अतिथी कट्टा

दिनांक : ०७-०९-२०१७

नव्या जोडीचं पदार्पण…अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन आजवर अनेक चित्रपटांतून करण्यात आलं आहे. येत्या १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार्‍या ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातून विठू माऊलीचं त्यांच्या भक्तांशी असलेलं अतूट नातं पाहायला मिळणार आहे. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रॉडक्शन एल.एल.पी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे. हिंदी चित्रपटांमधील नवीन नायक-नायिकेच्या जोडीचं प्रेक्षकांना विशेष आकर्षण असतं. परंतु, हल्ली मराठी चित्रपटांमध्येही खूप वेगवेगळे विषय हाताळले जात असून नवनवीन कलावंत आपल्या पदार्पणाद्वारे प्रेक्षकांवर छाप उमटवीत आहेत. या चित्रपटाद्वारे विजय आणि कृतिका ही जोडी रसिकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
——-

चांगल्या कथेच्या कॅनव्हासवर चित्रपटातील गीतांनी सुरेख रंग भरले आहेत. मंगेश कागणे व क्षितीज पटवर्धन या लोकप्रिय गीतकारांच्या शब्दांनी यातील चारही गीते सजली असून चिनार-महेश या युवा संगीतकार जोडीचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. पंढरीच्या विठ्ठलाची महती सांगणारे, गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील ‘ठाई ठाई माझी विठाई’ तसेच आदर्श शिंदे यांनी गायलेलं ‘देव कोंडला’ हे भक्तीगीत प्रेक्षकांना समाधानाची अनुभूती देईल.

स्वप्नील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या आवाजातील ‘बोले तुना तुना’ हे प्रेमगीत व ‘झक्कास छोकरा’ हे प्रवीण कुँवर यांनी स्वरबद्ध केलेलं धमालगीत नक्कीच ठेका धरायला लावणार आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक कंपनीने ’विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.

मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, केतन पवार, विजय निकम, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसह विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही नायक-नायिकेची नवी जोडी या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहेत. या दोघांनी या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अत्यंत सुखद असल्याचं सांगितलं. या चित्रपटामधील नायकासाठी बराच शोध सुरू होता. कोणतंच नाव पसंत पडत नव्हतं आणि अचानक दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या विजयचं नाव सुचलं. आपल्या भूमिकेबद्दल विजय म्हणतो, “माझा हा पहिलाच चित्रपट. तसा अभिनयाशी माझा काहीच संबंध नाही. मात्र दिग्दर्शकानं संधी आणि प्रोत्साहन दिल्यामुळेच मी हे सगळं करू शकलो. या चित्रपटामधील सर्व कलावंत मान्यवर आहेत. त्यांच्या अनुभवाचाही मला खूप फायदा घेतला. त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं.” नेमकी हीच भावना अभिनेत्री कृतिकानंही व्यक्त केली. या चित्रपटात विजयबरोबर आपलं ट्यूनिंग विशेष जुळल्याचा उल्लेख केला. चित्रपटामध्ये आमच्या दोघांमधील विसंवाद पाहायला मिळतो. प्रत्यक्ष चित्रीकरणावेळीही आम्ही भरपूर भांडल्याचं तिनं सांगितलं. या चित्रपटामधील गाणी खूप छान जमली आहेत. यापूर्वी हिंदी तसेच मराठी चित्रपटांमधील असंख्य गाणी आपण चित्रपटगृहात पाहिली. मात्र प्रत्यक्ष आपल्यावरच एखादं गाणं चित्रीत होतंय, हे पाहताना त्यावर विश्वासच बसत नव्हता असंही कृतिका म्हणाली.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

मच्छिंद्र माळी पडेगांव,औरंगाबाद


नटश्रेष्ठ राजा गोसावी यांचे जीवन चरित्र फारच सुंदर आहे. धन्यवाद!!
संदर्भ:- प्रतिक्रिया