अतिथी कट्टा

दिनांक :

भूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…



प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचे या आठवड्यात ‘हृदयांतर’ आणि ‘कंडिशन्स अप्लाय’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. त्या निमित्तानं त्याचं या दोन चित्रपटांमधील आपल्या व्यक्तिरेखांबद्दलतं मनोगत.
——-

‘कंडिशन्स अप्लाय’ या चित्रपटामध्ये मी अभयची व्यक्तिरेखा साकारली आहे. काही घटनांमुळे लहानपणापासूनच त्याचा नात्यांवरचा विश्‍वास उडालेला असतो. एकलकोंडा, रुक्ष असं त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या कामाशी काम ठेवणं हा त्याचा स्वभाव. इतक्या कोरड्या असणार्‍या माणसाच्या आयुष्यात स्वरासारखी एक रेडिओ जॉकी येते. कळत-नकळत त्याची तिच्याशी मैत्री होते. तिच्यावर प्रेम बसतं. अभय आणि स्वरा या दोघांनाही लग्न करायचं नसतं. ज्या ज्या वेळी गिरीशबरोबर मी काम केलंय, त्या त्या वेळी त्यानं मला एका वेगळ्या भूमिकेत बघितलंय. यावेळीही त्यानं मला एक सशक्त भूमिका दिली आहे. या चित्रपटाचं लेखन केलं आहे ते संजय पवार यांनी. कॉलेजमधील एकांकिकांपासून संजय पवारशी माझा स्नेह आहे. एक लेखक म्हणून तो माझा ‘आयडॉल’ आहे. संजयमुळेच या चित्रपटामधील प्रत्येक व्यक्तिरेखेला एक विशिष्ट वैचारिक पातळी आहे. चांगला विषय, उत्तम दिग्दर्शक आणि कलाकारांमुळे एक उत्तम भट्टी जमून आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे.

‘हृदयांतर’मध्ये या चित्रपटामध्ये शेखर जोशी ही व्यक्तिरेखा साकारतोय. आजवर मी साकारलेल्या इतर व्यक्तिरेखांपेक्षा हा शेखर निश्‍चितच खूप वेगळा आहे. नित्या आणि नाएशा अशा त्याच्या दोन मुली. समायरा ही त्याची पत्नी. समायरा आणि शेखरचं फारसं जमत नसतं. कामातल्या व्यस्ततेमुळे तो आपली पत्नी आणि मुलींना नीट वेळ देऊ शकत नसतो. वेळेबाबतचं शेखरचं लॉजिक थोडंसं वेगळं असतं. लहानपणापासून खूप कष्ट करून आपण पैसा कमावलाय. पैसा कमवायचा तर सगळ्यांनाच आपल्याला वेळ देता येणार नाही, असा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो.



मात्र, शेखरच्या या विचारसरणीमुळे हे चौकोनी कुटुंब मोडून पडण्याची भीती निर्माण होते. मात्र, पुन्हा अशा काही घटना घडतात की हे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येतं. उत्तम संहितेमुळे मी हा चित्रपट स्वीकारला. या कथानकाला विक्रम फडणीस यांनी खूप चांगल्या पद्धतीनं न्याय दिला आहे. विक्रम हा खूप झपाटलेला माणूस आहे. त्यानं आपल्यातलं झपाटलेपण आमच्यात उतरवून हा चित्रपट केलाय आणि तो खूप चांगला झालाय. मुक्ता बर्वेबरोबर तब्बल नऊ वर्षांनी काम करण्याची संधी मला या चित्रपटामुळे मिळालीय. खरं तर आम्ही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतोय. मात्र अलीकडच्या काळात आम्हांला ‘कास्ट’ केलं गेलं नव्हतं. खूप मजा आली काम करताना.

या आठवड्यात माझे एकाचवेळी दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या गोष्टीकडे मी थोड्या वेगळ्या नजरेनं पाहतो. कोणत्याही व्यक्तीला मूल हवं असतं तेव्हा त्यांना जुळं किंवा तिळं व्हावं अशी कधीच इच्छा नसते. त्यांचा एकाच अपत्यासाठी प्रयत्न सुरू असतो. परंतु, परमेश्‍वराच्या मनात काहीतरी वेगळं असतं. परंतु, जेव्हा जुळंच होतं तेव्हा त्यांना ही दोन्ही आपलीच मुलं सांभाळावी लागतात. एक त्यातल्या त्याच चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही चित्रपटांचे विषय खूप वेगवेगळे आहेत. ‘कंडिशन्स अप्लाय’ ही एक प्रेमाची गोष्ट आहे तर ‘हृदयांतर’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. दोन्ही चित्रपटांच्या कथा वेगळ्या आहेत, कलाकार वेगळे आहेत. माझी भूमिकाही वेगळी आहे. त्यामुळे एकच सुबोध भावे दोन्ही चित्रपटांत दिसतोय, असं कलाकारांना वाटणार नाही. एकाच तारखेला माझे चित्रपट प्रदर्शित होण्याचे अपघात यावर्षी खूपच वाढताहेत हे मला कळतंय. भविष्यातही असे अपघात संभवू शकतात. परंतु, या सगळ्या गोष्टींकडे मी आता सकारात्मकतेनं पाहायला शिकलोय. एक पथ्य मी नक्कीच पाळतो. माझा एकही चित्रपट किंवा भूमिका पूर्वीच्या भूमिकेशी सारखी नसावी. गोविंद निहलाणींचा ‘ती आणि इतर’ चित्रपट खूप वेगळा आहे. तृप्ती भोईरचा ‘अगडबंब’ पार्ट २ मी सध्या करतोय. तोही खूप मनोरंजक चित्रपट आहे. त्यामुळे या सगळ्याच चित्रपटांचं प्रेक्षकवर्ग चांगलं स्वागत करतील अशी मी अपेक्षा करतो.

——–

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया