अतिथी कट्टा

दिनांक : १३-११-२०१७

‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी


प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘हंपी’ चित्रपट येत्या १७ तारखेला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं तिच्याशी साधलेला हा संवाद.
———-

‘हंपी’मधील तुझी व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे?

– या चित्रपटामध्ये मी इशा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. मी केलेली ही पहिलीच ‘ट्रॅव्हल फिल्म’ आहे. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ पद्धतीची ही भूमिका आहे. ही आजच्या काळातलीच मुलगी आहे. ती बाहेर फिरणारी मुलगी तर आहेच, पण ‘हंपी’ चित्रपट म्हणजे तिच्या मनातलाही प्र‌वास आहे. काही कारणांमुळे तिच्या मनात वेगळीच घालमेल सुरू असते. परंतु, हंपीच्या प्रवासात तिला अशा काही व्यक्तिरेखा भेटतात की ज्यांच्यामुळे ती आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहायला लागते. त्यांच्यामुळे तिचं आयुष्य सुंदर बनतं.

‘हंपी’च्या लेखक-दिग्दर्शकाबद्दल काय सांगशील?

– हंपीचं लेखन केलंय ते अदिती मोघेनं आणि दिग्दर्शक आहे प्रकाश कुंटे. अदितीनं खूप छान सिनेमा लिहिलाय आणि तो तेवढ्याच ताकदीनं प्रकाश कुंटेंनी दिग्दर्शित केलाय. मुळात चित्रपट हे दिग्दर्शकाचंच माध्यम असतं. मी या चित्रपटात दिग्दर्शकाच्या व्हिजनला फॉलो केलंय. आम्ही स्क्रीप्टचं बरंच वाचन केलं. भरपूर चर्चा केल्या. भरपूर मेहनतही केलीय. मुळात हे कथानक कशावर बेतलेलं नाही. ते पूर्णत: नवीन आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना त्याच्यावर काम करताना भरपूर मजा आली.

मराठीत ट्रॅव्हल फिल्म शक्यतो बनत नाहीत. याबद्दल काय सांगशील?

– मी स्वत:ला खूप नशीबवान मानते. सध्याच्या अमेझिंग युगात मी काम करतेय. इथंच खरोखरीच वेगवेगळे प्रयोग करायला वाव आहे. आम्ही जे जे वेगळं करतोय, तो प्रेक्षक स्वीकारतोय. त्यामुळे आमचा हुरूप आणखी वाढला आहे. हंपी शहराला स्वत:ला स्वतंत्र इतिहास आहे. जरी हे शहर कर्नाटकात असलं तरी या शहराबरोबर महाराष्ट्राचं नातं जोडलेलं आहे. तिथं एक विठ्ठल मंदिरही आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना हंपीविषयी आणखी वेगळी माहिती मिळेल.

थोडक्यात प्रेक्षकांना एका तिकीटात हंपीची सफर एका वेगळ्या कथानकासोबत पाहायला मिळेल. अमलेंदू चौधरी यांचं कॅमेरावर्क खूप छान आहे. मुळात हंपी ही अशी जागा आहे की तिथं कुठंही फ्रेम लावली तरी ती सुंदरच दिसते. परंतु, अवघ्या २०-२५ दिवसांमध्ये हे सगळं सौंदर्य टिपणं अवघड काम होतं.

तुझ्या को-स्टार्सबद्दल तू काय सांगशील?

– प्रियदर्शन जाधव, प्रार्थना, ललित प्रभाकर यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम केलंय. एकमेकांसोबत जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काम करता तेव्हा तुमच्यातील ‌‘केमिस्ट्री’ काही वेगळीच असते. खरंतर आपापल्या व्यक्तिरेखेचं हसणं, रडणं सारखंच असतं. परंतु, समोरच्या व्यक्तिमुळे आपण वेगळे दिसत असतो. ‌‘हंपी’मध्ये तसंच काहीसं घडलंय. दोन नायिकांमध्ये मैत्री नसते, असं लोकांना उगाचच वाटतं. मात्र ‘हंपी’मुळे मी आणि प्रार्थना खूप चांगल्या मैत्रिणी बनलोय. तिची या चित्रपटामधील भूमिका ‘हॉट’ आहे. ललितनं साकारलेला ‘कबीर’ खूप इंट्रेस्टिंग आहे. तो अत्यंत उत्साही आहे. तो कायम सेटवर फ्रेश असतो. त्यामुळे या सगळ्यांबरोबर माझी केमिस्ट्री छान झालीय.

या चित्रपटामधील तुझा ‘लुक’ अगदीच वेगळा आहे. त्यामागचं काही विशेष कारण?

– या वेगळ्या ‘लुक’चं क्रेडिट दिग्दर्शक प्रकाश कुंटेचं आहे. त्याच्या मते मी आतापर्यंत पडद्यावर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा इशाची व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. त्यामुळे त्याला या व्यक्तिरेखेचा ‘लुक’ही वेगळा अपेक्षित होता. खरं तर ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटासाठी मी केस कमी केले होते. परंतु, प्रकाशला इशा ही आणखी छोट्या केसांमध्ये हवी होती. मी स्वत: त्याबद्दल कॉन्फिडंट नव्हते. मात्र प्रकाशनं मला छोटे केस ही व्यक्तिरेखेची गरज असल्याचं पटवून दिलं. मात्र याचा झालेला एक मोठा फायदा म्हणजे मी अवघ्या १० मिनिटांमध्ये तयार होऊन सेटवर हजर व्हायचे.

या चित्रपटामध्ये तुझ्या वाट्याला चांगला डान्स आला आहे. तो अनुभव कसा होता?

– हा स्टेजवरचा परफॉर्मन्स नसल्यामुळे तो माझ्याकडून खूप सहज उतरलाय. नरेंद्र भिडे यांचं संगीत, राहुल देशपांडेंचा आवाज आणि फुलवा खामकरच्या नृत्यदिग्दर्शनामुळे मजा आलीय. एक गाणं तर आम्हाला शूटिंगच्या आदल्या रात्री मिळालं. त्यामुळे रिहर्सला फार वेळ मिळाला नाही. त्यामुळे फुलवानं सेटवर स्टेप्स सांगायची नि आम्ही लगेचच टेक घ्यायचो.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रावसाहेब मगदूम रुई,कोल्हापूर

नाटक आणि सिनेमा क्षेत्रात कोल्हापूर मध्ये राहूनच कोल्हापूर मधील अनेक दिग्गज कलावंत घडविणेचे कार्य ज्यांनी केले असे थोर कलावंत जयशंकर दानवेसाहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया