अतिथी कट्टा

दिनांक : १८-११-२०१७

‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील


‌राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारणारा ‌‘दशक्रिया’ चित्रपट १७ पासून प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे पटकथा-संवाद लेखक आणि गीतकार संजय कृष्णाजी पाटील यांचे हे मनोगत.
———-

‌‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या विषयाची ठिगणी माझ्या मनावर २०१३ मध्ये पडली. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील आणि कार्यकारी निर्माते राम कोंडिलकर माझ्याकडे आले होते. माझ्या मते चित्रपटाचे व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपट अशी विभागणी होऊ शकत नाही. चांगला आणि वाईट सिनेमा असे दोनच ठळ‌क प्रकार मला तरी जाणवतात. आम्हाला एक चांगला सिनेमा करायचा होता. परंतु, त्यात अदृश्य रेषा अशी असते की बव्हंशी चित्रपटनिर्मिती, सादरीकरण किंवा प्रस्तुतीकरणचा विचार केलास सध्या वर्षाला १५० मराठी चित्रपट रसिकांसमोर येत आहेत. यापैकी बहुसंख्य चित्रपटांचा कल हा व्यावसायिकतेकडे अधिक असतो. अशावेळी ‘दशक्रिया’सारखा ऑफबीट विषय निर्मिला जाणे हे खूप मोठं धाडस आहे. सामाजिक भान असलेला आलेख या चित्रपटामधून मांडण्यात आला आहे. अशा चित्रपटांच्या पाठीशी उभे राहणारे लोक खूप थोडे असतात. ‌‘रंगनील क्रिएशन्स’च्या माध्यमातून कोठारी कुटुंब या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून आम्ही हा चित्रपट करण्याचं धाडस करू शकलो. सगळी सोंगं करता येतात पण पैशांचं सोंग नाही करता येत. त्यामुळे

या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मिळालेल्या यशात निर्मात्यांचा खूप मोठा वाटा आहे, हे मी नमूद करू इच्छितो. माझा यापूर्वीचा ‌‘जोगवा’ चित्रपटसुद्धा तब्बल १२ वर्षांची तपश्चर्या होती. या चित्रपटाची ‌‘स्क्रीप्ट’ घेऊन मी हिंदी तसेच अनेक मराठी निर्मात्यांकडे गेलो होतो. खरं तर या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान करणार होता. परंतु, सहा महिने उलटले तरी त्यांच्याकडून काहीच हालचाल दिसली नाही. तेव्हा मी शाहरूख खान यांच्या सेक्रेटरली फोन करून ‌‘जोगवा’ तुम्हाला करायचा आहे की नाही याबद्दल विचारणा केली. यावेळी माझ्यासमोर हे बसले होते. त्यांनी मला चित्रपटाचं आधी शीर्षक विचारलं. त्यानंतर विषयाबद्दल चौकशी केली. तेव्हा मी त्यांना ‌‘जोगवा’ची कथा दोन-चार ओळींमध्ये सांगितली. दीड-दोन मिनिटांमधलं माझं हे कथानक ऐकून त्यांनी मला खिशातून शंभराच्या पाच नोटा काढून दिल्या. ‌‘संजय ये तेरा अॅडव्हान्स. किसीके दरवाजेपे जाने की जरूरत नहीं । यह फिल्म मैं प्रोड्युस कर कर रहा हूं’. त्या देवदूताचं नाव आहे श्रीपाल मोराकिया. तात्पर्य हे आहे की, चांगला कलाकृतींमागे उभं राहणारी भली माणसं लागतात. त्याशिवाय मराठी सिनेमा पुढं जाणार नाही.२०१३ ते २०१६ असं या चित्रपटाचं काम सुरू आहे. खूप चांगल्या टीमनं या चित्रपटावर काम केलं आहे. अत्यंत व्यग्र शेड्यूल असूनही दिलीपकाका प्रभावळकर, मिलिंद फाटक, अदिती देशपांडे, आशा शेलार, उमा सरदेशमुख, मनोज जोशी या सगळ्यांनी खूप साथ दिली. पावसामुळे आमचं सगळं शेड्यूलच बिघडलं होतं. एका शेड्युलमध्ये होणारं शूटिंग तीन शेड्यूलवर गेलं आणि ते तब्बल ५५ दिवस चाललं. त्यामुळे चित्रपटाचं मूळ बजेट पावणे दोन पटीनं वाढलं. या सगळ्या कठीण काळात सगळेजण खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. मनोज जोशींना गोरेगावच्या आरे कॉलनीत मी आणि संदीप भेटायला गेलो होतो. त्यांचं एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यांच्याकडे नवीन चित्रपटासाठी तारखा नव्हत्या. परंतु, आम्हाला आमच्या चित्रपटामधील व्यक्तिरेखेसाठी मनोज जोशीच हवे होते. त्यामुळे केवळ त्यांच्यासाठी आम्ही सहा महिने थांबलो. मिलिंद फाटक, आशा शेलार तसेच इतर कलाकार मंडळी दिवसभर मुंबईत शूटिंग करायची आणि रात्रभरचा प्रवास करून गारगोटीमध्ये दाखल व्हायचे. या सर्व कलाकारांच्या योगदानामुळेच ही कलाकृती चांगली बनली आहे. ही कलाकृती सुंदर झालीय असा माझा दावा असेल. परंतु, जेव्हा एखादी कलाकृती प्रदर्शित होते, तेव्हा ती फक्त आमची न राहता रसिक मायबाप प्रेक्षकांचीही असते. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचीही ती असते. रसिक प्रेक्षक सुजाण आहेत, त्यांना आमची आशयघनता आवडेल, समजेल अशी अपेक्षा मी करतो.

‌‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ आणि आता ‘दशक्रिया’ एक वेगळं ध्येय, वेड मेंदूत घेऊन आम्ही दिवसरात्र फिरणारे फकीर लोक आहोत. आयुष्यभर आम्ही फकीरच राहू. यापुढेही अशाप्रकारच्या चांगल्या कलाकृती करीत राहू, असा आशावादही मी व्यक्त करतो.

– संजय कृष्णाजी पाटील

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

संदीप पेंढारकर


खुप खुप सुंदर माहिती ..मराठी चित्रपट कलावंत आणि निर्माते,दिग्दर्शक यांचा जीवन प्रवास सहजपणे उलगडून दाखवीत असतात ...मनःपूर्वक शुभेच्छा
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया