अतिथी कट्टा

दिनांक : ०४-०४-२०१८

‌असेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…

उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘असेही एकदा व्हावे’ हा चित्रपट येत्या ६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी दिलेलं संगीत सध्या खूप चर्चेत आहे. आपल्या नेहमीच्या शैलीच्या विपरीत संगीत देत गुप्ते यांनी संगीतरसिकांकडून कौतुकाची पावती मि‌ळवली आहे. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.
——–

हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातील गोड आठवण आहे. तो खूप ‌‘स्पेशल’ असण्यामागचं तीन कारणं आहेत. त्यामधलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचा दिग्दर्शक सुश्रुत भागवत. दुसरं कारण म्हणजेही सुश्रुत भागवत आणि तिसरं कारणदेखील सुश्रुत भागवतच आहे. बऱ्याच काळानंतर मला अशा एका दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळालं की ज्याला स्वत:च्या कथेबद्दल, दिग्दर्शनाबद्दल प्रचंड विश्वास होता. या चित्रपटात मी तीन वेग‌वेगळ्या जॉनरची गाणी संगीतबद्ध केली आहेत. वेगळा प्रयत्न करायला मला नेहमीच आवडतं. परंतु, तसे आपल्याला निर्माते-दिग्दर्शक भेटणं गरजेचं असतं. ‘असेही एकदा व्हावे’च्या निमित्तानं मला ते भेटले हे विशेष. निर्माता किंवा दिग्दर्शक यापैकी मला कोणीही विचारलं नाही की यातलं कोणतं गाणं सणासुदीदरम्यान डीजेवर वाजवलं जाईल. अशाप्रकारची गाणी त्यांनी मागितली नाहीत. हा त्यांचा मोठेपणा आहे. सुश्रुतची कथा अतिशय तरल आहे, ती त्याच्या मनातून आली आहे.

एखाद्या कवितेसारखी ही कथा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतर संगीतकारांना माझा हेवा वाटणार आहे. अशाप्रकारचं संगीत देण्याची संधी अवधूतला कशी मिळाली, असा प्रश्नही काहींना पडेल. वैभव जोशी हा फार मोठा कवी आहे. तो खूप ‘स्पॉंटेनियस’ आहे. हल्ली गाण्यांचे बोल हे खूप कमी शब्दांचे असतात. ते प्रेक्षकांना आवडतातदेखील. ‘ऐका दाजिबा’सारखं गाणी आम्हीच करून ठेवलंय. त्यामुळे त्याबद्दल कोणालाच दोष देता येणार नाही. पण सुश्रुत असा दिग्दर्शक मिळाला की त्यानं पहिल्यांदा माझ्यासमोर एक कविता ठेवली. ‘भेटती ती अशी… भेटली पुन्हा… किती आपली वाटते… कधी पाहिल्याविना… हे गाणं जन्मलं. चित्रपटामधील ‘आरजे’ व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नायिकेला अगदी साजेल असे हे शब्द आहेत. या शब्दांहून चांगले शब्द इतर कुणाला सुचतील असं मला तरी वाटत नाही. हे शब्दच एवढे प्रभावी आहेत की माझं ९० टक्के काम संगीताला सुरुवात देण्यापूवीर्च झालं होतं. उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये कंपोझिंग आलं. वैभवनं लिहिलेलं हे काव्य खूप चांगलं आहे. उमेश-तेजश्री या जोडीवर ही गाणी चित्रीत झाल्यानं त्यांची गोडी आणखी वाढली आहे. तेजश्रीनं माझ्या ‘झेंडा’ या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यामुळे आपलं ‌‘फाईंड’ पुढं जाताना पाहताना एक वेगळाच आनंद होतो.

या चित्रपटांच्या संगीताची ‘अरेंजमेंट’ही मीच केली आहे. सर्वसाधारणपणे हे काम मी करीत नाही. मी सुश्रुतला एका गाण्याचा ‘स्क्रॅच’ पाठवला. त्याला सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आला. या गाण्याच्या मूळ चालीमध्ये जी सहजता आहे ती आपण तशीच ठेवावी असं मला वाटलं. दिग्दर्शकालाही ती चाल आवडली असेल तर मग त्यात इतर गोष्टी कशासाठी भरायच्या ? त्यामुळे या चित्रपटाच्या संगीताची पूर्ण ‘अरेंजमेंट’ मी स्वत:च केली. एका गाण्यात जो पियानो आपल्याला ऐकायला मिळतो, तोदेखील मी स्वत:च वाजवला आहे. काही चित्रं अशी असतात की आपल्याला असं वाटत असतं की याची फ्रेम आपणच करावी. त्याला काचही आपणच बसवावी. ते भिंतीवर आपण स्वत:च्याच हातानं लावावं. कदाचित सुतारापेक्षा आपण लावलेलं चित्र वाकडं लागू शकतं. मात्र ते लावण्यामागचं प्रेम आपलं असतं. तसं काहीसं त्या अरेंजमेंटचं झालं आहे. या चित्रपटातील गीतांचं सगळं मिक्सिंग हे आदित्य ओक यानं केलं आहे. या चित्रपटामधील एका ठुमरीच्या चित्रीकरणात तो प्रत्यक्ष स्वत: दिसणार आहे. अद्वैत पटवर्धन यानं या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलं आहे. त्याचाही मी आवर्जून उल्लेख करीन. गझल वैभवनं लिहून पाठवली होती. ती कीर्ती किल्लेदारनं खूप ताकदीनं पेश केली आहे. मग मला मोह आवरला नाही. ती माझ्या आवाजातही मी डब केली. ‘ही सांज सुखाने’ हा माझ्या आयुष्यातला पहिला अल्बम. त्या अल्बमसाठी वैशाली सामंत आणि माझ्या आवाजात एक गझल रेकॉर्ड केली होती. बऱ्याच वर्षांनी मला गझलवर काम करायला मिळालं. ठुमरी मी करू शकेन की नाही अशी खुद्द सुश्रुतलाच शंका होती. तेव्हा मी त्याला म्हटलं की सलिल कुलकर्णी किंवा आणखी कोणाकडे जाण्याआधी एक संधी देऊन बघ. त्यानुसार त्यानं मला संधी दिली आणि माझ्याकडे समीर सामंतनं लिहिलेली ठुमरी आली. ‘यमन’ रागामध्ये मी ठुमरी केलीय. सावनी शेंडेनं ती गायलीय. चित्रपटामध्ये ती एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
या कामाचा मला कायम अभिमान आहे. माणसाच्या सुख-दु:खांमध्ये ही गाणी त्यांना साथ देतील असं मला वाटतं. आयुष्यभर ही गाणी संगीतरसिकांच्या गाडीत ऐकली जातील. माझ्या स्वत:च्या आयपॉड आणि फोनमध्ये माझी स्वत:ची गाणी कधीच नसतात. परंतु, ही गाणी केल्यानंतर ती माझ्याही गाडीत वाजताहेत, हेदेखील एक विशेषच.
———–
अवधूत गुप्ते

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

वसंत पी.

मी तान्हाजी चित्रपट पाहिला तो सुद्धा मराठीत. संवाद हिंदी मधले जास्त प्रभावी वाटत होते. का कोण जाणे (हे फक्त ट्रेलर बघून). मराठीतले संवाद आणखीन प्रभावी होतील असे काही तरी करायला हवे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया