अतिथी कट्टा

दिनांक :

माणसाचं सुख शोधणारा चित्रपट…


विख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या ‘माचीवरला बुधा’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारलेला चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होतोय. त्यानिमित्तानं या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक विजयदत्त यांचे हे मनोगत.
——-

‘माचीवरला बुधा’ या कादंबरीवर चित्रपट करण्याची संधी आम्हांला दिल्याबद्दल गोनिदांच्या कन्या वीणाताई देव यांचा मी सर्वप्रथम आभारी आहे. एक नवोदित दिग्दर्शक जेव्हा एका अवघड विषयाला हात घालतो, त्यावेळी आपल्या विषयाचं मातेरं तर होणार नाही ना अशी लेखकाच्या किंवा त्यांच्या नातलगांच्या मनात भीती असते. त्यामुळे वीणाताईंना पहिल्यांदा मी भेटलो तेव्हा त्यांना म्हणालो, “दहा वर्षांपासून ही कादंबरी माझ्याकडे आहे. तीन वेळा मी ती वाचली आहे. या विषयाच्या मी प्रेमात आहे.” यावेळी वीणाताईंनी मला एक प्रश्न विचारला, ‌‌“तुम्हाला या कादंबरीत गोष्ट कुठे दिसली ते सांगा.” ही खरं तर माझी खूप मोठी परीक्षा होती. गोनिदांचे शब्द चित्रपटात उतरवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. दिग्दर्शक म्हणून मी योग्य विचार करतोय की नाही हे त्यांना पाहायचं होतं. मी दिलेलं उत्तर वीणाताईंना समाधानकारक वाटलं असावं. कारण त्यानंतर वीणाताई आणि माझ्यात जवळपास पाच ते सहा बैठका झाल्या. या कादंबरीमधील माझी मानसिक गुंतवणूक पाहून वीणाताईंनी मला आधी पटकथा लिहिण्यास आणि ती ऐकवण्यास सांगितलं. ती चांगली वाटली तरच त्या चित्रपट निर्मितीस होकार देणार होत्या. कारण गोनिदांचे चाहते भारताबरोबरच सातासमुद्रापारही पोचले आहेत. त्यांनी लिहिलेला शब्द चित्रपट माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये एवढाच त्यांचा हेतू होता.

प्रताप गंगावणे आणि मी ही पटकथा लिहिण्यासाठी जवळपास नऊ महिने घेतले. जोपर्यंत कागदावर चांगलं उतरत नाही, तो पर्यंत त्याचं चांगलं माध्यमांतर होणार नाही, हे आम्हा दोघांनाही ठाऊक होतं. आमचं समाधान झाल्यानंतरच आम्ही पटकथा वीणाताईंना ऐकवली. आमची पटकथा वाचून झाल्यानंतर मला वीणाताईंच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले. चला आपण ५० टक्के बाजी मारली, असे मी स्वत:लाच म्हटलं. आता खरा रोल, माझा दिग्दर्शकाचा होता. कागदावर लिहिलेलं मला पडद्यावर उतरावयचं होतं. माध्यमांतर करायचं होतं.

मुंबईच्या धकाधकीतले नकोसे झालेल्या जगण्याचा त्याग करून राजमाची गडावर निवांतपणे निसर्गाच्या कुशीत स्वतःला विलीन करणाऱ्या बुधा या नायकाची भूमिका ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांनी साकारली असून स्मिता गोंदकर, भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी आणि बालकलाकार कृष्णादत्त आदी सहकलाकारांच्या भूमिका आहेत. पटकथा-संवाद प्रताप गंगावणे यांचे असून छायालेखन अनिकेत खंडागळे यांचे आहे. संगीत धनंजय धुमाळ यांचे असून पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. राजमाची परिसरामध्ये साधं चालणंसुद्धा शक्य नाही. इतकी ती वेडीवाकडी वाट आहे. अशा ठिकाणी अख्ख्या सिनेमाचा क्रू नेणं म्हणजे खूप अवघड गोष्ट होती. सुहास पळशीकरांबरोबरच मी इतर कलाकारांनाही व्हॅनिटी मिळणार नाही असं सांगितलं. परंतु, सर्व कलाकारांनी ही गोष्ट नुसतीच मान्य केली नाही तर वेळप्रसंगी ते पत्र्याची खोलीत, तंबूतही राहिले. भीती एकाच गोष्टीची वाटायची की मध्यरात्री सुसाट वारा सुटायचा.

रात्री २-३ वाजेपर्यंत वाऱ्याच्या घोंघाटामुळे झोप लागायची नाही. सकाळी सातची शूटिंगची शिफ्ट असायची. अशा विपरीत परिस्थितीमध्येही सर्व कलावंतांनी आम्हाला सहकार्य केलं. मी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बरेच सिनेमे पाहिले आहेत. सिनेमामधील तोचतोचपणाला आताचा प्रेक्षकवर्ग कंटाळलाय. म्हणून मी हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा बनेल, अशापद्धतीनं केला. गोनिदांच्या शब्दांशी प्रामाणिक राहून आम्ही काम केलंय. त्यामुळे प्रेक्षक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे. माणसाचं खरं सुख कशात असतं, हे दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून आम्ही केला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्याच्याकडे १०० रुपये आहेत तो एक हजार रुपये मिळवण्यासाठी पळतोय. ज्याच्याकडे १ लाख आहेत, तो करोडो कमावण्यासाठी धडपडतोय. पण हे सगळं करताना तुम्हांला फक्त कृत्रिम सुख मिळेल. वेगवेगळे रोग मिळतील. १९५८ साली ही कादंबरी लिहिली होती. सर्व

समाजवर्गांचा अभ्यास करून त्यांनी ही कादंबरी लिहिली होती. बुधा हा कर्ज काढून राजमाचीवर राहतो. त्याचं नातं पानं-फुलं-झाडांशी होतं. इथंच तो संपतो. बुधाच्या जीवनात स्त्री आली नाही म्हणून तसा तो वागतो का, असा प्रश्न काहींनी मला विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात मिळतं. बुधाच्या जीवनात कुठेही स्त्री आलेली नाही. म्हणून तो तिथं टिकला असं म्हणता येणार नाही. या चित्रपटाद्वारे आम्ही त्याच्या जीवनात फुला नावाची स्त्री आणली. या व्यक्तिरेखेमुळे बुधाच्या व्यक्तिरेखेची उंची उलट वाढली.

‘माचीवरला बुधा’ मध्ये बुधा या नायकाबरोबर निसर्ग आणि वन्यजीव-पशुपक्षीही एक पात्र म्हणून समोर येतात. त्यात ‘टिप्या’ या बुधाच्या लाडक्या श्वानाच्या भुमिकेतील कलाकाराने अप्रतिम अभिनय केला आहे. या सिनेमात विविध पक्ष्यांचा आवाज असणारे एक अप्रतिम गाणे आहे. सिनेमांत नायक-नायिका गातात; मात्र या कलाकृतीत पक्षांनी गायलेले गाणे अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यासाठी दिग्दर्शक मी १९ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान निसर्गनिर्मित अनेक कठीण आव्हाने पेलत २२ दिवसात चित्रीकरण पूर्ण झाले परंतु त्याचे नियोजन करताना मला अडीच वर्षे लागली. ७२ पक्ष्यांना घेऊन मला एक गाणं करायचं होतं. कुत्रे, खारूताई, म्हशीचा यात अभिनय आहे. हे सगळे प्राणी मी या चित्रपटात आणले नसते तर गोनिदांच्या कादंबरीला मी न्याय देऊ शकलो नसतो. सुरुवातीला प्राण्यांचे आवाज अॅनिमेशनद्वारे आणायचा विचार केला. परंतु, तो खूपच खर्चिक प्रकार होता. पक्षी, मुंग्या ओरिजनल. खारूताईला दाणे दाणे टाकून टाकून आम्ही तिच्याशी सूर जुळवले. चित्रपटात प्राणी वापरायचे असतील तर आधी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. त्यांना चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांची संख्या पाठवावी लागते. प्राणी डॉक्टर बरोबर ठेवावा लागतो. त्याप्रमाणे मावळातला एक डॉक्टर ठेवला. तो सतत आमच्यासोबत होता. त्यानं आपला अहवाल चेन्नईला पाठवला आणि आम्हांला मग सेन्सॉरकडून कसल्याच अडचणी आल्या नाहीत.
दिल्लीच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला परिक्षकांच्या विशेष पसंतीचा पहिला पुरस्कार मिळाला आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारांमध्ये या चित्रपटासाठी अनिल गांधी यांना सर्वात्कृष्ट संकलन तसेच विजय गवंडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात अभिनेते सुहास पळशीकर यांना सर्वात्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले.
– विजयदत्त
——–

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

नारायण केशव


सुधीर फडके, पु . ल. देशपांडे आणि ग. दि. माडगुळकर यांच्या जीवनावरील आपण सादर केलेले AV व्हिडीओ खूप सुंदर होते. सुधीर नांदगावकरजींनी ती माहिती व्हिडीओ रूपात सादर केली या बद्दल त्यांचे आभार.
संदर्भ:- प्रतिक्रिया