अतिथी कट्टा

दिनांक : ०४-०८-२०१७

गणेश आचार्य मुलाखत…



बॉलिवुडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण असलेला ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्त त्यांचं हे मनोगत.
——-

हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच वर्षं नृत्यदिग्दर्शनाचं काम केल्यानंतर मी काही वर्षांपूर्वी ‘स्वामी’ आणि ‘मनी है तो हनी है’ हे दोन हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले. माझा जन्म मुंबईत झाला. मी वाढलो महाराष्ट्रात. यापूर्वी मी काही मराठी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. परंतु, स्वतंत्रपणे आतापर्यंत एकही मराठी चित्रपट दिग्दर्शित केला नव्हता. साधारण दोन वर्षांपूर्वीपासून माझ्या मनात मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार आला. याचवेळी मला माझ्या एका मित्रानं ‘पच्चीकरण’ हा दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यास सांगितला. एक श्रीमंत मुलगा आईसाठी भिकारी होतो, ही कल्पनाच मला मुळात खूप आवडली. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशी म्हणच मराठीत आहेत. त्यामुळे मूळ चित्रपट काही बदलांसह मराठीत केलातर तो चांगला होईल, या विचारानं या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली. त्याचं शीर्षकही मी ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ असंच ठेवलं. मूळ कलाकृतीचे हक्क घेऊन मग गुरू ठाकूरनं हा चित्रपट नव्यानं लिहिला. आई आणि मुलाच्या नातावर आम्ही संपूर्ण चित्रपटाचा फोकस ठेवला आहे.

या चित्रपटामधील भिकाऱ्याची शीर्षक व्यक्तिरेखा कोण साकारील, हा विचार मनात सुरू असतानाच एका स्टुडिओमध्ये स्वप्निल जोशीची नि माझी भेट झाली. स्वप्निलचे ‘दुनियादारी’, ‘मितवा’ हे दोन चित्रपट मला खूप आ‌वडले होते. त्याची आतापर्यंतची इमेज चॉकलेट बॉयची आहे, हे मला ठाऊक आहे. मात्र स्वप्निल खूप चांगला अभिनेता आहे, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं. म्हणूनच भिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेमध्ये मी स्वप्निलला पाहण्याचं आणि नंतर त्याला या सिनेमासाठी ‘कास्ट’ करण्याचं धाडस करू शकलो. अर्थातच स्वप्निलनंही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. काही दृश्यांमध्ये तर त्याचा अभिनय एवढा सुरेख झाला आहे की डोळ्यांतून पाणी येतं. त्याचा लूक आम्ही बदलल आहे.

स्वप्निलबरोबरच सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, गुरू ठाकूर तसेच इतर सहकलावंतांनाही खूप सुरेख काम केलं आहे. कोणताही चित्रपट चांगला बनतो ते ‘टीमवर्क’मुळे, हे मला आता इतक्या वर्षांच्या

अनुभवानं ठाऊक आहे. म्हणूनच मी मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना माझे सर्व ‘टेक्निशियन्स’ चांगले घेतले. कॅमेरामन म्हणून महेश लिमयेला घेतलं. या चित्रपटात अॅक्शनला खूप महत्त्व असल्यामुळे अब्बास अली मोगल यांची निवड केली. कलादिग्दर्शक म्हणून नरेंद्र राहुरीकर यांचं काम खूप छान झालंय. थोडक्यात सगळ्या टीमनंच खूप मेहनत घेतलीय. या चित्रपटाच्या ‘देवा देवा’ गाण्याचा तर मी आवर्जून उल्लेख करीन. एक तर चित्रपटांमध्ये गणपतीच्या गाण्यांचा खूप दबदबा असतो. यापूर्वीची अनेक गाणी खूप चांगली झाली आहेत. त्यामुळे मी जर का अशापद्धतीचं गाणं करणार असेन तर माझ्याकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असणार हे मला ठाऊक होतं. म्हणूनच मी हे गाणं ‘लार्ज स्केल’वर बनवलं. या गाण्यामध्ये एकूण ५०० डान्सर्स, ५०० ज्युनिअर आर्टिस्ट आणि २०० म्युझिशियन्स आहेत. इतर गाणीही चांगली बनलीत. चित्रपटाचं शीर्षक ‘भिकारी’ असलं तरी बजेटबाबत आम्ही अजिबात आखडता हात घेतलेला नाही. चित्रपटाचा काही भाग तसेच दोन गाणी आम्ही लंडनमध्ये चित्रीत केली आहेत.

या चित्रपटाच्या निमित्तानं मला थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभले. सुपरस्टार अमिताभ बच्चन हे तर माझ्यासाठी परमेश्वरच आहेत. ते माझ्या चित्रपटाच्या मुहूर्ताला आले, हे मी माझं भाग्य मानतो. त्यांचा आशीर्वाद खूप मोलाटा आहे. रणवीरसिंग, आलिया भट, वरुण धवन, टायगर श्रॉफ या सर्वांनी चित्रपटाच्या ‌‘प्रमोशन’साठी मला खूप सहाय्य केलं. थोडक्यात, या चित्रपटाच्या ‘आऊटपुट’वर मी तरी खूश आहे. आता प्रेक्षक ठरवतील त्यांना कसा वाटला तो. यानंतरही माझं मराठी आणि हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन सुरूच राहील.

– गणेश आचार्य
——–

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया