अतिथी कट्टा

दिनांक : २६-०१-२०१८

‌‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर


प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आपला मानूस’ चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं श्री. पाटेकर यांचं या चित्रपटामधील आपल्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या अनुभवाबद्दलचं हे मनोगत.
———-

‘प्रकाश बाबा आमटे’, ‘नटसम्राट’ हे माझे आधीचे दोन चित्रपट. पहिल्या दोन चित्रपटांबद्दल मला थोडं असं सांगायचं आहे की, आमटे कुटुंबाबद्दल बोलण्यासारखं खूप काही होतं. खुद्द बाबांचं खूप मोठं काम होतं, तसेच प्रकाश, मंदा आणि भारती यांचंही स्वत:चं असं काम आहे. ‘नटसम्राट’च्या वेळी तात्यासाहेब शिरवाडकरांच्या सर्व साहित्याबद्दल बोलता येत होतं. मात्र ‘आपला मानूस’बद्दल नेमकं बोलायचं काय, असा मला प्रश्न पडतो. त्यामागचं कारण म्हणजे हे गोष्ट दुसऱ्याच्या तोंडून ऐकायची नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवायची आहे. याला कसलाही आगापीछा असा नाही. त्याबद्दल खूप काही सांगता येणार नाही. या चित्रपटात मी एका पोलिसाची भूमिका केली आहे. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी बरेच पोलिसाचे रोल्स केलेले आहेत. ‘आपला मानूस’मधील पोलिस वेगळा असण्यामागचं कारण म्हणजे त्याची गावची पार्श्वभूमी. तो गावातील असल्यामुळे त्याची बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तो गावातील असल्यामुळे तो ‘आपला मानूस’ आहे. अजय देवगणनं जेव्हा या चित्रपटाचा पहिल्यांदा ‘आपला मानूस’ असा उल्लेख केला तेव्हा अनेकांना वाटलं की अजय हा हिंदीभाषिक असल्यामुळे त्यानं ‘मानूस’ असा उल्लेख केला असावा. परंतु, तसं नाही. हा ‘मानूस’च आहे. हा ‘मानूस’ अगदी एक नंबर आहे. तो पोलिस असूनही प्रत्येकाला आपला वाटतो हे महत्त्वाचं. तो काही वेळा इंग्रजीमध्ये बोलत असला तरी ते पाहणाऱ्याला आपलंसं वाटतं. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी लेखक विवेक बेळे यांनी सतत या व्यक्तिरेखेच्या तोंडी खुसखुशीत असे संवाद दिले आहेत. गंभीर काहीतरी सांगताना प्रेक्षकांना मध्येच हसवायचं असतं.

अख्ख्या चित्रपटामध्ये पाहणाऱ्याला प्रश्न पडतो की हा नेमका काय आहे? पहिले पावणे दोन तास तुम्हाला खुर्चीच्या टोकावर बसून एक थ्रीलर पाहायला मिळतो. नंतरच्या अर्ध्या तासामध्ये चित्रपटाला संपूर्ण कलाटणी देण्यात आली आहे. त्याच्याबद्दल मला फारसं सांगता येणार नाही. कारण ही कलाटणी प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवी. विशेष उल्लेख करीन मी माझ्यासोबत काम करणाऱ्या सुमीत राघवन आणि इरावती हर्षे यांचा.या दोघांनी कोठेही चित्रपटाचा तोल जाऊ दिलेला नाही. दोघांनीही कमाल केली आहे. या चित्रपटातील कामाबद्दल दोघांना राष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन मिळालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी खूप मजा आली. खूप गमतीदार असा वेळ गेला. सतीशनं खूप आधी लिहिलेला हा चित्रपट आहे.

काही चित्रपट घडून जातात. आपल्या नकळत काही तरी होतं. हा चित्रपट मात्र घडला. त्यामधील प्रत्येक गोष्ट ही आखीवरेखीव होती. परफॉर्मन्समध्ये थोडं इकडंतिकडं होत राहतं. गमतीचा भाग म्हणजे या चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ आम्ही दुसऱ्या दिवशी चित्रीत केला. रहस्यप्रधान, थ्रीलर चित्रपटामध्ये मुहूर्तानंतर ‘क्लायमॅक्स’ चित्रीत करणं ही कलाकारांसाठी खूप अवघड गोष्ट असते. मला आनंद या गोष्टीचा आहे की, आम्ही जेव्हा हा चित्रपट सलग पाहिला तेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी केलेलं चित्रीकरण आणि सगळाच भाग नेमक्या जागी होता. आम्ही जे आडाखे बांधले होते, ते बरोबर निघाले, याचा आनंद जास्त आहे. संगीतकार, कॅमेरामननं छान काम केलं आहे.

साधारणपणे कोणताही चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की आमचा चित्रपट किती वेगळा, हटके आहे, हे सांगण्याची एक पद्धत असते. परंतु, मी तुम्हाला खरंच सांगतो माझ्या कारकीर्दीला आता ५० वर्षं झाली. या काही कारकीर्दीमध्ये मी काही मोजके चित्रपट असे केले की त्याचा मला अभिमान वाटतो. ‘आपला मानूस’ हा त्यापैकी एक चित्रपट आहे. मनोरंजन, आनंद त्यातून काहीतरी सांगणे या तीनही गोष्टी या चित्रपटानं साध्य केल्या आहेत. मी यापूर्वीचे दोन चित्रपट निखील सानेबरोबर केले. त्यावेळी तो दुसऱ्या वाहिनीबरोबर काम करीत होता. आता तो ‘व्हायकॉम’बरोबर आहे. पण तो जिथं असेल तिथं मी काम करणार. त्याच्याबरोबरचं माझं नातं वेगळं आहे.
त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर माझा विश्वास खूप छान आहे. ही मंडळी प्रेक्षकांपर्यंत आपला चित्रपट खूप छान पोचवतात. हल्ली नुसतंच पोचवणं महत्त्वाचं नसतं तर ओरडून सांगावं लागतं. निखीलची हे करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. हा चित्रपट एवढा परिणाकारक आहे की तो संपल्यानंतर प्रेक्षक जेव्हा चित्रपटगृहातून बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडणार नाही. प्रेक्षकांची विचित्र मन:स्थिती होईल. हा चित्रपट पाहून तो आपलं काही चुकलंय का, हा विचार करील. या चित्रपटाचं रहस्य दिग्दर्शक सतीश राजवाडेनं खूप छान उकल केलं आहे. एका कळीचं फूल होताना पाहण्यासारखा तो अनुभव आहे.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

गंगाधर ग.

काल मी माझ्या कुटुंबासोबत चोरीचा मामला हा चित्रपट पाहिला बनवला आहे. मराठी चित्रपट नवीन नवीन गोष्टी स्वीकारत आहे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया