अतिथी कट्टा

दिनांक : २७-०८-२०१७

सेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…



बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला ‌‘बंदुक्या’ चित्रपट येत्या १ सप्टेंबरला राज्यभर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणारे अभिनेते शशांक शेंडे यांचे हे मनोगत.
——-

गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या वाट्याला खूप वेगळ्या भूमिका येताहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नव्या दमाचे तरुण दिग्दर्शक वेगळ्या भूमिकांसाठी माझा विचार करीत आहेत, हे कोणत्याही अभिनेत्यासाठी विशेषच म्हणावे लागेल. या वेगळेपणातूनच दिग्दर्शक राहल मनोहर याने मला ‌‘बंदुक्या’ हा चित्रपट ऑफर केला. या चित्रपटाचे लेखक नामदेव मुरकुटे आणि राहुल मनोहर यांच्यासमवेत मी ‘स्क्रीप्ट’ ऐकली तेव्हाच मला आपण काहीतरी जबरदस्त ऐकतोय याची कल्पना आली होती. मला यावेळी सर्वात लक्षात राहिली होती ती या चित्रपटाची भाषा. ग्रामीण भागातील माणसांच्या वागण्या-बोलण्यात मोकळेढाकळेपणा असतो, तो बरोबर या चित्रपटाच्या ‘स्क्रीप्ट’मध्ये उतरला होता. शिवी हा तर इथल्या माणसांच्या जगण्याचा, आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखा दाखवायच्या झाल्यास त्या शिव्यांसकट आम्हाला दाखवाव्या लागणार होत्या. मात्र, त्यामुळे भविष्यातील सेन्सॉरचं संकटही आम्हाला दिसत होतं. मात्र मी दिग्दर्शक राहुल मनोहरला भाषेबाबत कोणतीही तडजोड करू नकोस असं सांगितलं आणि आम्ही हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण केला.

चित्रीकरणापूर्वी आम्हाला जी भीती वाटत होती, तेच शेवटी घडलं. साधारण दीड वर्षापूर्वी सेन्सॉरनं आमचा चित्रपट अडवला. तब्बल ६७ कटस सुचविले. एवढेच नव्हे तर एवढे कट केल्यानंतरही चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र राहील, हेदेखील त्यांनी आम्हाला सांगितले. एखाद्या चित्रपटातून ६७ कटस काढणे म्हणजे तो चित्रपट जवळपास निकालात काढण्यासारखंच होतं. सेन्सॉरचा आक्षेप हा चित्रपटामधील व्यक्तिरेखांच्या तोंडच्या शिव्यांचा होता. त्याबद्दल माझं असं ठाम मत होतं की, व्यक्तिरेखांच्या तोंडच्या शिव्या काढल्या तर त्या व्यक्तिरेखा विसविशीत झाल्या असत्या. जसं श्वास घेणं, पाणी पिणं, जेवणं हा तिथल्या व्यक्तिरेखांचा आयुष्याचा भाग आहे, तसेच शिव्या हादेखील त्यांच्या आयुष्याला चिकटल्या आहेत. त्या त्यांच्यापासून वेगळ्या करणंच शक्य नव्हतं. सेन्सॉरच्या दबावाला आम्ही जर का बळी पडलो असतो तर चित्रपटामधील सर्व व्यक्तिरेखा या पुणेरी झाल्या असत्या आणि चित्रपटाला मग काहीच अर्थ उरला नसता.

माझ्यादृष्टीनं विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे सेन्सॉर सांगते तीच भाषा आपण प्रमाणभाषा मानायची का? एखाद्या ग्रामीण भागातलं खरं जीवन आपण जसंच्या तसं चित्रपटामधून दाखवू शकत नाही का? या लोकांनी मग सेन्सॉरच्या म्हणण्याप्रमाणे बोलायचं आणि वागायचं का? नेमक्या याच गोष्टी मग आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांशी चर्चिल्या आणि ही मात्रा लागू ठरली. एवढ्या चर्चेनंतर ६७ कटसवर पोचलेल्या सेन्सॉर बोर्डानं आपल्या कटसचा आकडा १३पर्यंत खाली आणला. खरं तर एवढे कटस कमी केल्याबद्दल मला सेन्सॉर बोर्डानं आपल्यावर उपकारच केलेत असं वाटतं. मात्र हे उपकार करताना त्यांनी चित्रपटाला दिलेलं‘ए’ सर्टिफिकेट तसंच ठेवलं. खरं तर हे सर्टिफिकेट ‘यू-ए’ असंदेखील चाललं असतं. ‘ए’ सर्टिफिकेटचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती असते. तो तसा होऊ नये, एवढीच अपेक्षा मी आता करू शकतो.
– शशांक शेंडे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया