अतिथी कट्टा

दिनांक : १४-०१-२०१८

‌सोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट


महाराष्ट्र सरकार विशेष उत्तेजनार्थ अनुदानाचे ‘बुस्टर’ मिळाल्यापासून मराठी चित्रपटांची निमिर्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरत्या २०१७ वर्षात चक्क शंभराहून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती झाल्याची आकडेवारी सेन्सॉर बोर्ड कार्यालयातून मिळते. ‘कासव’,‘रिंगण’,‘हलाल’ सारख्या मराठी चित्रपटांनी केवळ राष्ट्रीयच नव्हे तर, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतही विदेशी चित्रपट रसिकांकडून दाद मिळवली. परिणामत: गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्री चित्रपट महोत्सवात यंदा प्रथमच तब्बल नऊ मराठी चित्रपटांचा अंतर्भाव झाला होता! त्यामुळे मुंबईतील रवींद्र नाट्यगृहातले २१ ते २८ डिसेंबरपर्यंत झालेल्या सोळाव्या ‘थर्ड आय’ या आशियाई चित्रपट महोत्सवातही मराठी चित्रपटांची मोठया प्रमाणावर समावेश होणे अपेक्षितच होते.
———-

‘झिपऱ्या’

रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपनगरी गाड्यांतून प्रवाश्यांच्या पादत्राणांना पॉलिश करत आपला उदरनिर्वाह प्रामाणिकपणे करू पाहणाऱ्या पाच-सहा किशोरवयीन मुलांची गोष्ट हा चित्रपट सांगतो, रेल्वे पोलिसांना चिरीमिरी देऊन मुलांचा हा अनधिकृत धंदा चालू ठेवणारा पिंगुळयादादा (कलाकाराचे नाव कळले नाही ) दररोज रात्री मुलांकडून हप्ते वसूल करत असतो. एका पारशी शेठाणी कडे घरकाम करणारी झिपऱ्याची बहीण (अमृता सुभाष) पिंगुळयादादाशी लफड करतेय हे ऐकल्यावर संतापलेला झिपऱ्या (चिन्मय कांबळी) पिंगुळयाशी प्लेटफॉर्मवर मारामारी करतो. त्या दंगलीत पिंगुळया प्लेटफॉर्मवरुन खाली रूळावर पडून येणाऱ्या लोकलखाली कापला जातो. तेव्हा त्यांच्या टोळीचे दादापण आपोआपच झिपऱ्याकडे येते. पुढे काय होते ? शांत स्वभावाचा झिपऱ्या पिंगुळया प्रमाणेच गुंड होतो का ? पावसाळ्यात गिऱ्हाईक बुटांना पॉलिश करून घेत नाहीत म्हणून ओढाताण होणाऱ्या, आपल्या टोळीतल्या दोस्तांना पाकिटमार व्हायला तर प्रवृत करत नाही ना ? हे सारे पडद्यावर बघणे, केदारने कादंबरीचे चित्रकथेत कल्पकतेने माध्यमांतर खूपच उत्कंठावर्धक केले आहे. सर्वच कलावंतांनी कामे छान केली आहेत. पण अमृता सुभाष व प्रथमेश परब विशेष लक्षात राहून जातात…

‘क्षितीज’

एक ठळकपणे जाणवले ते असे की, महोत्सवातील बहुतेक साऱ्या मराठी चित्रपटात केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाची कास कलात्मकतेने धरण्यात आली आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दाखवण्यात आलेल्या आणि गोवाच्या ‘इफ्फी’ महोत्सवात युनेस्कोचे गांधी परितोषिक पटकावलेल्या मनोज कदम – दिग्दर्शित ‘क्षितिज’ हा चित्रपट तर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हा सरकारी संदेशच खूप कलात्मक पणे देऊन गेला. कामाच्या शोधात गावोगावी कुटुंबाचे चंबूगबाळे पाठीवर घेवून वणवण फिरावे लागणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबात जन्मलेल्या शिक्षणवेड्या वच्छीची, शिक्षणद्वेशा बापाच्या (उपेंद्र लिमये) मजुरी सवयीमुळे कशी फरफट होते त्याची कथा दिग्दर्शकने अत्यंत बेधडकपणे या चित्रपटात सांगितली आहे. आर्थिक व्यवहारात फटके बसायची पाळी येते, तेव्हा शिकून शहाण्या झालेल्या एकीमुळे आपण बचावलो असा साक्षात्कार अखेर त्या हेकट बापाला होऊन वच्छीचे ज्ञानार्जनाचे क्षितिज विस्तारते का ? स्कॉलरशिपच्या परीक्षेपर्यंत तरी शाळेत ती परतू शकते का ? हे सारं रुपेरी पडद्यावर बघणे उत्तम. वास्तव छायाचित्रण, समंजस अभिनय व नेटकी कथाबांधणी यामुळे चित्रपट खूप समाधानकारक झाला आहे.

‘बारायण ‘

महोत्सवात दाखवण्यात आलेला दीपक पाटील दिग्दर्शित ‘बारायण’ हा चित्रपट बारावीच्या निकालाची, त्यांनतर पाल्याला आपल्याला हव्या त्या विद्याशाखेत प्रवेश मिळू शकेल कि नाही याचे ‘टेन्शन’ घेणाऱ्या पालकांची आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःची व्यवसायिक कलेची आवड विसरून ओझ्याचे गाढव बनावे लागणाऱ्या चित्रपटाचा नायक “अन्या” याच्या सारख्या असंख्य मुलांचे रामायण सांगतो. निमार्ती प्रा. दैवता पाटील, पती दीपक पाटील यांची कथा, निलेश उपाध्याय कडून पटकथा- संवाद लिहून घेऊन ‘बारायण’ दिग्दर्शित केला आहे. अपेक्षेपेशा कमी गुण बारावीत पडल्यामुळे मेडिकलची अॅडमीशन हुकलेल्या अन्याला (अनुराग वरळीकर) घरच्यांचा दडपणामुळे आवड नसतानाही पुण्याला इंजिनियरिंगला प्रवेश घ्यावा लागतो, तेंव्हा प्रथम त्याला रॅगिंग करणारा दादा, दुर्गसहलीत अन्याचे इतिहासप्रेम पर्यटक-मार्गदर्शक म्हणून प्रभावीपणे निवेदन करण्याची हातोटी बघून प्रभावित होतो आणी तुला झेपत नसलेला अभियांत्रिकीचा हा वर्ग तुझ्यासाठी नाही; तू कला शाखेला प्रवेश घेऊन तुझ्या आवडत्या इतिहास पुरातत्वशास्त्राचा अभ्यास कर असा सल्ला त्याला देऊन त्याची डूबती नौका कशी वाचवतो याची गोष्ट महाविध्यालयीन विध्यार्थ्याचे विनोदी टिवल्याबावल्यांची दृश्ये पेरून दिग्दर्शकाने ‘बारायण’ मध्ये सांगितले आहे. त्यामुळे मुळचा गंभीर विषयही सुसह्य होतो. पालक-विद्याथ्यार्ना हसत-हसता विचारमग्न करण्याचे सामर्थ्य ‘बारायण’ मध्ये निश्चित आहे

‘कॉपी’

या उलट मुळच्या विदर्भातल्या दयासागर वानखेडे व हेमंत दाभाडे या जोडगोळीने दिग्दर्शिलेला ‘कॉपी’ हा चित्रपट आपल्या भ्रष्ट शिक्षण क्षेत्रातील अराजकाच्या कठोर वास्तवाचे भेदक चित्रण गोळीबंदपणे करणारा आहे. एका राजकारणी शिक्षण सम्राटाच्या मालकीच्या शिक्षणसंस्थेची माध्यमिक शाळा नेहमी शंभर टक्के निकाल दाखवते; प्रत्यक्षात त्या शाळेचे मुख्याध्यापक शाळेत दोन-तीन दिवसांनी कधीतरीच चक्कर मारून जाणारे; उपमुख्याध्यापक (मिलिंद शिंदे) गडगंज फी घेऊन आपला खाजगी क्लास चालवण्यात मश्गुल असलेले आणि शिक्षक-पेशाची नैतिकता मानणारे फक्त दोनच शिक्षक (अंशुमन विचारे व जगन्नाथ निवणगुणे यांनी साकारलेले ?) वगळता, अन्य शिक्षक नुसते हजेरीपटावर सह्या मारण्यापुरते कामापुरते – अशी सगळी अध्यापनाची दुर्दशा असते.

शिकवायचे नाही म्हणून त्याची भरपाई परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना वर्गात सर्रास ‘कॉपी’ करायला देवू करायची, हा या शाळेचा नित्याचा पायंडा. कागदोपत्री चौदा शिक्षक सरकारी अनुदानासाठी हजेरीपटावर दाखले तरी प्रत्यक्षात नियुक्त सातच शिक्षक – असा सर्व आनंदी आनंद! तरीही त्या शाळेतील गरीब मजुरांची तीन हुशार मुले विचारे व निवणगुणे मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे अभ्यास करून आयुष्यात मोठे होण्याची स्वप्ने पाहत आहेत. पण शिक्षण खात्यातील एक प्रामाणिक, कर्तव्य-निष्ठ निरीक्षक ‘सरप्राईज इंस्पेक्शन’ करून शाळेच्या कारभारातील अनागोंदीवर बोट ठेवून त्या शाळेची मान्यताच रद्द करतो आणि त्या भ्रष्ट शिक्षणसम्राटाच्या विंचवाच्या नांगीवर नकळत पाय टाकतो …
पुढे काय होते, ते बघणे दिग्दर्शकाने अत्यंत हृदयविदारक केले आहे. प्रत्यक्ष खेड्यात कलेले वास्तवदर्शी चित्रण नामवंत कलाकारांप्रमाणेच छोटया मुलांनीही केलेला समंजस अभिनय यामुळे ‘कॉपी’ संवेदनशील प्रेक्षकांना सुन्न करून जातो. अशा शाळांतून बोगस प्रमाणपत्रे घेऊन उतीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांची हि पिढी देशाचे भवितव्य काय नि कशी घडवेल, हा प्रश्न त्याला छळत राहतो …..

‘व्हॅनीला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’

गिरीश विश्वनाथ यांचा ‘व्हॅनीला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ तोंडाला पाणी सुटवणाऱ्या नावाचा चित्रपट, शिक्षण क्षेत्राशी थेट संबंधित नसला तरी, ती चित्रपटकथा घडते तीच मुळी निसर्गरम्य पर्यटनस्थळ माथेरानमधील ग्रामपंचायतीच्या एका शाळेत! चित्रपटाची मुळ कथा, पटकथा, गीते सारे काही गिरीशनेच लिहून चित्रपटाला संगीतही दिलेले आहे. इतकेच नव्हे तर, आपली देखणी कन्या जानकी पाठक हिलाच त्या चित्रपटातील तेजूची मध्यवर्ती भूमिका करण्याची संधीही दिली आहे. बाबू घोडेवाला (रवी काळे) आणि दहावीत शिकणारी तेजू (जानकी पाठक) ही हुशार कन्या, शाळेच्या आवारातील व्हॅनीला कुत्री यांच्यातील घट्ट मैत्री हा केवळ शाळेतीलच नव्हे तर, सगळ्याच गावकऱ्यांचा आवडता कौतुकाच विषय! या मैत्रीचे पुढे काय होते ? व्हॅनीला अचानक गायब झाली तर -?
ख्यातनाम अभिनेते रवि काळे यांच्या पत्नीचे काम करणारी राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव, प्रतिभा भगत, आशुतोष वाडेकर या साऱ्याच कलाकारांबरोबर नवोदित जानकी पाठकनेही समजून उमजून कामे केलेही आहेत. सचिन खामकरच्या कॅमेऱ्याने माथेरानची निसर्गसौंदर्य सुरेख टिपलेले आहे श्वानप्रेमी प्रेक्षकांनी हा व्हॅनीला-तेजुच्या प्रेमबंध विशेष आवडेल!

‘नाती खेळ’

नामवंत अभिनेते नागेश भोसले यांनी स्वतः अभिनित / दिग्दिर्शीत केलेला आणि कथाविस्तारही केलेला.‘नाती खेळ’ हा पहिला चित्रपट त्यांनी ‘हलाल’ या गाजलेल्या चित्रपटाचे लेखक राजन खान यांच्या मूळ कथेवरून बनवला असल्याने, त्या चित्रपटाकडून रसिकांच्या अपेक्षा होत्या. आपल्या पुरुषप्रधान समाजात ‘दोन बायकांचा दादला’ हा वाक्प्रयोग रूढ आहे पण ‘हलाल’ वाल्या राजन खान यांच्या या कथेत नायिका ‘दोन दाद्ल्यांची एक बायको एका घटनेमुळे होते. तशीच आहे या ‘नाती खेळ’ची नायिका पारवी. तिच्यावर बालपणापासून अबोल प्रेम करणाऱ्या मल्लप्पाच्या मोठ्या भावाशी सदबाशी (मिलिंद शिंदे) पारवीचे लग्न होते; अविवाहित मल्लप्पा तिच्यातच गुंतून पडलेला आहे, हे एकदा अपघाताने जाहीर होते, तेव्हा पारवीही अभावितपणे त्याच्या मूक प्रेमाला प्रतिसाद देते नि शेवटी हे प्रकरण गावाच्या पंचायती पर्यंत पोहोचते. पाराविने दोन्ही नवर्यांची बायको म्हणून नांदावे असा फैसला पंचायत करते. पण दुष्ट सरपंचाला (नागेश भोसले) ते बघवत नाही. पुढे काय होते ते पाहणे प्रमुख अभिनेत्यांच्या चांगल्या अभिनयामुळे सुसह्य झाले असले तरी, चित्रपट संपल्या नंतर अनेक दुवे विस्कळीत झाल्याची रुखरुख लागून राहिली …

‘नदी वाहते’

असाच अपेक्षाभंग करून गेला तो ‘श्वास’ – कार संदीप सावंत यांनी बारा वर्षानंतर दिग्दर्शिलेला नदी वाहते’ हा चित्रपट ! कोकणातल्या एका निसर्गरम्य गावातून वाहणाऱ्या नदीवर धरण बांधून तिथे एक ‘टुरीस्ट रिसॉर्ट’ स्थानके भ्रष्ट सरपंचाच्या मदतीने उभारण्याच्या खटपटीत एक शहरी धनिक आहे, याची कुणकुण लागलेले गावकरी एकवटून त्या प्रकल्पाला विरोध करण्याचा घाट घालतात, असे कथासार असलेला हा चित्रपट पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा वगैरे असेल, अशी अपेक्षा होती. पण चित्रपटातील नदीच नुसती वाहत राहिली – कथाकथन ‘फ्लो’ आलाच नाही, अशी रुखरुख लागून राहिली

‘ती आणि इतर’

गतवर्षीच्या ‘थर्ड आय’ महोत्सवात ‘जीवन गौरव’- सन्मानित दिग्दर्शक गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘ती आणि इतर’ हा मराठी चित्रपटही त्या मानाने अपेक्षाभंगच करून गेला आणि तिकीटबारीवर तो अपयशी का ठरला, या प्रश्नाचे उत्तरही मिळाले मुळात निहलानिंनी हा चित्रपट मंजुळा पद्मनाभनने १९८४ साली मुंबईत प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारित ‘लाईटस आऊट’ हे नाटकावर बेतलेला आहे. त्याची मराठी पटकथा शांता गोखले यांनी लिहली आहे आणि सुबोध भावे (अनिरुद्ध गोडबोले), सोनाली कुलकर्णी (नैना गोडबोले), अमृता सुभाष (त्यांची धाडसी पत्रकार मैत्रीण जानकी) आविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, गणेश यादव, प्रिया मराठे यासारख्या नामवंत अभिनेत्यांबरोबर सुमन पटेल (मूळ झारखंडची असलेली रिंकू) या नवोदित अभिनेत्रीने यात सुरेख कामे केली आहेत. पण जुन्या चित्रपटा प्रमाणे एकाच ठिकाणी जखडून ठेवलेल्या कॅमेऱ्याने शुटिंग करावे, तसे या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण गोडबोल्यांच्या एकाच दिवाणखाण्यातले झाल्याने, तो प्रेक्षकांना केवळ संवादातूनच जाणून घ्यावा लागतो त्या चित्रपटातून दिग्दर्शकाला सामाजिक सजगतेच जो संदेश द्यायचा आहे, त्याचे मोल जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.

एकूणच, चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट पाहताना जाणवत राहिले की, ग्रामीण महाराष्ट्रातूनही खूप नवोदित दिग्दर्शक उमेदीने चित्रपट-निमिर्ती- दिग्दर्शनामध्ये उतरत आहेत, ते वास्तववादी वाटावेत, यासाठी प्रत्यक्ष ‘लोकेशन’ वर चित्रीकरण करत आहेत, हे स्वागतार्हयच आहे ! २०१८ या नववर्षाच्या पहिल्या महिन्यातच आठ-नऊ मराठी चित्रपट प्रदर्शीत होणाऱ्या वाटेवर आहेत, हे कळल्यावर या वर्षात सव्वाशेहून अधिक मराठी चित्रपट निघतील, अशी चिन्हे दिसू लागलीत. पण यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट यशस्वी ठरणार असतील तर ती मराठी चित्रपटकलेला आलेली केवळ सुजच ठरेल ! तसे होऊ नये ; हि वाढीव संख्या बाळसं ठरावी अशीच अपेक्षा प्रत्येक चित्रपट रसिक करेल !

नीला उपाध्ये,
Email : neelaupadhye@gmail.com
वरील लेखातील मते हि सदर लेखिकेची आहेत, मराठी फिल्म डाटा.कॉम मराठीतील कोणत्याही चित्रपटावर मत प्रदर्शित करत नाही.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया