अतिथी कट्टा

दिनांक : २४-०३-२०१८

‌‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…


शुक्रवारी २३ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बबन’ चित्रपटामधील शीर्षक व्यक्तिरेखा साकारणारा भाऊसाहेब शिंदे प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. या चित्रपटाबद्दल भाऊसाहेब शिंदे यांचं हे मनोगत.
——–


‘ख्वाडा’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भाऊंनी मला ‘बबन सिनेमा तू करतोयस’ असं थेट सांगून टाकलं. लगेचच त्यांनी माझा ‘लुक’ डिझाइन केला. ‘ख्वाडा’मधील माझी भूमिका एकदम रांगडी होती. तसेच तो मितभाषी, स्वप्नाळू, लाजाळू होता. माझा स्वभावही थोडा फार तसाच असल्यामुळे ती व्यक्तिरेखा साकारणं मला तसं सोपं गेलं होतं. परंतु, ‘बबन’ची व्यक्तिरेखा ‘ख्वाडा’च्या तुलनेत खूप वेगळी आणि चॅलेंजिग आहे. ही भूमिका रोमँटिक आहे. ‘ख्वाडा’च्या तुलनेत या चित्रपटात माझ्या वाट्याला खूप संवादही आले. ‘ख्वाडा’मधला नायक हा वडिलांच्या दबावाखाली दबलेला होता, तर या चित्रपटाधील नायक हा मोठ्या इच्छाशक्तीचा आहे. त्याची स्वप्नं मोठी होती. माझ्यासाठीचं मोठं चॅलेंज होतं ते माझ्या ‘स्क्रीन’वरील रोमँटिक भूमिकेचं. मी ग्रामीण भागात वाढलेलो आहे. शिरूरला पाचवी ते दहावीदरम्यान मुलं-मुली वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये बसायचे. त्यामुळे मुलामुलींची कधी भेटच व्हायची नाही. पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुली वर्गात असल्या तरी मुला-मुलींचे बसण्याचे बेंचेस वेगळे होते. त्यामुळे मुलींशी कधी बोलण्याची माझी वेळच आली नाही.

माझा लाजाळू स्वभाव भाऊरावला माहित असल्यामुळे त्यानं गायत्रीबरोबर माझं ‘बॉण्डिंग’ होण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानं पहिल्यांदाच मला गायत्रीचं तुला ऐकावं लागेल, असं सांगितलं. त्यानंतर जवळपास आम्ही चार-पाच महिने एकत्र फिरलो. त्यामुळे मुलींबद्दलची माझ्या मनातील भीती कमी झाली. ‘जगण्याला पंख फुटले’ या गाण्याचं गव्हाच्या वावरात शूटिंग चालू होतं. गायत्रीला उचलून गोल फिरायचा शॉट होता. त्याचे दोन-तीन रीटेक झाले. त्यावेळी भाऊराव मला म्हणाला की, तिला आणखी जोरात फिरव. यावेळी माझ्यातील पैलवानगडी जागा झाला नि मी तिला जोरात फिरवली नि ती कंट्रोलच नाही झाली. तिला घेऊन आम्ही दोघेही गव्हाच्या वावरात पडलो. गव्हाची कुसाळं तिच्या पाठीत घुसली. ती मग खूप ओरडायला लागली. एकदा आमचं तळ्यात शूटिंग होतं.

एक तर तिला पाण्याची खूप भीती वाटत होती. तसेच या भीतीत माझी आणखी भर पडली होती. गव्हाच्या कुसाळात मी तिला मुद्दामहून पाडलं असंच तिला वाटत होतं. त्यामुळे तळ्यातील तराफ्यातही मी तिला पाडीन अशी भीती वाटत होती. मग भाऊरावनी समजूत काढल्यानंतर आमचं ते शूटिंग पूर्ण झालं. चिखलाच्या खड्ड्यामधील सीनमध्येही काम करताना खूप त्रास झाला. चिखलात उडी घेताना गायत्री डोळे उघडेच ठेवायची. त्यामुळे डोळ्यात चिखल जाऊन ते सुजायचे. या सीनचे जवळजवळ १३ रीटेक्स झाले. दुपारी १२ वाजता सुरू झालेला सीन संध्याकाळी पाच वाजता संपला. असा आमचा पडद्यावरचा ‘रोमान्स’ रंगला.

‘ख्वाडा’च्या वेळी माझ्या शरीरयष्टीचा बांधा हा पैलवानी होता. मी वजनही वाढवलं होतं. तेव्हा भाऊंनी पहिल्यांदा माझ्या शरीरयष्टीवर काम करणं गरजेचं आहे, असं सांगितलं नि त्यानुसार माझं काम सुरू झालं. या चित्रपटासाठी मी जवळपास दहा किलो वजन कमी केलं. मी दररोज पाच किलोमीटर धावायला जायचो. ‘डाएट’ पाळणं मात्र खूप कठीण गेलं. लहानपणापासून मला दुधाची सवय आहे. जेवणात दूध नसेल तर एक घासही माझ्या घशाखाली उतरत नाही. मी शेतकरी माणूस असल्यामुळे एक वेळ ताटात भाजी नसली तरी चालेल, पण दूध आणि भाकरी हवी. दुधाच्या फॅट्समुळे वजन कमी होत नव्हतं. परंतु, दुधावरचा उतारा म्हणून पळायला सुरुवात केली. दररोज पाच किलोमीटर धावलं तर अर्धा लिटर दूध प्यायलं तरी काही फरक पडत नाही. भाऊराव हा माझा दिग्दर्शक असला तरी तो आधीपासूनचा माझा मित्र. क्लासमेट. तो मला एक वर्ष सीनिअर आहे. नगरमध्ये ‘कम्युनिकेशन स्टडीज’चं आम्ही एकत्रच शिक्षण घेतलेलं आहे. कामाचा तो खूप ‘सिलेक्टिव्ह’ आहे. एखादी गोष्ट आवडली तरच तो करतो. एखादा प्रसंग जोपर्यंत आपल्या मनासारखा होत नाही तोपर्यंत तो काम करतो. त्याचं लेखन दमदार आहे. त्याची पडद्यावर गोष्ट सांगण्याची पद्धत मला खूप आवडते. जे काही सांगायचं ते साध्या, सोप्या भाषेत तो सांगतो. प्रेक्षकांना त्याची ही पद्धतच आवडते.

चित्रपट मेकिंगमधील प्रत्येक अंगाचं त्याला ज्ञान आहे. गीतकारानं चांगलं गाणं लिहून दिलं तरी तो त्याला हवं तसं पुनर्लेखन करून घ्यायचा. ‘साज ह्यो तुझा’ हे गाणं ‘सोशल मीडिया’वर पहिल्यांदा झळकलं तेव्हा मी आईला फोन केला आणि तिला हे गाणं पाहायला सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली, ‘मी आता वांगी खुरीपतेय. तू मला नंतर फोन कर.’ अशा सगळ्या छान आठवणी हा चित्रपट मला देऊन गेलाय.

– भाऊसाहेब शिंदे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया