अतिथी कट्टा

दिनांक : ११-१०-२०१७

प्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…


नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द सायलेन्स’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि चित्रपटामधील इतर कलाकारांचं हे मनोगत…

गजेंद्र अहिरे:-या कथानकातून मला जे ऐकायला आलं, तेच मी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. साध्या, सोप्या पद्धतीनं हा चित्रपट केला असला तरी त्यातला आशय अगदी थेटपणे प्रेक्षकाला भिडणारा आहे. ‘हा खूप चॅलेंजिंग विषय आहे, त्यामुळे मी असं असं करून दाखवतो,’ अशी ‘पोज’ एक दिग्दर्शक म्हणून मी नक्कीच घेणार नाही. सहजता, सोपेपणा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. माझ्या चित्रपटातील कलावंत हे नेहमीच त्या त्या भूमिकांशी सुसंगत असतात. त्यामुळेच नागराज मंजुळे, अंजली पाटील आणि रघुवीर यादव अशी वेगळी ‘स्टारकास्ट’ तुम्हाला या चित्रपटामधून पाहायला मिळेल. या तिघांनीही आपापल्या भूमिकांना खूप छान न्याय दिला आहे. मात्र या चित्रपटात लहान मुलीची भूमिका साकारणार्‍या वेदश्री महाजनचा मी विशेष उल्लेख करीन. तिची अभिनयातील समज थक्क करणारी आहे.

अंजली पाटील:-प्रत्येक कलाकृतीच ही माझ्यासाठी वेगळा आणि लक्षात राहणारा अनुभव ठरली आहे. अभिनयाचं ‘स्कील’ माझ्याकडे आहे. परंतु, त्यामुळे माझ्याकडे चांगलं काम करण्याची जबाबदारीही येते. या ‘स्कील्स’चा मला उपयोग करता आला पाहिजे असं मला सतत वाटत असतं.

‘द सायलेन्स’ ही माझ्यासाठी एक खूप मोठी संधी होती. चित्रपट हे एक असं माध्यम आहे की जे खूप चांगल्या पातळीवर नागरिकांना प्रेरणादायी ठरतं. ‘द सायलेन्स’ या चित्रपटानं तेच काम केलं आहे. गजेंद्रसरांबरोबर केलेली माझी ही पहिली फिल्म आहे. नागराज मंजुळे यांच्यासोबतही काम करण्याची माझी खूप इच्छा होती. एक चांगली स्कीप्ट आणि माझ्या चांगल्या व्यक्तिरेखेमुळे मी हा चित्रपट स्वीकारला होता. एक अंजली म्हणून मला या चित्रपटातं स्वतःचं काही ‘ऍड’ करण्याची संधी मिळाली. थोडक्यात या चित्रपटामधील सर्व गोष्टी अगदी जुळून आल्या.

कादंबरी कदम:-चित्रपटाचं शीर्षक ‘सायलेन्स’ असलं तरी हा चित्रपट जेव्हा प्रेक्षक पाहतील तेव्हा ते ‘सायलेन्स’ न राहणंच पसंत करतील. आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं असतात. बर्‍याचदा आपण असं गृहित धरतो की सगळी मुलं सुरक्षित आहेत. परंतु, प्रत्यक्षात ती सुरक्षित नसतात. वेगवेगळ्या वेळी, काळी मुलांच्या बाबतीमधील ही सुरक्षितता आपल्याला अनुभवायला आली आहे. अशा संवेदनशील विषयावर प्रकाशझोत या चित्रपटामधून टाकण्यात आला आहे. घरात आई नसते, तेव्हा बाप हा असहाय्य असतो. या बापाची अप्रतिम व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते रघुवीर यादव यांनी साकारली आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या वळणांवर सामोरे जावे लागणारे प्रश्‍न या चित्रपटात मांडण्यात आले आहेत.

रघुवीर यादव:-हा चित्रपटाचा अनुभव मी ‘कमालीचा’ होता, असं मी अजिबातच म्हणणार नाही. कारण या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर जवळजवळ माझे २०-२५ दिवस अत्यंत वाईट गेले होते. या चित्रपटामधील व्यक्तिरेखेमध्ये मी अक्षरशः बुडून गेलो होतो. आपल्या मुलांना सांभाळण्यात कमी पडलेल्या वडिलांची व्यक्तिरेखा मी या चित्रपटात साकारली आहे. ही व्यक्तिरेखा अशी आहे की, जिला आपल्या आजूबाजूची, समाजातील सगळीच माणसं, नातेवाईकही चांगली वाटत असतात. गजेंद्र अहिरे यांची एक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची पद्धत मला खूप आवडली. ते कलाकारांकडून खूप चांगलं काम काढून घेतात.

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  केतन पेंडसे

  खुप मस्त वटले ही साइट पाहून, मराठी चित्रपट, निर्माते, अभिनेता, दिग्दर्शक अश्या सर्वांसाठी उत्तम अशी कलाकृती.

  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया