अतिथी कट्टा

दिनांक : १७-०८-२०१७

अशी ही बनवाबनवी



प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी साठ वर्षांचा टप्पा आता पार केला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘हाच माझा मार्ग’ या आत्मचरित्रामधील हा काही निवडक संपादित भाग.
——-

एके दिवशी चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांचे पुत्र किरण शांताराम यांचा मला फोन आला की, अण्णांना (व्ही. शांताराम) तुला भेटायचंय. मी भेटायला गेलो.
‌‌“सचिन, माझी अशी इच्छा आहे की, आमच्या कंपनीसाठी तू एक फिल्म ‘डिरेक्ट’ करावीस.” ते म्हणाले. साक्षात व्ही. शांताराम यांनी दिलेली ती ऑफर मी नाकारणं शक्यच नव्हतं. माझ्याकडे ‘आत्मविश्वास’ची कथा तयार होती. मी त्यांना ती ऐकवली. त्यांना तो विषय खूप आवडला. ‌‌“सचिन, चांगली स्टोरी आहे; पण आपल्याला एखादा विनोदी चित्रपट करायचाय.”
मग मी त्यांना ‘आमच्यासारखे आम्हीच’ची गोष्ट ऐकवली. दोन हिरोंची ती गोष्ट होती.
ते म्हणाले, “ही चांगली आहे. यात तू आणि सुशांत (रे) दोघांनी काम करा.”
सुशांत हा त्यांचा सख्खा नातू.
“अण्णा, मी ही गोष्ट मला आणि अशोकला डोक्यात ठेवून लिहिलेली आहे.” मी सांगितलं.
‌“ते ठीक आहे, पण मी सुशांतला प्रॉमिस केलंय. त्यामुळे तो चित्रपटात असणं गरजेचं आहे.
“या भूमिकेसाठी मी त्याचा विचार नाही करू शकत.” मी स्पष्टपणे सांगितलं.
“तसं असेल तर मग कठीण होईल.”
“ओके अण्णा. अच्छा” असं म्हणून मी तिथून तडक बाहेर पडलो. घरी निघून आलो.
पुन्हा दोन दिवसांनी किरणदादाचा फोन आला.
“अशोक आणि सुशांतला घेऊन तू काही करू शकतोस का?”
“नाही. तुम्ही अटी मांडणार असाल, तर मला पिक्चर करायचा नाहीये.” मला कुठलीही तडजोड करण्याची इच्छा नव्हती.

अण्णांकडून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी हृषिकेश मुखर्जींना भेटायला गेलो. त्यांना म्हटलं, “तुम्ही मला एक गोष्ट ऐकवली होतीत, ती मला फार आवडली होती. त्यावर तुम्ही चित्रपट केलात, तो मला नाही आ‌डला, कारण तुम्ही तो तुमच्या पद्धतीनं केला होतात. पण मला त्याच कथेवर मराठीत चित्रपट करायचा आहे. मी करू का?”
“नको रे. मी बनवला, तर ‘फ्लॉप’ झाला. तू केलास तरी फ्लॉपच होईल. कशाला हात दाखवून अवलक्षण?”
“नाही हृषिदा. मला माझ्या पद्धतीनं बनवून पाहू द्या.” मी त्यांना विनंती केली.
“अच्छा, आता तू मला सिनेमा कसा बनवायचा ते शिकवणारेस?” ते गमतीनं म्हणाले.
“तसं नाही हो. मी तुम्हाला फक्त सांगतोय की, त्यावरून चांगला चित्रपट होऊ शकेल. तुम्ही फक्त परवानगी द्या.”
त्यांनी होकार दिला.
दरम्यान, चार दिवसांनी किरणदादाचा फोन आला.
“अण्णांना तुला भेटायची इच्छा आहे.”
मी गेलो.
“अरे, तू माझ्यावर रागावलास!” अण्णा समजुतीच्या सुरात म्हणाले.
“नाही हो अण्णा. रागावलो नाहीये. तुमची काही तत्त्वं आहेत, माझीही काही आहेत. ती जमली, तर एकत्र काम करू. पण एकत्र काम केलं नाही, तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर नक्कीच कमी होणार नाही.” मी माझ्या मनातलं त्यांना सांगितलं.
“पण माझी इच्छा आहे रे, तुझ्याबरोबर काम करायची.”
“माझीपण आहे अण्णा!”
“तू, अशोक आणि सुशांत अशा तिघांचा सिनेमा नाही का करता येणार तुला?”
‌‌“हां. हे जमेल. पण तिघंच का? चौघं का नको?”
“चौथं कोण?” अण्णांना प्रश्न पडला.
“लक्ष्मीकांत बेर्डेनंही माझ्याबरोबर कधी काम नाही केलेलं. त्याला करायचंय!”
‌‌“चालेल. तुझ्याकडे गोष्ट आहे कुठली?”
मी तयारीतच होतो. मी त्यांना चार मित्रांची एक गोष्ट ऐकवली. त्यावरून चित्रपट करायचं माझ्या डोक्यात बरेच दिवस घोळत होतं. चित्रपटाचं नावही माझ्या डोक्यात पक्कं होत- ‘बनवाबनवी’.
माझ्याकडे पटकथा तयार नव्हती, पण कथेबरोबर दोन सीन्स मी अण्णांना आवर्जून ऐकवले. ते म्हणजे बालगंधर्व रंगमंदिरात घडणारा सीन आणि दुसरा लक्ष्याच्या डोहाळजेवणाचा. अण्णांनी हात वर करून उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून मला दाद दिली.
“हेच कर, हेच कर!” त्यांनी जाहीर केलं.
“ठीक आहे. आणखी एक गोष्ट सांगतो अण्णा. तुम्ही मला इथे बोलावलंत, ते माझं काम पाहूनच बोलावलं असणार. माझ्यावर भरवसा असणार तुमचा.” मी प्रस्तावना केली.
“हो. म्हणजे काय!”
“मग तो भरवसा पूर्णपणे ठेवा. अर्धवट नको.”
“म्हणजे?”
“सेन्सॉरकडे जायच्या आधी मी तुम्हाला चित्रपट दाखवणार. त्याआधी एक फ्रेमसुद्धा बघायची नाही.”
“म्हणजे तू ‘मॅरिड प्रिंट’ दाखवणार की ‘रश प्रिंट’?”
‌‌“मॅरिड प्रिंट दाखवणार!”
(चित्रपट तयार करण्याची सर्वसाधारण पद्धत अशी की, ‘शूटिंग’ पूर्ण झाल्यानंतर ‘डबिंग’ केलं जातं. मग ‘साउंड इफेक्टस रेकॉर्ड’ केले जातात, पार्श्वसंगीत दिलं जातं. या सर्व ऑडिओचं मिक्सिंग केलं जातं. आणि ते ‘व्हिज्युअल’ला जोडलं जातं. अशा प्रकारे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होतो. त्याला ‘मॅरिड प्रिंट’ म्हणतात.)
अण्णा काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, ‘ओके!”
आणि अशा रीतीनं चित्रपटाला सुरुवात झाली. अर्थात, त्याआधी मी अण्णांना संपूर्ण पटकथा ऐकवली. त्यात आवश्यक वाटल्यास काही सुधारणा सुचवा, असंही सांगितलं. अण्णांच्या अफाट अनुभवाचा आणि कल्पकतेचा लाभ मला हवाच होता! त्यांनी क्लायमॅक्समध्ये काही बदल सुचवले. हे चौघंही शेवटी जास्त अडचणीत आले पाहिजेत, असं त्यांना वाटत होतं. वसंत सबनीसही माझ्यासोबत होते.
मी म्हटलं, “ठीक आहे अण्णा. तुम्हाला काय म्हणायचंय ते लक्षात आलंय माझ्या.”

“कळलंय ना? चला! विषय संपला! सिनेमाला सुरुवात करा!!” अण्णांनी होकार देऊन टाकला.
अण्णांनी दिलेला शब्द पाळला. राजकमल स्टुडिओत सेट लागला होता. त्याच स्टुडिओत अण्णांचं ऑफिस होतं. ते रोज तिथे यायचे, पण सेटवर कधी त्यांनी पाऊल ठेवलं नाही. किरणदादा त्यांना म्हणाला, “अण्णा, चला ना, सेटवर तुमच्याबरोबर एखादा फोटो काढू.”
‌‌“नको. ते प्रकरण वेगळं आहे. मी तिथे जाणार नाही!” त्यांनी जाहीर केलं.
“का हो अण्णा?”
“माझ्या सेटवर दुसऱ्या दिग्दर्शकानं आलेलं कधी मला चालायचं का?”
“नाही.”
“मग? तो पोरगा माझ्यासारखाच आहे!” अण्णांनी किरणदादाला समजावलं.

‘हृदयी वसंत फुलताना…’ गाण्याचं शूटिंग झालं, त्यानंतर मी ते किरणदादाला दाखवलं. तो उत्साहानं अण्णांकडे गेला.
“अण्णा, काय गाणं केलंय सचिननं. बघा ना!”
“एक मिनिट. त्यानं मला गाणं दाखवायला सांगितलंय का?”
“नाही.”
“मग मी नाही बघणार!” अण्णासुद्धा माझ्यापेक्षा जास्त हट्टी. अर्थात, त्यांनी मला दिलेला शब्द ते पाळत होते. आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता आणि तोच आम्ही व्यक्त करत होतो.

एकदा अण्णांच्याच एका खोलीत कुणीही नसताना मी सिगारेट ओढत बसलो होतो. ते दुपारी तिथे येत नाहीत, हे मला माहीत होतं. अचानक ते तिथे आले. मला सिगारेट ओढताना बघून ‘सॉरी… सॉरी…’ असं म्हणून बाहेर निघून गेले! मलाच अपराधी वाटलं. मी सिगारेट विझवून बाहेर गेलो. ते बाहेर उभे होते.
“सॉरी हं, मला माहीत नव्हतं!” ते मला म्हणाले.
“अण्णा, अहो मला ‘सॉरी’ काय म्हणताय? तुमचीच केबिन आहे!!” मी म्हणालो. पण त्यांच्या मनाचा तो मोठेपणा होता.
“मी ‘वॉक’ घेऊन येतो,” ते म्हणाले. मग मीसुद्धा त्यांच्याबरोबर गेलो. त्या वेळी शूटिंग पूर्ण झालं होतं आणि संकलनाचं काम सुरू होतं. त्या फेरफटक्यात त्यांनी मला बरेच अनुभव सांगितले. ‌अशक्य गोष्ट कल्पकतेतून कशी काय साध्य करायची, हे अण्णांकडून मला शिकायला मिळालं.
लक्ष्याच्या डोहाळ-जेवणाच्या वेळच्या ‘कुणीतरी येणार, येणार गं…’ या गाण्याचं शूटिंग आम्हाला गच्चीत करायचं होतं. त्यासाठी चांगली गच्चीच मिळत नव्हती.
मला एकदम आठवलं की, ‘राजकमल’च्या इमारतीलाही गच्ची आहे. मग मी आणि किरणदादा ती बघून आलो. ती छान होती. तिथे शूटिंग करू या का, असं मी त्याला विचारलं. अडचण एकच होती की, त्याच गच्चीच्या बरोबर खाली अण्णांची बेडरूम होती आणि मला तीन रात्रभर तिथे शूटिंग करायचं होतं. अण्णांकडे परवानगी मागितली गेली.
“अण्णा, गाण्याचं शूटिंग सचिनला आपल्या गच्चीत करायचं आहे.”
‌‌“करू दे ना मग!”
“तीन रात्र शूटिंग चालेल. त्यातून गाण्याचे स्पीकर्स. तुमच्या झोपेचं काय?”
“तीनच रात्रींचा प्रश्न आहे ना? मी नाही झोपणार! त्यात काय एवढं?” ते म्हणाले.
मग आम्ही तीन रात्रींत ते शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर पुन्हा संकलनाच्या ठिकाणी अण्णा भेटले. मी नमस्कार केला.
“काय, माझ्या डोक्यावरच नाचलास? आनंद मिळाला ना तुला?” त्यांनी विचारलं.
“काय अण्णा!” मी हसलो.
“गंमत केली रे. कर, कर! चांगलं गाणं केलंयस म्हणे. कळलंय मला!”
मी नम्रपणे हसलो. तरीही ‘तुम्ही एकदा गाणं बघा’, असं अण्णांना चुकूनही म्हटलं नाही.

… आणि अखेर तो दिवस उजाडला. चित्रपटाची ‘मॅरिड प्रिंट’ तयार झाली. आता अण्णांना चित्रपट दाखवायचा होता. मी एक चॅलेंज स्वीकारून, अण्णांना अटी घालून स्वत:च्या हिमतीवर चित्रपट तयार केला होता, पण अण्णांची प्रतिक्रिया काय असेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. माझा हा आत्मविश्वास माझ्या अंगाशी तर येणार नाही ना, अशी धाकधूक मनात होती, पण कुठेतरी भट्टी जमलेय, असं मात्र माझ्यासकट युनिटमधल्या प्रत्येकाला वाटत होतं.
राजकमल स्टुडिओमध्येच ट्रायल होणार होती. मी ट्रायलला अन्य काही लोकांनाही निमंत्रण दिलं. कॉमेडी चित्रपट होता, त्यामुळे वातावरणनिर्मिती आवश्यक होती.
ट्रायल सुरू झाली. माझे कुटुंबीय होते, सुप्रियाचे आई-वडीलही आले होते. मी सगळ्यात मागच्या सीटवर बसलो होतो. चित्रपट सुरू झाला. पहिला पंच गेला, दुसरा पंच गेला… कुणी हसायलाच तयार नाही. अण्णा थिएटरमध्ये असल्याचं दडपण असावं. शेवटी ‘धनंजय माने इथेच राहतात का…’, या दृश्याच्या वेळी अण्णा हसून सीटवरून अक्षरश: खाली पडले. त्यानंतर थिएटरमध्ये जो काही हशा सुरू झाला, तो शेवटपर्यंत थांबलाच नाही.
चित्रपट संपल्यानंतर थिएटरमध्ये लाइट लावले गेले. सगळे जण अण्णांच्या प्रतिक्रियेसाठी थांबले होते. अण्णांनी दोन्ही हात वर घेऊन टाळ्या वाजवून चित्रपटाला दाद दिली. त्यानंतर सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. अण्णा थेट माझ्या आईकडे गेले. तिला म्हणाले, “बघितलंत, तुमचा मुलगा काय-काय करू शकतो ते? काय ‘एडिटिंग’ आहे सिनेमाचं. चित्रपटाला एवढा वेग असूनसुद्धा घाई-गडबड केलेली वाटत नाही.”
स्वत: एक उत्तम संकलक असलेले अण्णा माझी प्रशंसा करीत होते. मग माझ्याकडे वळून म्हणाले, “एकच सांगतो सचिन. यू आर अॅन अॅसेट टू फिल्म इंडस्ट्री.”
मी म्हटलं, “अण्णा, तुम्ही हे बोललात, मला सगळं मिळालं. आता यानंतर एकही पुरस्कार मिळाला नाही, तरी चालेल.”

(सौजन्य : ‘हाच माझा मार्ग’, लेखक – सचिन पिळगांवकर, प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस)
——–

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया