचिव

सावरकर दर्शन प्रतिष्ठान

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर

  लेखिका जयश्री दानवे यांनी आपले वडील नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या सांगितलेल्या आठवणी या मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत.

  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया