अतिथी कट्टा

दिनांक : १७-१०-२०१७

… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे


प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा ‘थॅंक यू विठ्ठला’ हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. बऱ्याच काळानंतर ते चित्रपटात दिसणार आहेत. आपली भूमिका तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या भवितव्याबद्दल त्यांनी केलेलं हे भाष्य.

थॅंक यू विठ्ठला हा माझा थोडासा वेगळा सिनेमा आहे. बऱ्याच काळानंतर मी प्रेक्षकांसमोर येतोय. मराठी चित्रपटांमध्ये फॅण्टसी आणि वास्तवदर्शी कथानक यांचं ‘कॉम्बिनेशन’ खूप कमी प्रमाणात हाताळलं जातं. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे तांत्रिक मर्यादा. त्यामुळे अशा विषयांना शक्यतो हात घातला जात नाही. परंतु, ‘थॅंक यू विठ्ठला’ त्यास अपवाद होईल असं दिसतंय. याचं श्रेय अरविंद हातनूरकर या तरुणाला द्यावं लागेल. या चित्रपटासाठी त्यानं ‘व्हीएफएक्स’ इफेक्टस खूप चांगले आणि वेगळे केले आहेत. देवेंद्र जाधव या दिग्दर्शकाबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे. परंतु, त्याची सिनेमा माध्यमावरची पकड खूप चांगली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं ही गोष्ट मांडली आहे. एक नट म्हणून मला या चित्रपटात काय मिळालं तर, चार वेगवेगळ्या भूमिका साकारता आल्या. त्या कितपत जमल्या आहेत, हे आता रसिक प्रेक्षक ठरवतीलच. राजूचा खून दिनेशनं केलाय, असं सांगितलं की सगळंच संपतं. म्हणून मी कथानकाच्या फारशा तपशीलात जात नाही. मराठी चित्रपटाला सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे ‌‘स्क्रीन प्ले.’ सलीमभाईंनीही फार चांगला ‘स्क्रीन प्ले’ या सिनेमाचा मांडला आहे. ते हिंदीतील असल्यामुळे मसाला मनोरंजनावर त्यांचा अधिक विश्वास आहे.

त्यामुळे प्रेक्षकांना ते निराश करणार नाहीत, याची मला खात्री आहे. योगेश शिरसाट यांनी संवाद लिहिले आहेत. एका नावाचा मी आवर्जून उल्लेख करीन, दिनेश सिंग. अतिशय उत्तम ‘सिनेमॅटोग्राफी’ त्यांनी केली आहे. रोहन रोहनचं संगीत खूप चांगलं आहे. अलीकडच्या तंत्रातील बदल त्यांनी पुरेपूर आत्मसात करून एक ‘सुपीरियर सिनेमा’ प्रेक्षकांपुढे सादर केला आहे. महेशदांबरोबर मी खूप सिनेमे केले आहेत, असं म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या रेशन कार्डावरचा नट आहे, असं मी म्हणेन. माझ्याबरोबरची अनेक समकालीन कलाकार मंडळी महेशदांनी आपल्याबरोबर वाहत वाहत आणली आहेत. आता आम्ही किनाऱ्याला लागलो आहोत. त्यांचं मार्गदर्शन कायमच महत्त्वाचं ठरतं.

हल्ली प्रत्येक आठवड्यामध्ये मराठी चित्रपट परस्परांशी मारामारी करताना दिसत आहेत. एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होणारी ही एक साडेसातीच आहे मराठी चित्रपटसृष्टी असंच मी म्हणेन. नुकतेच सात चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. कोणत्या चित्रपटाचा कसा व्यवसाय होणार, हा चिंतेचा विषय आहे. मुळात एका वर्षात ५२च आठवडे असतात. त्यात एका वर्षात साधारण फक्त १५० चित्रपट हे मराठी भाषेतले असतात. त्या शिवाय बॉलिवुड, हॉलिवुडचे वेगळे आहेत. तमीळ, तेलुगु, कन्नडा, मल्याळम, गुजराती… असे इतरभाषिक चित्रपटही आहेत. ‌राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवलेल्या ‘कासव’ चित्रपटाला तर प्रदर्शनाच्या दिवशी मुंबईत अवघे एक चित्रपटगृह आणि अवघा एकच शो मिळाला. याबाबत विविध माध्यमांनी गंभीरपणे लिहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे असं मला वाटतं. तसं घडलं नाही तर मराठी सिनेमाला भविष्यात काहीच भवितव्य राहणार नाही. सध्या मराठीत असे अनेक निर्माते येताहेत की, ज्यांना या क्षेत्राची फारशी माहिती नाही. परंतु, मराठी भाषेवरील प्रेम आणि आपुलकीपोटी ते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये उतरत असतात. अशा निर्मात्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. आठवड्यातील एकेका शोमुळे त्यांच्या उत्पन्नाचा आकडा कधी आणि कसा वाढणार? त्यामुळे येत्या ३ नोव्हेंबरला आणखी सात-आठ सिनेमे अंगावर येऊ नयेत अशी प्रार्थना करतो.

– मकरंद अनासपुरे
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया