अतिथी कट्टा

दिनांक : २६-१०-२०१७

‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख


रीतेश देशमुख निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट येत्या शुक्रवारपासून प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचे निर्माते रीतेश देशमुख यांचं हे मनोगत.
———-

‘फास्टर फेणे’ हा माझ्या हृदयाच्या जवळचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याचा ‘क्लासमेटस’ हा चित्रपट मी पाहिला होता. तो मला आवडलाही होता. त्यामुळे मी आदित्य यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एखादी चांगली गोष्ट असेल तर ती ऐकवण्यासही सांगितलं. त्यावेळी आदित्य यांनी मराठी साहित्यात अत्यंत मानाचं स्थान असलेल्या ‘फास्टर फेणे’ या व्यक्तिरेखेला रुपेरी पडद्यावर आणण्याची इच्छा व्यक्त केली. आदित्यच्या या इच्छेला मी लगेचच होकार दिला. त्यामागचं कारण म्हणजे एक निर्माता या नात्यानं अशाप्रकारच्या संधी क्चचितच आमच्यासमोर येतात. एखाद्या पुस्तकातलं पात्र मोठ्या पडद्यावर येणं ही दुर्मीळ गोष्टच मानायला हवी. त्यामुळी ही दुर्मीळ गोष्ट साध्य करायला मिळाली हे मी माझं सौभाग्य मानतो. या चित्रपटातील सर्व कास्ट अॅंड क्रूचे आभार. सर्वप्रथम त्यांनी ‘मुंबई फिल्म कंपनी’बरोबर काम करण्यासाठी होकार दिला आणि नंतर चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत जीव तोडून आपलं सहकार्य दिलं. सर्वाधिक आभार मी ‘झी स्टुडिओज’चे मानेन. कारण त्यांच्या पाठबळाशिवाय या ताकदीचा चित्रपट आम्हाला करता आला नसता.

या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मला या चित्रपटात एकही गाणं नाही, याची कल्पना आली होती. परंतु, वैयक्तिकदृष्ट्या त्यात एखादं तरी गाणं असायला हवं असं मला वाटत होतं. एखाद्या चित्रपटाची गाणं ही गरज असू शकत नाही, याची मला कल्पना आहे. मात्र चित्रपटाची चांगली प्रसिद्धी करण्यासाठी गीत-संगीताचा खूप मोठा वाटा आहे, हेदेखील विसरून चालणार नाही. प्रेक्षकांसमोर तुम्ही काय थीम घेऊन जाणार आहात, हे हल्लीच्या काळात खूप महत्त्वाचं झालं आहे. बरेच जण चित्रपट पूर्ण करतात. मात्र त्याची प्रसिद्धी कशी करायची, हेच त्यांना ठाऊक नसतं. ही चूक खुद्द माझ्याकडूनच यापूर्वी झाली होती. ती यावेळी मला करायची नव्हती. फार प्रयत्न करूनही आम्ही या चित्रपटात गाणं घेऊ शकत नाही, असं ज्यावेळी मला आदित्य म्हणाले त्यावेळी मग केवळ ‌‘प्रमोशनल सॉंग’ करायचं ठरलं.

हे गाणं फास्टर फेणेला ट्रिब्युट आहे. हा ट्रिब्युट केवळ आमच्या टीमचा नसून फास्टर फेणेच्या सर्व चाहत्यांचा आहे. या गाण्याला संगीत आर्कोनं दिलं असून मी ते गायलं आहे. मराठी चित्रपटासाठी मी गायलेलं हे पहिलंच गाणं आहे. आर्को स्वत: बंगाली आहे. हिंदीसाठी तो संगीत देतो. मात्र बंगालीमध्ये गाणं करण्याआधी त्यांनी मराठी चित्रपटासाठी गाणं केलं हे विशेष. हे गाणं लिहिलंय ते प्रशांत यांनी. माझे मित्र सीझर यांचीही या गाण्यासाठी खूप मोठी मदत झाली. एकीकडे आमच्याकडे वेळ कमी होता आणि मराठीमधील निर्मितीमुळे इतरही काही मर्यादा होत्या. सीझर यांनी मैत्रीचा मान राखून त्यांनी हे गाणं केलं. खरं तर सीझर यांच्या एखाद्या असिस्टंटकडून हे गाणं करून घ्यावं असं मला वाटत होतं. त्याप्रमाणे मी सीझरना फोनही केला. तेव्हा सीझरनी आपण स्वत:च हे गाणं करीत असल्याचं सांगून मला धक्का दिला. थोडक्यात खूप मेहनत घेऊन आम्ही सर्वांनी हा चित्रपट पूर्ण केलाय. तो प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.

– रीतेश देशमुख
ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

विनय तिर्लोटकर


आमल्या वेबसाईट मुळे बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते आहे. त्यासाठी प्रथम तुमचे आभार. एक अभ्यासू दृष्ट्या वेबसाईटचा फार छान आणि सुंदर वापर होतो आहे.
संदर्भ:- प्रतिक्रिया