अतिथी कट्टा

दिनांक : १९-१०-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…


‘अगडबम’ या २०१० मधील गाजलेल्या चित्रपटाचा ‘सीक्वेल’ येत्या २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तृप्ती भोईर यांना साथ दिलीय ते सुबोध भावे यांनी. तृप्ती भोईर यांचे पती टी. सतीश चक्रवर्ती यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तृप्ती भोईरने निर्मितीङ्गळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानं तृप्ती भोईर यांचं हे मनोगत.

——

‘माझा अगडबम’ या चित्रपटाची गोष्ट मला २०१२ मध्येच सुचली होती. जसे हिंदीमध्ये सीक्वेल पाहायला मिळतात. तसाच हा सीक्वेल आहे. मात्र हा चित्रपट पाहणार्‍यांनी पहिला भाग पाहिलाच असणं काही आवश्यक नाही. प्रेक्षकांना या ‘सीक्वेल’मध्ये पूर्णपणे नवीन गोष्ट पाहायला मिळेल. पहिल्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीशी काहीच संबंध नाही. जाडी बायको नि बारीक नवरा एवढंच काय ते त्यांच्या कथानकामध्ये साम्य आहे. ‘अगडबम’ हा ब्रँड आहे. यापुढे जाऊन मी सांगेन की हिंदीमधील काही सीरीजप्रमाणे ‘अगडबम’चीही भविष्यात मालिका होईल. याचा तिसराही भाग येईल, चौथाही भाग येईल. ‘अगडबम’मध्ये ‘सुपरमॅन’ आणि ‘स्पायडरमॅन’ सीरीज बनण्याची ताकद आहे. आपल्याकडे ‘सुपरपॉवर’ असलेलं हीरोचंदेखील कॅरेक्टर नाहीय. त्यामुळे ‘नाजुका’ला आता आम्ही ‘सुपर पॉवर’ कॅरेक्टर बनवलं आहे. ‘सीक्वेल’ करण्यासाठी एवढा वेळ लागण्यामागचं कारण म्हणजे मध्यंतरीच्या काळात मी ‘टुरिंग टॉकीज’, ‘हॅलो जयहिंद’ हे दोन चित्रपट केले. त्यामुळे सीक्वेल बनविण्यात वेळ गेला.

‘माझा अगडबम’मध्येही आम्ही खूप प्रयोग केले आहेत. मुळात पहिल्यात भागात आम्ही ‘प्रोस्थॅटिक मेकअप’चा प्रयोग केला होता. या प्रयोगाची गणितं अजूनपणे पूर्णपणे कळली नसली तरी ती समजून घेण्याचा प्रयत्न करीत आम्ही हा चित्रपट बनवला आहे. हल्लीच्या काळातली स्त्री ही प्रबळ आहे. मग ती कोणताही प्रांत, राज्य, देश किंवा जगामधील असू दे. ती शिकलेली असो की अशिक्षित. ती ठेंगणी असो की जाडी, लुळी असो. परंतु तिनं जर ठरवलं तर ती आजुबाजूचा समाज बदलू शकते. सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई ङ्गुले, बहिणाबाई चौधरी अशी अनेक आदर्श उदाहरणं आपल्याकडे आहेत. समाजाकडून कसलीही मदत मिळाली नसताना त्यांनी एकहाती बदल घडवला. या ‘आऊटलाईन’वर ही गोष्ट रचण्यात आली आहे. भारतीय स्त्रीच्या आयुष्याची दुभागणी झाली आहे.
वडिलांकडचं आयुष्य अजूनपणे पूर्ण जगूनही झालं नसताना तिची नवर्‍याच्या घरी पिटाळणी केली जाते. सासरी आल्यानंतर तिला माहेरची जराही बाजू घेता येत नाही. तसं झालं तर तिला लगेचच सासरच्या लोकांकडून बोलणी खावी लागतात. या सगळ्यात तिचं मरण होतं.

या चित्रपटामध्ये आम्ही केलेला दुसरा प्रयोग म्हणजे सुबोध भावेला पहिल्यांदाच विनोदी भूमिकेत सादर केलं आहे. एक गंभीर नट अशी सुबोधची इमेज हा चित्रपट तोडणार आहे. स्वत: सुबोध आपल्या कामावर खूप खूश आहे. या भूमिकेमुळे अभिनयातील आपली नवी इनिंग सुरू होईल, एवढा आत्मविश्वास त्याला वाटतो आहे. या चित्रपटाला कुस्तीची पार्श्वभूमी आम्ही दिली आहे. ‘डब्लूडब्लू’चे खरे कुस्तीपटू प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळतील. तसेच यात खरा सुमोही पाहायला मिळेल. तो खर्‍याखुर्‍या स्पर्धेमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधीत्व करतो. ‘सैराट’चा तानाजी गालगुंडे हा कलावंतही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यानं या चित्रपटात माझ्या म्हणजे ‘नाजुका’च्या पंटरची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाचं संगीत हे आणखी एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याला संगीत दिलंय ते माझा नवरा टी. सतीश चक्रवर्ती यांनी. विख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांचा तो तब्बल १८ वर्षं मुख्य सहाय्यक राहिलेला आहे. रेहमानसोबत त्यानं ‘लगान’, ‘जोधा अकबर’सारखे गाजलेले चित्रपट केले आहेत. या चित्रपटाची गाणी ऐकताना संगीतरसिकांना ‘रेहमानफ्लेवर’चा अनुभव मिळेल. सतीश यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. सतीशनं यापूर्वी आठ तमीळ आणि ३ तेलुगु चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत दिलं आहे. रेहमान यांच्या आग्रहाखातरच तो वेगळी जबाबदारी पत्करू शकला. सतीश बोस्टन, बर्कली येथील संगीत विद्यापीठातून शिकलेला आहे. तिथं त्याचा ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणूनही गौरव झाला आहे. त्याचे वडील कर्नाटकी संगीतामध्ये विशारद आहेत. सतीशच्या संगीतामध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा बाज आढळतो. त्यामुळे ‘अगडबम’ची गाणी झकास झाली आहेत. या चित्रपटामधील दोन गाणी श्रेया घोषालनं तर दोन गाणी स्वत: सतीशनं गायली आहेत. प्रत्येकी एक एक गाणं आनंद आणि आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. ’आसमान का थरथरते…’ असे बोल असलेले हे शीर्षकगीत इतके दमदार आहे कि, ऐकताना प्रत्येकाच्या अंगात अनोखे स्ङ्गुरण संचारते. मंगेश कांगणे यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहे. शिवाय अपेक्षा दांडेकरच्या दमदार आवाजामुळे हे गाणे अधिकच वजनदार बनले आहे. हे गाणं माझ्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग आम्ही मुंबईत केलं. मला कॅमेर्‍यासमोर जाण्यासाठी पाच तास लागायचे. माझ्या मेकअपचं वजन सुमारे ३५ ते ४० किलो इतकं होतं. एवढं वजन घेऊन मी १२ ते १४ तास काम करायचे. तसेच या वजनाबरोबरच लेखन, अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा इतर चार जबाबदार्‍याही माझ्यावरच होत्या. त्यामुळे सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी वजनदार होत्या. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही आम्ही खूप विचार केला. वेगळ्या धाटणीनं त्याची प्रसिद्धी केली. गणेशोत्सवादरम्यान मी अर्धा महाराष्ट्र ङ्गिरले. पूर्ण मेकअप करून मी पुणे, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद, मुंबई येथील गणेशोत्सवाच्या मंडळाला भेट दिली. तसेच २४ फूट उंचीचे ‘नाजूका’चे कटआऊट्स आम्ही महाराष्ट्रभर लावणार आहे. हा सगळा अनुभव खूपच जबरदस्त होता.

– तृप्ती भोईर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  शांताराम कांबळे

  मला वाटतं होते, मराठी मुलगी फक्त माधुरी दीक्षित ने हिंदी चित्रपट सृष्टीत खूप खूप कामे केली, पण, संध्या, रत्नमाला, नंदा, अशा कितीतरी, मराठी अभिनेत्री होत्या, होऊन गेल्या, याचा मला खूप🎉🎊 खूप अभिमान वाटतो, मी चित्रपट रसिक आहे.

  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया