अतिथी कट्टा

दिनांक :

‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस

बॉलिवुडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी आता दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शक बनले आहेत. या चित्रपटासंदर्भात त्यांचे हे मनोगत.
——-

२००३-२००४ पासून मला चित्रपट बनवायचा होता. मी तीन हिंदी चित्रपट लिहिले होते. परंतु, त्यापैकी एकाचीही सुरुवात काही झाली नाही. काही ना काही तरी अडचणी यायच्या. मग मी गेल्या वर्षी ठरवलं की, हीच ‘स्क्रीप्ट’ आता आपण मराठीत करायची. ज्या दिवशी मी ठरवलं की आपण आता मराठीत चित्रपट करायचा, तेव्हापासून सर्व गोष्टी अगदी नीट घडायला लागल्या. आमच्या बोर्डवर सुबोध भावे, मुक्ता बर्वे आले. इतरही गोष्टी नीट घडल्या. थोडक्यात माझ्या नशिबात दिग्दर्शक म्हणून माझी पहिली फिल्म ही मराठीच होती. हिंदीत लिहिलेली पटकथा मग मी मराठी कल्चरला साजेशी बनवली. मराठी चित्रपटांचा प्रेक्षक खूप हुशार असतो. त्यांना फारशा ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ आवडत नाहीत. त्यांना वास्तवदर्शी गोष्ट आवडते. त्या पद्धतीनं मग मी नव्यानं ‘हृदयांतर’चं लेखन केलं. त्याच्यात आमचे २-३ महिने गेले आणि १० डिसेंबरला आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. ‘हृदयांतर’ हा एका कुटुंबाचा प्रवास आहे. ही नात्यांची कहाणी आहे. पती-पत्नी, वडील-मुली, दोन बहिणी असं नातं या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. थोडक्यात सगळे नातेसंबंध या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मला फॅशनवरती नव्हे तर नात्यांवरच सिनेमा बनवायचा होता. मला माझ्या चित्रपटामधून फॅशनच्या चांगल्या शक्यता नव्हे तर गोष्ट सांगायची होती. चित्रपट लिहिल्यानंतर मग सर्वात चांगले तंत्रज्ञ घेतले. फराह खान, श्यामक दावर, प्रफुल्ल कार्लेकर, मंदार चोळकर अशी टीम मला जॉईन झाली. मी खूप ‘प्री प्लॅन्ड’ असतो. त्याचा मला या चित्रपटासाठी उपयोग झाला. शाहरूख खान, हृतिक रोशन, ऐश्‍वर्या राय ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील मोठी नावं या चित्रपटाशी जोडली गेली. तसेच हिंदीमधले चांगले तंत्रज्ञही मी पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी घेतले.

‘हृदयांतर’पूर्वी मी फारसे मराठी चित्रपट पाहिले नव्हते. माझी आवड अधिक नाटकांची होती. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी दादरच्या ‘शिवाजी मंदिर’ला पुष्कळ नाटकं पाहिली आहेत. फक्त मराठीच नव्हे तर माझ्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपट पाहण्यासाठीही वेळ नव्हता. माझी कास्टिंग दिग्दर्शक मोनिका धारणकरकडे मी चित्रपटाची ‘कास्ट’ निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. तिनं सुबोध भावे आणि मुक्ता बर्वेचं नाव सुचवलं.

माझ्या आई-वडिलांचेही हे दोघे आवडते अभिनेते आहेत. या दोघांची मी फक्त नावं ऐकली होती. त्यांचं तोपर्यंतचं काम मी पाहिलं नव्हतं. परंतु, मोनिका आणि आई-वडिलांच्या सांगण्यावरून मी सुबोध आणि मुक्ताला ‘हृदयांतर’चं कथानक ऐकवलं. त्यांना ते आवडलं. सुबोध आणि मुक्ताला माझ्या घरी पाहिलं तेव्हा पाच मिनिटांमध्येच मला कळलं होतं की हेच माझ्या चित्रपटातील ‘शेखर जोशी’ आणि ‘समायरा जोशी’ आहेत. सुबोध आणि मुक्तानं हा चित्रपट करण्यास नकार दिला असता तर मग मी इतर ‘ऑप्शन’ पाहिले असते. ‘स्क्रीप्ट नॅरेशन’चं तीन तासांचं काम संपल्यानंतर लगेचच मुक्ता आणि सुबोधनं हा चित्रपट करण्यास होकार दिला.

जशी फिल्म मी लिहिली होती तशीच ती पडद्यावर उतरली आहे. त्याचं श्रेय आमच्या ‘प्री प्रॉडक्शन’ टीमला द्यायला हवं. खरं तर आम्ही ३० दिवसांचं शेड्युल आखलं होतं. परंतु, अवघ्या २४ दिवसांमध्ये हा चित्रपट आम्ही पूर्ण केला. खरं तर दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलीच चित्रपट. मी कोणाकडेही या चित्रपटापूर्वी दिग्दर्शनाचे धडे घेतलेले नव्हते. कदाचित इतकी वर्षे चांगल्या दिग्दर्शकांचे काम पाहत गेल्याचा मला लाभ झाला असावा. दिग्दर्शन करण्यापूर्वी मी कोणाचंही मार्गदर्शन मुद्दाम घेतलं नाही. कारण हा चित्रपट मला माझ्या नजरेनं बनवायचा होता. मी जर दुसर्‍या कोणाचं मार्गदर्शन घेतलं असतं तर ते वेगवेगळे दोन-चार चित्रपट बनले असते. आता जो चित्रपट बनवलाय तो संपूर्णतः माझा आहे. जे काही चांगलं आहे ते माझं आहे आणि ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, त्यादेखील माझ्याच आहेत. माझ्या आवड़ीच्या फिल्मची लिस्ट बनवायची असेल तर मी ‘तारे जमीं पर’, ‘पिंक’, ‘तलवार’ या चित्रपटांची नावं घेईन. मला संजय लीला भन्साळी आणि करण जोहरचे सगळे चित्रपट आवडतात. अगदी अलीकडचे म्हणाल तर मला ‘मुरांबा’ आणि ‘चि. व चि. सौ. कां.’ हे चित्रपट आवडले होते.

हृतिक रोशनच्या शूटच्या दिवशी खूप पॉझीटिव्ह एनर्जी होती आमच्या टीममध्ये. तो दिवस माझ्या कायम स्मरणात राहील. हृतिक या चित्रपटामध्ये स्वतःचीच भूमिका करतोय. कथानकाची गरज होती म्हणून त्याला मी घेतलं. कथानकाची गरज असल्यामुळे हृतिकची या चित्रपटासाठी निवड झाली. पाचगणीतील एक रात्र वगळता इतर २३ दिवस हा चित्रपट आम्ही मुंबईत चित्रीत केला. या चित्रपटाचं संगीतदेखील माझ्यासाठी विशेष आहे. मला संगीतासाठी खूप वेळ देणारा संगीतकार हवा होता. मला १० ‘ट्यून्स’ माझ्या घरी येऊन ऐकवणारा संगीत दिग्दर्शक नको होता. माझ्या चित्रपटातील गाणी-संगीत हे कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. मला हवा असणारा वेळ प्रफुल्ल कार्लेकर आणि मंदार चोळकरनं दिला. चित्रपटामधील ‘स्पोर्टस् डे’चा प्रसंग चित्रीत करताना माझी थोडी कसोटी लागली. कारण त्या दिवशी मला ४०० लहान मुलांबरोबर काम करायचं होतं. परंतु, सगळं छान पद्धतीनं झालं. चित्रपटातील दोन्ही मुलींनी आपल्या संवादांचं डबिंग ‘स्क्रीप्ट’शिवाय केलं. ‘हृदयांतर’ माझ्यासाठी ‘ब्लेस्ड’ होती. परमेश्‍वराचा माझा डोक्यावर हात होता. त्यामुळे सगळं काही ठरवल्याप्रमाणे घडलं. या चित्रपटाचं मार्केटिंग करतानाही आम्ही खूप काळजी घेतलीय. एक कौटुंबिक चित्रपट म्हणूनच आम्ही त्याची प्रसिद्धी करतोय. ज्या लोकांचा नातेसंबंधांवर विश्‍वास आहे, त्यांच्यासाठी ही चित्रपट आहे. मार्केटिंगमध्ये आम्ही कसलेही गिमिक्स केलेले नाहीत. लोकांना उल्लू बनवून चित्रपटगृहात आणणं मला पटत नाही. त्यामुळे प्रेक्षक नक्कीच हा नातेसंबंधांवरील चित्रपट पाहतील याची मला खात्री आहे.
– विक्रम फडणीस
——–

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

नारायण केशव


सुधीर फडके, पु . ल. देशपांडे आणि ग. दि. माडगुळकर यांच्या जीवनावरील आपण सादर केलेले AV व्हिडीओ खूप सुंदर होते. सुधीर नांदगावकरजींनी ती माहिती व्हिडीओ रूपात सादर केली या बद्दल त्यांचे आभार.
संदर्भ:- प्रतिक्रिया