अतिथी कट्टा

दिनांक :

संधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…




हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रख्यात दिग्दर्शक गोविंद निहालाणी `ती आणि इतर` या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटाचं पहिल्यांदाच दिग्दर्शन करीत आहेत. येत्या 21 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं त्यांचं हे मनोगत…
——-

मराठी चित्रपटसृष्टीशी माझा खूप जुना संबंध आहे. माझ्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवातच मुळी मराठी चित्रपटानं झाली आहे. ‌‘शांतता कोर्ट चालू आहे’ या चित्रपटाचा मी सहनिर्माता होतो. १९७०च्या दशकामध्ये माझा या चित्रपटाशी संबंध आला. पं. सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मी `सत्यदेव-गोविंद प्रॉडक्शन्स` नावाची एक संस्था सुरू केली होती. या चित्रपटाचं मी चित्रीकरण करावं आणि सत्यदेव दुबेंनी त्याचं दिग्दर्शन करण्याचं ठरवलं. या चित्रपटाचं लेखन विजय तेंडुलकर यांनी केलं होतं. तेव्हापासून माझा मराठी चित्रपटांशी संबंध आला. मुंबईत मी जेव्हा आलो तेव्हाच मी ठरवलं होतं की, ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याची भाषा आपणास अवगत व्हायला हवी. मात्र मी मराठी शिकण्यासाठी कोणत्या शिक्षकाची मदत घेतली नाही. पं. सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मी नाटकं करायचो. त्यांच्या नाटकांमध्ये बरेचसे मराठी कलाकार काम करायचे. ‘बॅक स्टेज’ला काम करताना मी या कलाकारांकडून मराठी शिकलो. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हा मराठी चित्रपट असल्यामुळे निर्मितीवेळचं सगळं वातावरणच मराठमोळं होतं. डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत मी ‘झाकोळ’ हा चित्रपटही मी केला होता. तेव्हापासून मराठी भाषेशी माझी विशेष जवळीक निर्माण झाली. मराठी मला वाचायला येतं, बोललेलं समजतं. मात्र सतत बोलण्याची वेळ येत नसल्यामुळे माझ्या मराठी बोलण्यात सहजता येत नाही.

मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडच्या काळात नवतेची एक चळवळ सुरू झाली आहे. राज्य सरकारने मराठी चित्रपटांच्या विकासासाठी ज्या काही योजना केल्या, त्याचा निश्चितच फायदा मराठी चित्रपटसृष्टीला झाला. नव्या दमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ मराठी चित्रपटसृष्टीकडे वळू लागले. थोडक्यात, मराठी चित्रपटांमधल्या आशयाला खूप चांगली प्रतिष्ठा मिळायला लागली. प्रेक्षकही अशा चांगल्या आशयाच्या चित्रपटांचं स्वागत करू लागले. नवीन फिल्ममेकरबरोबर नवा प्रेक्षकवर्गही जन्माला येत असतो. हे वातावरण मला मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी खूप चांगलं वाटलं. म्हणूनच मी हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचं ठरवलं. राजेशकुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यामागचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे मला निर्मात्यांकडून पूर्णत: क्रिएटिव्ह स्वातंत्र्य मिळालं. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या नि:श्चलनीकरणानंतर या चित्रपटापुढेही आर्थिक अडचणी आल्या. यावेळी राजेशकुमार यांच्या मदतीला आले ते त्यांचे मित्र हिमांशू ठाकूर. थोडक्यात नवा निर्माता आणि नवा दिग्दर्शक अशी आमची छान टीम जमली.

या चित्रपटाचं कथानक माझ्या मनात आलं ते 1990च्या दशकामध्ये. एकविसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीचा तो काळ होता. मंजुळा पद्मनाभन यांचं एक नाटक मी वाचलं. त्यांच्या हार्वेस्ट या नाटकावर यापूर्वी मी `देह` नावाचा एक इंग्रजी चित्रपट बनवला होता. त्यांचं मी वाचलेलं दुसरं नाटक म्हणजे `Lights out`. या नाटकाचं कथानक मुंबईत घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत होतं. हे नाटक पाहून मी खूप अस्वस्थ झालो होतो. मुंबई हे शहर कॉस्मोपोलिटिन आहे. त्याचा आपणा सर्वांना अभिमानही आहे. या शहरात विविध भाषा बोलल्या जातात. इथं राहणाऱ्या नागरिकांच्या संस्कृतीदेखील थोड्याफार वेगवेगळ्या आहेत. इथे प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. तरीदेखील इथले लोक एकत्र येऊन या शहराला एक वेगळी ओळख देतात. अशी ओळख दुसऱ्या शहराबद्दल नाही सांगता येत. नवी दिल्लीदेखील कॉस्मोपोलिटिन शहर आहे. परंतु, शहराची संस्कृती ही उत्तरप्रदेश, पंजाबशी नातं सांगणारी आहे. या नाटकामधलं कुटुंब कॉस्मोपोलिटिन आहे.

या नाटकाचं चित्रपटाच्या कथानकात परावर्तन करण्यासाठी मी शांता गोखले यांची मदत घेतली. खरं तर त्यांची नि माझी खूप जुनी ओळख आहे. मी दिग्दर्शित केलेल्या अर्धसत्यमध्ये त्यांनी एक छोटीशी व्यक्तिरेखा साकारली होती. मी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी खूप कमी वेळेत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद मला लिहून दिले. या चित्रपटामध्ये एकूण सहा व्यक्तिरेखा आहेत. मला या चित्रपटासाठी डबिंग करायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही `सिंक साऊंड` तंत्रज्ञानाचा उपयोग केला. `कंट्रोल्ड शूट` करण्यासाठी परळच्या `राजकमल` स्टुडिओमध्ये एक सेट लावला. तिथेच सर्व चित्रपटाचं शूटिंग केलं. त्यासाठी मी `राजकमल` स्टुडिओच्या किरण शांताराम यांचं आभार मानतो. त्यांनी सर्वप्रकारची मदत मला केली.

या चित्रपटाच्या निमित्तानं मी एक वेगळाच प्रयोग केला. त्याचे खूप चांगले रिझल्टस मला मिळाले. माझ्या या आधीच्या चित्रपटांचे संवाद `स्ट्रक्चर्ड` प्रकारात मोडतात. लेखकानं लिहिलेले संवादच कलाकाराला शूटिंगच्या वेळी म्हणावे लागतात. परंतु, या चित्रपटाबाबत मी थोडा अपवाद केला. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, आविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे या मान्यवरांबरोबरच सुमन पटेल या नवीन कलावंतानं या चित्रपटात काम केलं आहे. तिनं `एनएसडी`मधून शिक्षण घेतलं आहे. शूटिंगच्या वेळी हे सर्व कलाकार आपापल्या व्यक्तिरेखांचे संवाद घेऊन बसले होते. मात्र शूटिंग सुरू करण्यापूर्वी मी सर्वांना एकत्र बोलावलं. मी त्यांना शूटिंग केला जाणारा प्रसंग सांगितला. तसेच त्यासंदर्भातचे संवाद त्यांना फक्त एकदाच वाचायला सांगितले. त्यानंतर मी त्यांना ज्या नाटकावर हा चित्रपट बेतला आहे, त्या नाटकाची मूळ पटकथा वाचायला दिली. मूळ पटकथा थोडी जुनी आणि शांताजींनी लिहिलेलं चित्रपटाचं कथानक अगदी नवं कोरं होतं. परंतु, विषय जुना असल्यामुळे मी कलावंतांना दोन्ही पटकथा आणि संवाद पाहिल्यानंतर तुम्हांला आता जे सुचतंय ते कॅमेऱ्यासमोर बोलायला सांगितलं. कलाकारांनी दोन्ही पटकथा समजून-उमजून `इम्प्रोव्हाईज` केलं आणि त्याचा अगदी वेगळाच परिणाम आता पडद्यावर पाहायला मिळेल. या कलावंतांनी जे काही शूटिंगच्या वेळी संवाद म्हटले, ते चित्रपटाचं नवीनच स्क्रीप्ट झालं. ते नंतर आम्ही लिहून घेतलं. या प्रयोगामुळे मराठी कलावंतांबद्दलचा माझा आदर खूप वाढला. हा चित्रपट खूप चांगला जमण्यामागचं सगळं श्रेय मी या कलावंतांना देईन.

आपल्या आजूबाजूला जे वाईट घडतंय, ते पाहून आपण अस्वस्थ होतं. परंतु, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्यावी की न द्यावी, हे आपल्यापुढचं आत्ता एक कोडं आहे. याबद्दल बोलावं की नाही याचा आपण अनेकदा विचार करतो. यावेळी आपले कुटुंबीयदेखील आपल्यासमोर येतात. आपल्या कृतीमुळे आपण आपल्या कुटुंबियांचं आयुष्य धोक्यात आणतोय की काय असा प्रश्नदेखील अनेकदा आपणास पडतो. एक नागरीक म्हणून हे आपल्याला करायला हवं असं एक मन आपणास सांगतं, परंतु, एक माणूस म्हणून आपण आपल्यावर अवलंबून असलेल्यांचाही विचार करतो. हा प्रश्न या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. स्वातंत्र्यापूर्वीचे प्रश्न वेगळे होते. तेव्हा शत्रू आपल्यासमोर होता. त्यामुळे लढायचं कुणाविरुद्ध हे नेमकं आपणास ठाऊक होतं. परंतु, आताची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. आता आपणच आपल्यासमोर आहोत. प्रश्न आपल्या घरातलेच आहेत आणि ते आपल्यालाच सोडवायचे आहेत.

या चित्रपटाचा मी एक `प्रीव्ह्य शो` ठेवला होता. कुमार केतकर, विजया राजाध्यक्ष, आनंद पटवर्धन, श्याम बेनेगल, विकास देसाई, किरण शांताराम, सुधीर नांदगावकर. ज्यांच्या प्रतिक्रिया मला महत्त्वाच्या वाटतात अशांना मी बोलावलं होतं. यामागचं कारण म्हणजे हे लोक मला खूश करण्यासाठी उगीचच खोटं कौतुक करणाऱ्यांपैकी नाहीत. जे त्यांना वाटेल, पटेल तेच ते बोलतील. `पिक्चर कैसी लगी` हा प्रश्न कोणालाची विचारायचा नाही, असं मी माझ्या युनिटला सांगून ठेवलं होतं. चित्रपट संपला. सगळे बाहेर आले. थोडा वेळ शांतता पसरली. नंतर लोक बोलायला लागले. मी कोणालाही काहीच विचारलं नाही. परंतु, चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये हळूहळू चर्चा सुरू झाली. ही चर्चा ऐकताना मला `अर्धसत्य`ची आठवण झाली. त्यावेळीही `प्रीव्ह्यू शो`नंतर अशीच चर्चा माझ्या कानावर आली होती. यावेळी काही मोठमोठी वाक्यं माझ्या कानावर आली नाहीत. परंतु `व्हेरी टाइट`, `व्हेरी स्ट्रॉंग`, `डिस्टर्बिंग`, `ग्रिपिंग` असे शब्द माझ्या कानावर आले. याच्यावरून मला कळलं की आपण योग्य दिशा पकडली आहे.

या चित्रपटाला मी माझं चित्रपटसृष्टीमधील पुनरागमन म्हणणार नाही. कारण मधल्या काळात मी घरी बसलेलो नव्हतो. एक अॅनिमेशन चित्रपट मी बनवला होता. पुढच्या चित्रपटाची मी तयारी करीत होतो. फक्त काही कारणांमुळे चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं नाही. पटकथा लेखनाचं काम सुरू होतं. मला आणखी संधी मिळाली तर माझ्याकडे काही चांगल्या पटकथा तयार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी मराठी आणि हिंदीत आहे.
– गोविंद निहालाणी
——–

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया