अतिथी कट्टा

दिनांक : ३०-०७-२०१७

सुलोचनादीदींची मुलाखत…
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा आज ८८वा वाढदिवस. त्यानिमित्तानं दिवंगत पत्रकार आणि सुलोचना यांचे स्नेही वसंत भालेकर यांनी ‘सुलोचना’ पुस्तकासाठी घेतलेली त्यांची दीर्घ मुलाखत आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. या मुलाखतीचा हा संपादित भाग. या मुलाखतीमधून सुलोचनादीदींच्या वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं.
——-


गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ आपण सातत्याने कॅमेर्‍यापुढं वावरत आहात. अभिनय हा आपला श्वास आहे. या प्रदीर्घ कालावधीत आपण केलेल्या कामाने आपल्याला समाधान दिलं का?
– निश्‍चित दिलं आहे त्यातही मराठी चित्रपटांनी अभिनयाचं पुरेपुर समाधान मला दिलं आहे. मराठी चित्रपट व्यवसायामुळं मला जनमानसात मानाचं स्थान लाभलं. आयुष्यात स्थैर्य प्राप्त झालं. मराठीतील एक उत्तम अभिनेत्री अशी पार्श्‍वभूमी असल्यामुळं हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसवायला फारसा वेळ लागला नाही. त्यामुळंच इथं काम करताना आर्थिक मिळकतीचा मी कधीच विचार केला नाही. मी काम केलेल्या अनेक चित्रपटांचे पैसे बुडाले असतील. पण त्यासाठी मी कधी कुणाला अडवलं नाही. मुळात म्हणजे मी प्रारंभापासून मराठी चित्रपट स्वीकारताना निर्मात्याशी कधी लिखित करार करीत नाही. त्यामुळं आर्थिक व्यवहार आतबट्ट्याचा झाल्याचं दु:खही होत नाही. शिवाय पहिल्या चित्रपटातील कामाचे ठरलेले पैसे देऊ न शकलेला निर्माता तोंड न चुकवता परत नव्या चित्रपटातील भूमिकेचा प्रस्ताव घेऊन येत असे. आपली झालेली आर्थिक अडचण मला मोकळेपणाने सांगत असे. त्यामुळं यात कुठंही फसवाफसवीचा प्रश्‍नच उद्भवत नसे.
याबाबतचं एकच उदाहरण देते जेव्हा दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी प्रथमच निर्माता म्हणून उभे राहिले. स्वत:ची ‌‘आल्हाद चित्र’ ही संस्था स्थापन करून त्यांनी ‘बाळा जो जो रे’ हा पुढं खूप गाजलेला चित्रपट आम्हा सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांच्या सहकार्याने पूर्ण केला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत गेला त्यामुळं अनेक ठिकाणी त्याने रौप्य महोत्सव साजरे केले. दत्ता धर्माधिकारी यांनी आपल्या ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ या दुसर्‍या चित्रपटाच्या वेळी याची जाणीव ठेवून पूर्वी ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्या सर्वांची आवर्जून भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, ‘‘मी दिलेल्या पैशात तुम्ही या पूर्वीचा चित्रपट केला आहे. आता तुम्ही
तुमचं मानधन सांगा.’’ मी ते द्यायला तयार आहे. असे कृतज्ञता व्यक्त करणारे प्रामाणिक आणि दिलदार वृत्तीचे निर्मातेही या प्रदीर्घ काळाच्या कला प्रवासात मला लाभले. दत्ता धर्माधिकारी यांनी तर त्यावेळी आपल्या ‘आल्हाद चित्र’च्या सर्व कर्मचार्‍यांचा विमाही उतरवला होता.
‘माझं घरं माझी माणसं’ या माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळची एक कटू आठवण सांगते.

कुटुंबियांच्या दबावामुळं मी त्यावेळी निर्माते-दिग्दर्शक राजा ठाकूर यांना सांगितलं की, माझं मानधन अगोदर माझ्या हाती पडलं तर मी चित्रणासाठी येईन. १९५५-५६ची ही गोष्ट. माझ्या या वागण्याने ‘नव चित्र’च्या सर्व युनिटलाच जबरदस्त धक्का बसला. कारण त्यांनी माझ्याबाबतीत कधी स्वप्नातही अशा अडवणुकीच्या भाषेची अपेक्षा केली नव्हती. ऐनवेळी अशी पैशांची व्यवस्था करणं तसं मराठी निर्मात्याला अवघडच होतं. पण माझ्या आग्रहामुळं राजा ठाकूर यांनी धावपळ करून ही व्यवस्था केली आणि मानधनाचा चेक माझ्या स्वाधीन केला. कुटुंबियांचंही तो चेक पाहून समाधान झालं. ‘माझं घर माझी माणसं’च्या चित्रणातील अडसरही त्यामुळं दूर झाला. मात्र चित्रणाच्या दिवशी मी सेटवर सर्व युनिटसमोर दिलगिरी व्यक्त करीत तो मानधनाचा चेक फाडला आणि त्याचे तुकडे राजा ठाकूर यांच्या हातावर ठेवले. त्यानंतरच्या चित्रणात कधीही अडधळा निर्माण झाला नाही.
मराठी चित्रपट निर्मात्यांची वेळोवेळी होणारी आर्थिक कोंडी मी जवळून पाहिली आहे. अनुभवली आहे. कसलंही सरकारी आर्थिक सहाय्य नसताना तुटपुंज्या भांडवलावर प्रसंगी आई-पत्नीच्या अंगावरील दागिने विकून पूर्वीच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी उत्तमोत्तम दर्जेदार मराठी चित्रपट पूर्ण केले. तांत्रिक दर्जात ते सरस नसतील पण विषयाची विविधता, कसदार लेखन, कल्पक दिग्दर्शन, सरस अभिनय, श्रुतीमधुर संगीत याबाबतीत ते कुठंच कमी पडत नसत. जुनं ते सारंच सोनं या जुनाट मताची मी मुळीच नाही. नव्याचंही मी तितक्याच उत्साहाने स्वागत करीत आले आहे. नव्यांबरोबरही माझे सूर जुळतात. पण आजची सुबत्ता, सरकारी आर्थिक सहाय्य, तंत्रातील प्रगती असूनही आजचे मराठी चित्रपट असे का? या विचारानं माझं मन व्यथित होत होतं.
पण रात्रीचा अंधार घालविण्यासाठी सूर्योदय होतच असतो. संदीप सावंत लिखित, दिग्दर्शित ‘श्‍वास’ या मराठी चित्रपटाने देशाील सर्व भाषातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ पटकावून हेच सिद्ध केलं. अर्थात त्यासाठी पन्नास वर्ष वाट पहावी लागली. भारत सरकारने १९५४ साली चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची योजना कार्यवाहीत आणली आणि १९५३ साली पडद्यावर आलेल्या आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ने पाहिलं राष्ट्रपती सुवर्णपदक महाराष्ट्रात आणलं त्यानंतर एकविसाव्या शतकात हा सुयोग जुळून आला. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने १४ ऑगस्ट २००४ हा सुवर्ण दिनच ठरावा. कारण त्या दिवशी भारताच्या राजधानीतून या राष्टीय पुरस्काराची घोषणा झाली.

यापुढं मात्र हा सुयोग वारंवार घडून यावा हीच मनापासून सदिच्छा!
आपण स्वीकारलेल्या भूमिकांची तयारी कशी करता? त्यासाठी कशी मेहनत घेता?
– चित्रपटाचं स्क्रिप्ट वाचत असताना वा ते ऐकत असतानाच ती भूमिका माझ्या मनात हळूहळू साकार होत जाते. चित्रपटात माझ्या भूमिकेचं स्थान, तिची जातकुळी कळली की माझं विचारचक्र सुरू होतं. त्यातूनच तिला पोषक असं वातावरण तयार होतं. त्यात तिच्या वेषभूषा, वेशभूषापासून सारं सामावलेलं असतं. मराठी चित्रपटात, खानदानी मराठा, शेतकरी, ब्राह्मण , सवाष्ण विधवा,अविवाहित, श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय असे व्यक्तिरेखेचे विविध प्रकार असतात. त्यांच्या साडीचोळीपासून दागदागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा असतो. तो आधी मी समजावून घेते. साध्या नऊवारी साडीतही वेगवेगळे प्रकार असतात. घरंदाज मराठा गृहिणी आणि ब्राह्मण गृहिणी यांच्या साडीत वेगळेपणा असतो. मराठा गृहिणी घराबाहेर पडताना, समाजात वावरताना, डोक्यावर पदर घेणार, ब्राह्मण सुवासिनीचा पदर खांद्यावर पण अंगभर असतो. शेतकरी स्त्रीचं साडी नेसणं या दोघींपेक्षा वेगळं, विधवेच्या साडीत आणखी वेगळेपणा, शेतकरी स्त्रीचं साडी नेसणं या दोघींपेक्षा वेगळं. विधवेच्या साडीत आणखी वेगळेपणा. ऐतिहासिक स्त्रीचं नऊवारी परिधान करणं यापेक्षा निराळं. शिवाय हीच नऊवारी साडी घरी नेसणं आणि घराबाहेर पडताना नेसणं याचा आणखी एक प्रकार. यांच्या अंगावरचे दागिनेही वेगवेगळ्या प्रकारचे. नाकातील नथीतही फरक. तोच फरक गळ्यातल्या मंगळसूत्रातही. त्यामुळं ५-६ प्रकारची मंगळसूत्रं, नथी, विविध दागिने माझ्या संग्रहीच ठेवले आहेत. कोळी, माळी, सोनार, ब्राह्मण आदी समाजातील स्त्रियांचे कपाळी कुंकू लावण्याचे प्रकारही असेच भिन्न. त्या अनेकदा ठळक कुंकवाऐवजी चिरी लावतात. ‘महात्मा ज्योतिबा फुलै’ चित्रपटातील मी रंगविलेल्या ‘सावित्रीबाई’च्या भाळी चिरीच होती.
हातातील बांगड्यांबाबतही हेच आहे. विधवा बाई हातात काचेच्या बांगड्या घालीत नाही. साड्यांचे प्रकारही वेगळे. पैठणी, टोप पदरी साड्याही मला अनेकदा नेसाव्या लागल्या आहेत. टोप पदरीमध्ये पदर रेशमी असतो. मी या सर्व वेशभूषा आणि केशभूषेचाही कसून अभ्यास केला आहे. कोल्हापूरात बाबांकडे काम करीत असताना मला याची गरज भासली नाही. कारण तेथील कपडेपट परिपूर्ण . जशी व्यक्तिरेखा तसा वेष हातात पडे. पण इतरत्र असं नव्हतं. अनेकदा निर्माता, दिग्दर्शक माझ्यावरच विसंबून राहू लागल्याने मला भूमिकेची गरज भागविण्यासाठी हे सारं शिकून घ्यावंच लागलं. ‘प्रपंच’ चित्रपटात मी फिक्क्या, फाटक्या दोन साड्या फाडून त्यातील चांगला भाग एकमेकांशी जोडून अशा साड्या नेसल्या आहेत. या चित्रपटाचं बरंचसं चित्रण पिरंगुटला झालं आहे. तेथील कुंभार आळीतील गरीब बायांना मी माझ्या नव्या साड्या दिल्या आणि त्यांच्याकडून जुन्या, फाटलेल्या साड्या घेतल्या. ब्लाऊजचे गळे लहान केले. येथे तर मी चोळ्याच घातल्या आहेत.
बाबांची शिकवण असे की, चित्रणाच्यावेळी तुम्ही कोणती वेशभूषा, केशभूषा केली आदी सारे वहीत टिपून ठेवत चला, झालेल्या चित्रणाच्या वेळची रंगभूषाही लिहून ठेवा, यालाच कंटीन्यूटी लिहिणे म्हणतात. सीन संपल्यावर ध्वनिलेखकाकडून झालेल्या सीनमधील तुमचे संवाद ऐका म्हणजे पुढचा कंटीन्यूटीचा सीन वठविताना त्याचा उपयोग होईल.
हे सारं आम्ही उमेदवारीच्या काळाच शिकलो. त्याचा फायदा पुढं खूपच झाला. व्यक्तिरेखेचं कथानकातील स्थान कळलं त्याप्रमाणं पुढची तयारी कशी करायची हे सरावाने आपोआप येऊ लागलं. खरं तर स्क्रिप्ट ऐकतानाच आपल्या मनाच्या कॅमेर्‍यात ते समूर्त होत असल्याने मला कोणतीही भूमिका कधीही कठीण वाटली नाही की नव्या दिग्दर्शकाकडे काम करतानाही कधी अवघड गेलं नाही, मी त्या त्या भूमिकेची पूर्वतयारीच एवढी चोख करीत असते की अवघडातील अवघड दृश्यंही मी सहज साकार करीत आले आहे. शेवटी हे सारं, सरावानं अनुभवानं येत असलं तरी प्रारंभापासूनच हे अंगवळणी पडायला हवं. शिवाय निरीक्षणाची सवय हवी.
मी पुण्यात बरीचशी ब्राह्मणी वातावरणात वावरत आले. प्रारंभी पुना गेस्ट हाऊसचे संचालक चारुदत्त सरपोतदार यांच्या मातोश्री सरस्वतीबाई, ‌मंगल पिक्चर्सचे एक निर्माते वामनराव कुलकर्णी यांचं कुटुंब, यांचा मला खूप सहवास लाभला. ग.दि.माडगूळकर यांच्या सुविद्य पत्नी विद्याताई यांच्याशी सुरेख सूर जुळले आणि याच काळात माणिक बेहेरे माझ्या जीवनात आली. तिच्याशी अर्ध शतकापूर्वी जडलेलं मैत्रीचं नातं आजही कायम आहे. उलट ते अधिक दृढ झालं आहे.
या सर्वांचा सततचा सहवास यामुळं ब्राह्मणी वातावरणातल्या ‘बाळा जो जो रे, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’पासून ‌‘दूधभात’, ‘वाहिनीच्या बांगड्या’पर्यंतच्या मध्यमवर्गीय माई, अक्का, वहिनी आणि आईसारख्या व्यक्तिरेखा साकार करताना खपच चांगला उपयोग झाला. ‘बाळा जो जो रे’, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ यासारख्या तरुण विधवा अक्का सजीव करताना मी राजा परांजपे यांच्या भगिनी बबुताई पुणेकरच डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. त्यामुळं त्यांचं ओचे पदराचं नऊवारी नेसणं, चालणं, बोलणं आदींचा मी अगदी डोळसपणे उपयोग करून घेतला. असं अवलोकन भूमिका वठवित असताना उपयोगात आणलं तर ती भूमिका अधिक सजीव, वास्तवतापूर्ण वाटते, पहाणार्‍यांच्या मन:पटलावर तिचा अधिक प्रभावी ठसा उमटतो. मी माझ्या चाहत्यांच्या स्मरणात कायमचं घर करून राहिले आहे याचं इंगित हेच आहे.
: आपण खूप परिश्रम घेऊन साकार केलेल्या भूमिकांचं अपेक्षेप्रमाणं स्वागत, कौतुक न झाल्याचं दु:ख होतं का? अशा कोणत्या भूमिकांवर अन्याय झाला असं आपल्याला वाटतं?
– अशा काही भूमिका निश्‍चित आहेत. पण त्यातही ‘माझं घर माझी माणसं’मधील डॉ. इरावती आणि ‘महात्मा ज्योतिबा फुले’मधील सावित्रीबाई फुले यांचं अपेक्षेप्रमाणं स्वागत न झाल्याचं जरूर दु:ख होतंय. डॉ. इरावती ही अगदी जगावेगळी व्यक्तिरेखा. प्रियकराच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या गरीब कुटुंबाचा भार घरची सून म्हणून उचलणारी ही असामान्य अविधवा मी जीव ओतून साकारली होती. अगदी वेगळी, स्वप्नवेडी, भावूक पण तितकीच कर्तव्यदक्ष इरावती रंगवित असताना मी एकदम खूष असे. कारण त्यावेळी इ़रावतीच्या भावभावनांशी समरस होताना मला आगळाच आनंद मिळे.सर्वच भूमिकांच्या बाबतीत अशी अनुभूती होतेच असं नाही. माझ्या मते डॉ.
इरावती काळाच्या आधीच लोकांसमोर आली. माझ्या सावित्रीबाई फुले यांचे अपेक्षेप्रमाणं स्वागत न झाल्याचं जरूर दु:ख होतंय. डॉ. इरावती ही अगदी जगावेगळी व्यक्तिरेखा. प्रियकराच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या गरीब कुटुंबाचा भार घरची सून म्हणून उचलणारी ही असमान्य अविधवा मी जीव ओतून साकारली होती. अगदी वेगळी, स्वप्न वेळी, भावून पण तितकीच कर्तव्यदक्ष इरावती रंगवित असताना मी एकदम खूष असे. कारण त्यावेळी इरावतीच्या भावभावनांशी समरस होताना मला आगळाच आनंद मिळे. सर्वच भूमिकांच्या बाबतीत अशी अनुभूती होतेच असं नाही. माझ्या मते डॉ. इरावती काळाच्या आधीच लोकांसमोर आली. माझ्या सावित्रीबाई फुलेचंही फारसं कौतुक झालं नाही. आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’पेक्षाही अधिक परिश्रम घेऊन ‘महात्मा फुले’ची निर्मिती केली होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते या चित्रपटाचा मुहूर्त झाला होता. ‘श्यामची आई’ला राष्ट्रपतीचं सुवर्ण पदक तर ‘महात्मा फुले’ला रौप्यपदक मिळालं होतं बाबूराव पेंढारकर फुले तर मी सावित्रीबाई. अर्थात तरुणपणाचे फुले मराठी रंगभूमीवरचे नामवंत नट बापूराव माने यांनी रंगविले होते. मी या दोन्ही नटश्रेष्ठांबरोबर सावित्रीबाईच्या भूमिकेत वावरले होते. खरं तर या व्यक्तिरेखेसाठी आचार्य अत्रे यांच्या डोळ्यांसमोर वनमालाबाईच होत्या. पण बाबूराव पेंढारकर यांनी माझा आग्रह धरला.सुलोचनाबाईच या भूमिकेला अगदी योग्य आहेत आणि त्याच तिला चांगला न्याय देतील असं त्यांनीअत्रेसाहेबांना पटवलं.

खुद्द आचार्य प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेथे बाबूराव जगताप, विठ्ठलराव घाटे, सोपानदेव चौधरी, शाहीर अमर शेख आणि कर्मवीर भाऊराव पाटील अशी नामवंत मंडळी या चित्रपटात होती. आचार्य अत्रे यांना या ‘महात्मा फुले’बद्दल खूपच अपेक्षा होत्या. आपला हा चित्रपटही राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक पटकावणार असं वाटतं होतं. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हाती पडलं रौप्यपदक! शिवाय चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरदार प्रतिसाद लाभला नाही. एक चांगला, समाजाचं प्रबोधन करणारा चित्रपट शेवटी निर्मात्याला आर्थिक चटके देणारा ठरला.
मला आठवतं, या ‘महात्मा फुले’ला राष्ट्रपतींचे रौप्यपदक लाभलं म्हणून त्या चित्रपटाचे सर्वेसर्वा आचार्य अत्रे यांचा मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते हताशपणे उद्गारले होते. ‘‘आम्ही मोठ्या उत्साहाने, उमेदीने सत्यशोधक महात्मा फुले यांचं स्फूर्तीदायक समग्रजीवन चित्रबद्ध केलं. पण या चांगल्या, उद्बोधक चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरविली. एका ब्राह्मणाने बहुजन समाजाच्या नेत्यावर चित्रपट काढला म्हणून त्या समाजाने ‘महात्मा फुले’ पाहिला नाही आणि बहुजन समाजाच्या नेत्यावर चित्रपट निर्माण करण्यासाठी एक ब्राह्मण पुढं सरसावला म्हणून ब्राह्मणांनीही माझ्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं. शेवटी दोन्हीकडूनही आम्ही घाट्यातच!”
काही भूमिका करायच्या राहिल्या याची मनाला चुटपुट लागते का?
– लागते ना. तसा कलावंत कधीच समाधानी नसतो. अहिल्याबाई होळकर, स्मृतिचित्रकार लक्ष्मीबाई टिळक आणि पानिपतच्या युद्धामुळं अमर झालेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई अशा काही संस्मरणीय व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकार करण्याची निवांत इच्छा होती. पण तो योग जुळून आला नाही. स्मृतिचित्रांची मग विजयाबाई मेहता यांनी दूरदर्शसाठी मालिका बनविली. त्यात सुहास जोशींनी लक्ष्मीबाई रंगविली. मोठ्या पडद्यावर लक्ष्मीबाई सजीव करण्याची माझी इच्छा अपुरीच राहिली. अहिल्याबाई होळकरच्या निर्मितीची दिग्दर्शक राजदत्त यांनी रूपरेखा आखली होती. त्यात अहिल्याबाईचं तरुणपण माझी कन्या कांचन रंगविणार होती. प्रौढ अहिल्याबाई अर्थात मीच, पण तोही योग आला नाही.
सदाशिवभाऊ पेशवे यांच्यावरही बाबाच चित्रपट निर्माण करणार होते. त्याची जुळवाजुळवही झाली होती. त्यातील पार्वतीबाई तूच पडद्यावर सादर करणार आहेस असं बाबांनी मला सांगितलं होतं. पण त्यांची ती निर्मितीही कागदावर राहिली. आज बाजीराव मस्तानीकडे हिंदी चित्रपट निर्मात्याचं लक्ष वेधलं असलं तरी १९५३ सालीच यशस्वी निर्माते-दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी हा भव्य चित्रपट हिंदी-मराठी भाषांतून निर्माण करणार होते. याची आता कुणाला फारशी माहिती नसेल. पुण्याच्या डेक्कन स्टुडिओत या बाजीराव-मस्तानीचा थाटात मुहूर्तही झाला होता. मी त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यात मी बाजीरावच्या पत्नीच्या भूमिकेत होते. प्रदीपकुमार बाजीराव आणि वैजयंतीमाला मस्तानी अशी पात्र योजना निश्‍चित झाली होती. मात्र ‘महात्मा’ या हिंदी-इंग्रजी भाषेतील चित्रपटाने धर्माधिकारी यांना जबरदस्त आर्थिक फटका दिल्यामुळं ही ऐतिहासिक प्रेमकहाणी पडद्यावर रंगलीच नाही.

आपल्यावर कलावंत म्हणून चित्रपटसृष्टीत कधी अन्याय झाला आहे का? आपल्याबद्दल नाहक गैरसमज झाला आहे असं कधी घडलं आहे का?
– नाहक गैरसमज झाल्याचा एक प्रकार ‘चेतना चित्र’च्या ‘सांगत्ये ऐका’ या पुण्यात विजयानंद चित्रपटगृहात सलग १३१ आठवडे चाललेल्या, विक्रमी यश मिळविलेल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी घडला होता. मी या ‘सांगत्ये ऐका’मध्ये पाटलिणीची भूमिका करणार होते. चंद्रकांत मांडरे त्यात पाटील होते. मला ही भूमिका तितकिशी न आवडल्यामुळं मी निर्माते वि. गो. नमाडे व अनंत माने यांना तसं सांगितलं. चंद्रकांत मांडरेदेखील पाटलाची भूमिका करण्यास फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळं मी पुण्याहून आल्या पावली मुंबईला परत जाण्यासाठी निघाले. पुढच्या चित्रपटात पाहू असंही मी त्यांना म्हणाले. पुण्याच्या ‘प्रभात’ स्टुडिओतील ही घटना. त्यांनी मला थोडं थांबायला सांगितलं आणि दोघांनी एकत्र चर्चा करून मला त्यातील शेतकर्‍याच्या पत्नीची छोटीशी भूमिका करण्याचा आग्रह धरला. शेतकरी अर्थात होते चंद्रकांत मांडरे. आमची जोडी तेव्हा खूप लोकप्रिय होती. त्यामुळं ही लोकप्रियता कॅश करण्याचाच त्यांचा हेतू असावा. अनंत माने यांच्याबरोबरचे कौटुंबिक संबंध लक्षात घेऊन मी त्यांना होकार दिला. आम्ही दोघांनी अक्षरश: दिवसरात्र चित्रण करून आमचं काम संपवलं. सकाळी दहा वाजता सुरू झालेलं चित्रण दुसर्‍या दिवशी दुपारी संपलं. त्यात एक गाणं, काही प्रणय प्रसंगही होते. माझं काम संपताच मी मुंबईला निघून आले. दरम्यान स्टुडिओत पडद्यामागं काही वेगळंच घडत होतं. जयश्री गडकर आई आणि मुलगी असा डबल रोल करणार होती. अनंत माने यांनी म्हणे तिला तसं सांगितलं होतं. पण मी माझं वजन खर्च करून ती आईची भूमिका खेचून घेतली असा जयश्री गडकरचा माझ्याबद्दल गैरसमज झाला. बाईंनी आपल्यावर अन्याय केला असं तिचं म्हणणं. मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. एका नव्याने उभारी घेत असलेल्या मुलीवर मी का अन्याय करीन? माझी ती प्रकृती नाही आणि मला सुदैवाने कामाला काहीच तोटा नव्हता. उलट मराठीमध्ये मला डोळ्यासमोर ठेवून भूमिका लिहिल्या जात होत्या. अशा वेळी मी एका नव्या नायिकेवर अन्याय केला अशी माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करणारी स्टुडिओत चर्चा सुरू व्हावी याचं मला खूप वाईट वाटलं.
यात जयश्रीचा काहीच दोष नव्हता. दोष द्यायचा तर अनंतराव माने यांनाच द्यायला हवा. त्यांनी मला हे सारं स्पष्ट सांगितलं असतं तर ती भूमिका मी केलीच नसती. मग हे सारं रामायण घडलंच नसतं. परिणामी माझ्याबद्दल जयश्रीच्या मनात जी कटुता निर्माण व्हायची ती झालीच. यामुळं काय झालं? निर्माते डी.जे नायक यांच्या ‘मानिनी’मधील मालतीची भूमिका मी गमावून बसले. तेथे जयश्री आली आणि मी कटाप झाले. ते देखील मला अंधारात ठेवून!
निर्माते डी.जे. नायक, दिग्दर्शक अनंत माने आणि छायालेखक ई. महंमद यांच्याशी माझी या ‘मानिनी’बाबत चर्चाही झाली होती. तीही ‘सांगत्ये ऐका’सुरू होण्याच्यापूर्वी. कोल्हापूरात माने माझ्या घराजवळच रहात. त्यामुळं त्यांनी घरी येऊन मला संपूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखविली. या भूमिकेसाठी मी नऊवारी साड्याही कोल्हापुरातच पोरे यांच्या दुकानातून खरेदी केल्या. त्यांना मॅच होईल असं ब्लाऊजचं कापडही घेतलं. कारण ते वेळीच शिवून मिळणं आवश्यक होतं. चित्रपट कोल्हापूरातच चित्रीत होणार होता. त्यामुळं पुढच्या महिन्याच्या तारखाही मी दिल्या. पण

पुढचा महिना उलटून गेला तरी मला प्रत्यक्ष चित्रणाबाबत काहीच कळविण्यात आलं नाही. तेव्हा मात्र मी बुचकळ्यात पडले. शेवटी माने यांचे सहाय्यक आणि निर्मितीचं काम पाहणारे दत्ता माने यांच्याकडून मला कळलं की ‘मानिनी’मधून मला काढण्यात आलं असून ‘मालती’च्या भूमिकेसाठी जयश्री गडकरला घेऊन चित्रपट सुरु करण्यात आला. माझ्याकडे येऊन हा बदल झाल्याचं सांगण्याचं धाडस अनंत माने यांना झालं नाही. त्यांनी तोंड लपविलं आणि दत्ता माने यांना पुढं केलं. पण तेवढं नैतिक बळ त्यांच्यापाशी नव्हतं. ‘तू बाईंवर अन्याय करीत आहेस, तू त्यांचा अपराधी आहेस,’ असं त्यांचं आतलं मन त्यांना बजावित असावं. खरं तर त्याांचे आणि माझे कौटुंबिक संबंध असल्याने त्यांनी आपली ही अडचण मोकळेपणाने मला सांगितली असती तर मी तो चित्रपट स्वत:हून सोडला असता.
त्याच क्षणी मी मनाशी दृढ निश्‍चय केला की यापुढं आपण अनंत माने यांच्या कुठल्याही चित्रपटात काम करायचं नाही. माने हयात असेपर्यंत तो मी कटाक्षाने पाळला. त्यानंतर ते अनेकदा नव्या चित्रपटाच्या ऑफर घेऊन माझ्याकडे आले. पण त्या मी स्वीकारल्या नाही. मात्र त्यांचे आणि माझे संबंध कधीही बिघडले नाहीत. डूख धरणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळं मनात कसलीही कटुता न ठेवता मी मुंबईतील ‘मॅजेस्टिक’ चित्रपटगृहातील ‘मानिनी’च्या प्रिमियर शोला आवर्जून गेले. चांगलं काम केल्याबद्दल जयश्री गडकरचं अभिनंदनही केलं. मात्र त्यानंतर मी माने यांच्या एकाही चित्रपटात कधीही काम केलं नाही. ‘रंगपंचमी’, क्रांतिवीर चाफेकर बंधूंच्या जीवनावरील‘चाफ्याची फुले’ आदी चित्रपटांच्या वेळी मी तारखा नसल्याचं कारण पुढं करून माझी असमर्थता दर्शविली. ‘चाफ्याची फुले’ चित्रपट झालाच नाही.
मला आठवतं, १९५९ सालची ही गोष्ट. ‘मंगल पिक्चर्स’च्या ‘धाकटी जाऊ’चा रजत पदकाद्वारा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. त्यातील प्रमुख कलाकार म्हणून माझाही गौरव होणार होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत माने यांनीच केलं होतं. त्यामुळं तेही सन्मानचे मानकरी होते दिल्लीला- भारताच्या राजधानीत त्यासाठी जाण्याबाबत त्यांनी आर्थिक अडचण होती. मला ते कळलं. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला केवळ आर्थिक चणचणीमुळं राष्ट्रीय स्तरावरील शासकीय गौरवाला मुकावं लागावं याचं मला वाईट वाटलं. मी मग माने यांना माझ्या खर्चाने दिल्लीला नेलं.
या गोष्टीचा मी येथे एवढ्यासाठीच उल्लेख केला की एक कलावंत आणि दिग्दर्शक म्हणून आमचे एवढे घनिष्ट, घरगुती संबंध असतानाही त्यांनी मला शेवटपर्यंत अंधारात ठेवलं याचं. कामाचं काय एवढं? ते ज्याच्या नशिबी असतं त्यालाच ते मिळतं. पण माने यांनी याबाबतीत प्रामाणिकपणाने आपली अडचण, कुचंबणा माझ्यापुढं प्रकट करायला हवी होती. येथेच ते चुकले आणि म्हणूनच त्यांच्याकडून माझ्यावर अन्याय झाला याचं मला वाईट वाटलं. मी मग माने यांना माझ्या खर्चाने दिल्लीला नेलं.
या गोष्टीचा मी येथे एवढ्यासाठीच उल्लेख केला की एक कलावंत आणि दिग्दर्शक म्हणून आमचे एवढे घनिष्ट घरगुती असतानाही त्यांनी मला शेवटपर्यंत अंधारात ठेवलं याचं. कामाचं काय एवढं? ते ज्याच्या नशिबी असतं त्याला ते मिळतं. पण माने यांनी बाबतीत प्रामाणिकपणाने आपली अचडण, कुचंबणा माझ्यापुढं प्रकट करायला होती. येथेच ते चुकले आणि म्हणूनच त्यांच्याकडून माझ्यावर अन्याय झाला हे मी कदापी विसरू शकत नाही.
(सौजन्य : अनघा प्रकाशन, ठाणे)
——–

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

नारायण केशव


सुधीर फडके, पु . ल. देशपांडे आणि ग. दि. माडगुळकर यांच्या जीवनावरील आपण सादर केलेले AV व्हिडीओ खूप सुंदर होते. सुधीर नांदगावकरजींनी ती माहिती व्हिडीओ रूपात सादर केली या बद्दल त्यांचे आभार.
संदर्भ:- प्रतिक्रिया