अतिथी कट्टा

दिनांक : ६-११-२०१७

कथा-पटकथा आणि संवाद


प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा ६ नोव्हेंबर हा जन्मदिन. श्री. पाटील यांचे अनेक चित्रपट गाजले ते त्यांच्या लेखनासाठी. म्हणूनच ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ प्रकाशित ‘रुपेरी पडदा : तंत्र आणि मंत्र’ या पुस्तकात त्यांनी ‘कथा- पटकथा-संवाद’ याच्या महत्त्वावर लिहिलेले प्रकरण आम्ही पुनःप्रकाशित करीत आहोत.
———-

भांडवलाची व्यवस्था झाली, की नंतर निर्माता दिग्दर्शकाची निवड करतो, आणि आपल्या निवडक तंत्रकारांचा आणि कलाकारांचा संच त्याच्या हवाली करतो. या संदर्भात मी नेहमी चित्रपट-निर्मितीला क्रिकेटच्या खेळाची उपमा देत आलो आहे. त्यात क्रिकेटबोर्डाची भूमिका निर्माता स्वत: वठवतो, तर कॅप्टनची भूमिका दिग्दर्शकाला वठवावी लागते.
क्रिकेटच्या खेळात नुसता कॅप्टन चांगला असून भागत नाही, त्याच्या बरोबरचे फलंदाज आणि गोलंदाजही चांगले असावे लागतात. नव्हे, त्या सर्वांचे क्षेत्ररक्षणही चांगले व्हावे लागते. समजा, कुशल गोलंदाजाने एखाद्या फलंदाजाचा महत्प्रयासाने झेल उडवला आणि जवळच्या क्षेत्ररक्षकाने तो सोडला तर! क्रिकेटच्या टीममध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू खेळतात. जेवढे झेल सुटतील तेवढे जास्त खेळाडू असे होते, आणि प्रसंगी हातचा सामना गमवायची पाळी येते.
चित्रपटाच्या खेळातही असेच आहे. त्यातही प्रत्येकाचा खेळ चांगला व्हावा लागतो. लेखकाने चांगले लिहावे लागते. नटनटींनी ते आपल्या अभिनयाने चांगले वठवावे लागते.
या खेळीत पहिला खेळाडू म्हणून येतो तो लेखक! प्रथम लेखक कथा लिहितो, किंवा अनेकदा आपण पाहातो- एखाद्या प्रसिद्ध कथेची, कादंबरीची किंवा नाटकाची कथाही निर्माता पसंत करतो, आणि त्यावर मग पटकथेचा साज चढवला जातो आणि शेवटी संवाद लिहिले जातात. काही केले तरी, मुळात कथा ही लागतेच. किंबहुना चांगली कथा ही चित्रपटाची पहिला गरज आहे. पटकथेच्या साजाची त्या नंतरची. यावर कोणी विचारील की पटकथेचा साज म्हणजे काय?
त्याचे उत्तर असे-जसे कथेचे तंत्र वेगळे आहे, कादंबरीचे तंत्र वेगळे आहे, आणि नाटकाचे त्याहूनही वेगळे आहे, तद्वत चित्रपटकथेचे एक आगळे तंत्र आहे, त्या तंत्रानुसार कथेची आधी पटकथा तयार करावी लागते आणि नंतर संवाद भरून झाले, की मग चित्रपटाचे चित्रण सुरू होते.
अर्थात ही कथा कशी असावी याला काही विषयांचे बंधन नाही. ती पौराणिक असू शकेल, कल्पनारम्य अशू शकेल किंवा ऐतिहासिक व सामाजिकही असू शकेल. अरे वा, मी सहज हे प्रकार बोललो, खरे. चित्रपटाच्या प्रवासाची दिशाच तुम्हांला सांगितली की! आपल्याला ठाऊक आहे, मराठीत पहिली कथा पडद्यावर आली, ती राजा हरिश्‍चंद्राची, म्हणजे
पौराणिक ‘अयोध्येचा राजा’ या नावाने, पाठोपाठ आली ती ‘अग्निकंकण आणि ‘सिंहगड’ म्हणजे कल्पनारम्य आणि ऐतिहासिक! याचा अर्थ सुरुवातीला आपल्या चित्रकथेचे नायक होते देव आणि खलनायक होते दानव. या कथा प्रथम एवढ्यासाठी निवडल्या गेल्या, की तेव्हा चित्रपट माध्यमाची ओळख प्रेक्षकांना नवीन होती, त्याच्या तंत्रमंत्राचाही विकास परिपूर्ण झाला नव्हता. अशा वेळी सर्वसामान्य प्रेक्षकांना समजायला सोपी म्हणून पौराणिक कथा प्रथम पडद्यावर आली असावी. अशा कथा कथाकीर्तनांतून सर्वांच्या पूर्वपरिचयाच्याच असतात, नाही का?
त्यानंतर आल्या त्या कल्पनारम्य कथा. कारण त्यांचे पौराणिक कथांशी जवळचे नाते असते. लोकप्रिय राजा, त्याची लाडकी राणी, आणि कारस्थानी प्रधान अशा ढोबळ व्यक्तिरेखांनीच ती सांगितली जाते. लोकांना त्या समजतात आणि पटतातही लवकर. शाश्‍वत अशा मानवी स्थायी भाव-भावनांवरच त्या अधिष्ठित असतात. त्या समजून घ्यायला बुद्धीला फारसा ताण द्यावा लागत नाही. असा प्रवास करता करताच ऐतिहासिक कथेचे वळण घेऊन आजची कथा धीरोदात्त नायक, त्याची प्रेयसी आणि उभयतांच्या मीलनाच्या आड येणारा खलनायक असे त्रिकोणी स्वरूप तिला प्राप्त झाले. ऐतिहासिक कथेत त्यांच्या जागा जित आणि जेते यांनी पटकावल्या. सामाजिक चित्रात सामान्य माणूस लढणार कोणाशी? तो बिचारा आपल्या परिस्थितीशीच झगडतो आहे झालं !
आपल्याकडेच हे झालं असं नाही. परदेशातही हेच घडत आलं आहे. पूर्वीची पाश्‍चिमात्य चित्रे बायबलवर आधारित असत. आताशा ती सर्वत्र सामाजिक झाली आहेत. याचा अर्थ असा नव्हे, की इतिहास पुराणे आता कालबाह्य झाली आहेत. छे,छे, मी तर म्हणेन, चित्रकथेला वर्ज्य असा एकही विषय नाही. विषय कोणताही असो, तो कथारुपाने मांडण्याचे कसब कथाकाराला असले पाहिजे. चित्रकथेत काय सांगायचे यापेक्षा कसे सांगायचे, हे मी महत्त्वाचे मानतो.
हे कसब म्हणजे काय, याच्या तात्विक चर्चेत मी जात नाही. चर्चा तात्विक झाली, की त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. एवढेच सांगण्याचा प्रयत्न करतो, मी चित्रकथा कशी लिहितो, (विषय डोक्यात घोळत असतोच). तो मांडण्यासाठी काय करावे? त्याकरता प्रमुख व्यक्तिरेखा कोणकोणत्या होतील? नायक-नायिका, खलनायक हे तर हवेतच. त्याशिवाय कोणत्याही कथेचा प्राण जो संगर तो निर्माण करण्याकरता काय करावे? हा संगर सत्तेकरता असेल, संपत्तीकरता असेल किंवा स्त्रीकरता असेल. त्या संगरात सत्याचा, सद्गुणांचा आणि शौर्याचा विजय दाखविणे, हा नाट्यसंकेत आहे. वास्तव जीवनात नेहमीच सत्याचा विजय होताना दिसतोच असं नाही. पण असे संकेतबाह्य विजय हे तात्कालिक मानायचे असतात. रणभूमीवर वीराने काही लढाया हरल्या तरी चालते, पण अंतिम युद्ध हे त्याला जिंकावेच लागते. निदान तसे दाखवावे तरी लागतेच. त्याशिवाय ‘सत्यमेव जयते’ हे तत्त्व लोकांना पटणार कसे? पटकथेतही हाच नियम लागू आहे. ग्रंथगत साहित्याप्रमाणे चित्रकथेचीही ही पहिली गरज आहे.
आता या संगराचा प्रेक्षकांच्या मनावर फारसा ताण पडू नये, म्हणून विरंगुळ्यासाठी एखादे विनोदी पात्रही मध्ये लुडबुडते. अर्थात तेवढ्या मोजक्या चारपाच पात्रांवर चित्रकथा उभी राहातेच असे नाही. चित्रकथेला हातभार लावण्यासाठी इतरही अनेक लहानमोठ्या पात्रांची मदत प्रसंगानुसार घ्यावी लागते. मात्र ती सगळी पात्रे सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळवण्याची गरज नाही. तसे झाले तर एक ना धड, भाराभर असे होईल. ते टाळण्यासाठी जरूर तेवढ्या पात्रांची, जरूर तेवढीच, मदत घेणे उत्तम!
हे ठरवण्यासाठी मी एक युक्ती योजतो. आपली कथा त्यातील प्रत्येक प्रमुख पात्रांच्या दृष्टीकोनातून कशी घडेल, याचा मी आढावा घेतो. प्रत्यक्षात लेखक त्रयस्थाच्या भूमिकेतून सर्व कथा सांगतो. त्याऐवजी मी असा विचार करतो. प्रत्यक्ष नायकानेच ती सांगितली तर कशी सांगेल? त्याच प्रमाणे नायिकेने तीच कथा आपल्या दृष्टिकोनातून ऐकवली तर कशी होईल? किंवा खलनायकाने तीच कथा आपली कैफियत म्हणून मांडली तर कशी वळणे घेईल? अशा अनेकविध दृष्टिकोनातून विचार केल्याने कथेच्या सर्वांगीण बाजू डोळ्यांसमोर येतात आणि कथेला एका डौलदार वृक्षाचा आकार प्राप्त होतो.
तो आकार डोळ्यांसमोर आला, की मग मी तो अधिक स्पष्ट करण्यासाठी विविध प्रसंग शोधायला लागतो. कारण चित्रकथा ही शब्दांपेक्षा प्रसंगांनीच खुलवावी लागते. त्या प्रयत्नात कथेचे सर्व प्रसंग एकदम सुचतातच असे नाही. आपण लिहित जातो तसे ते सुचत जातात आणि त्यातून चित्रकथा हळूहळू आकार घेत जाते. त्याकरता मी प्रथम आखतो, ती चित्राची रूपरेखा. म्हणजे चित्रपटातील संभाव्य प्रसंगाची एकेका ओळीतील टाचणेच म्हणाना !
चित्रकार जसा प्रथम आपल्या चित्राची बाह्यकृती आखून घेतो आणि नंतर त्यात कुंचल्यांनी रंग भरून चित्र रंगवतो अगदी तसेच! मला वाटते. कोणत्याही कलेचा हा मूलमंत्र आहे. घर बांधतानाही अगोदर त्याचा ‘ग्राउंड प्लॅन’ तयार करावा लागतो. या तंत्रानेच नाही का नाटकारही आपले नाटक लिहित जातो? अनेकदा आपण पाहतो, नाटकाकार शेवटचा अंक आधी लिहितो किंवा सुरुवातीचा अंक मध्येच केव्हातरी लिहितो. हे नाटकाचा आराखडा तयार केल्याशिवाय कसे शक्य आहे?
आता नाटकात काय होते? नाटकाचे जास्तीत जास्त अंक असतात पाच! आणि प्रत्येक अंकात प्रवेश असतात तेही पाचच. यावर कोणी म्हणेल,
‘बस्स, पाचच? म्हणजे गुणिले पाच बरोबर पंचवीस प्रसंगात नाटक तयार होते की काय?’
नाटकाचे प्रवेश पाचपंचवीस असले तरी प्रत्येक प्रवेशात प्रसंगांची रेलचेल असते. आजची नाटकं पाचावरून तीन अंकांवर आली आहेत. काही एकांकिकाही झाल्या आहेत. म्हणून त्यातील प्रसंगांची रेलचेल कमी झालेली नाही. होणार नाही. एक होते, नाटकात सर्व प्रसंग शब्दांनी सांगावे लागतात. तर चित्रपटात ते प्रत्यक्ष घडताना दिसतात. दाखवावे लागतात. काही गोष्टी रंगभूमीवर आपण प्रत्यक्षात घडताना दाखवू शकत नाही. तेच प्रसंग चित्रपटात प्रत्यक्ष घडताना दाखवता येतात, म्हणून तर ते जास्त प्रभावी आणि प्रत्ययकारी वाटतात. चित्रपटांना रंगमंचाच्या लांबीरूंदीच्या मर्यादा नसल्याने आपण आपला कॅमेरा कुणेही नेऊ शकतो. आकाशात विमान उडताना दाखवू शकतो, किंवा काचेच्या हौदात एखादी रूपगर्विता पोहतानाही दाखवू शकतो. चित्रपट अधिक संपन्न वाटू लागतात, ते या प्रसंगाच्या रेलचेलमुळे आणि विविधतेमुळेच! प्रेक्षकांनाही वाटते, ‘खरंच, आपण पडद्यावर आज बरंच काही तरी पाहिलं हं!’

हे वाटण्यासाठी चित्रकथेत लहानमोठे असे निदान सत्तर-ऐेंशी तरी प्रसंग असावे लागतात. तुम्ही म्हणाल, ‘ठीक आहे. सत्तरऐंशी प्रसंग झाले तर भागतं ना?’ याला माझे उत्तर आहे, हो पण हे प्रसंग मांडण्यातही अनेक खुब्या आहेत.’
माफ करा. तुम्ही वैतागाने म्हणाल, ‘तुमची ही खुब्यांची यादी आगगाडीसारखी लांबतच चालली.’’
वा! वा! तुम्ही छानच उपमा दिलीत. तीच पूर्ण करून मी तुमच्या प्रश्‍नांचं उत्तर देतो. आगगाडीत जसे एंजिन म्हणजे गाडी खेचण्याची ताकद लागते, त्यापाठोपाठ निरनिराळ्या वर्गाचे डबे आणि मग शेवटी गार्डचा डबा- म्हणजे गाडी कंट्रोल करणारा असतो. त्याप्रमाणे चित्र सुरू करताना कथालेखकाला अनेक अवधाने सांभाळावी लागतात. एंजिन जसे गाडी खेचू शकते तसे चित्राच्या सुरुवातीनेच प्रेक्षकाला खेचले पाहिजे. चित्राची सुरुवात पाहूनच प्रेक्षकाला वाटले पाहिजे, ‘अरे वा, गंमत आहे हं. बघू या तरी पुढे काय घडतंय ते!’’
असे वाटण्यासाठी सुरुवातीला एखादा भडक प्रसंगच घातला पाहिजे असं नाही. मात्र एक गोष्ट साधली पाहिजे, ती म्हणजे प्रेक्षकास कथाप्रवाहात घेऊन जाण्याची. उदा. समजा, चित्रपट सुरू होताच पोलिस ठाण्यावर एखादा घरगडी धावत आला आणि त्याने वर्दी दिली, की ‘साहेब, पैशासाठी आमच्या मालकांचा कुणीतरी खून केलाय.’
फौजदार दचकून विचारील, ‘खून? चल-चल बघू या.’
म्हणून फौजदार चार-दोन शिपायांसह घरी आले आणि त्यांनी सर्व वस्तुस्थिती पाहून सिद्ध केले, की घरमालकाचा खून इतर कोणी केला नसून, तक्रार नोंदवणार्‍या नोकरानेच केलेला आहे, तर तुम्ही त्या फौजदाराच्या चातुर्याची तारीफ कराल की नाही? बघा आता या कथेवरच किती छान पटकथा लिहिता येईल. या पद्धतीला ‘फ्लॅश बॅक’ पद्धत म्हणतात. म्हणजे धक्कादायक प्रसंगाने चित्रपटाच्या सुरवातीलाच प्रेक्षकांचे कुतुहूल जागृत करायचे आणि नंतर चित्रभर तो प्रसंग कसा घडला, का घडला, केव्हा घडला हे सांगून टाकायचे. अर्थात हीच एक चित्रकथेची चांगली सुरुवात असे नाही, ज्याने त्याने आपापल्या खुब्यांचा लकबींचा वापर करून प्रेक्षकांना कथाप्रवाहात नेण्याचे विविध मार्ग शोधले पाहिजेत.
कथा लिहिताना लेखकाने कुतूहलजनक सुरुवातीबरोबरच चित्रकथानकाचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले पाहिजेत. एक वर सांगितला तो सुरुवातीचा टप्पा. दुसरा मध्यंतरीचा आणि तिसरा टप्पा क्लायमॅक्सचा. त्यानंतरचा अण्टीक्लायमॅक्स आणि कथेची निरवानिरव, काहीशी घाईची म्हणून थोडक्यात केली तरी चालते. पूर्वीप्रमाणे आजकाल चित्रातील प्रत्येक प्रमुख पात्राचे शेवटी काय झाले हे सांगत बसण्याची आवश्यकता नाही. नायक नायिकेच्या डोक्यावर अक्षता पडल्या की भटजींची दक्षिणाही मिळाली असणार हे दाखवायला नको. ते समजण्याइतके आजचे प्रेक्षक शहाणे झाले आहेत.
या तीन टप्प्यांतही ‘मध्यंतर’ मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. ‘मध्यंतर’ ही टायटल दिसताच प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर एक भले मोठे प्रश्‍नचिन्ह गरगरा फ़िरले पाहिजे, ‘अरे बापरे, हे काय भलतंच झालं? नायिका खलनायकाच्या तावडीत पुरेपूर सावडली की! आता हिची सुटका होणार कशी? सुटका करणार कोण? आणि तोपर्यंत तिचे पावित्र्य शाबूत रहाणार कसे?
या प्रश्‍नांची उत्तरे शोधीत प्रेक्षक पुन: आपल्या आसनावर येऊन बसेल तेव्हा त्याला पडलेली कडी आपण अशा तर्‍हेने सोडवत गेले पाहिजे. की तो गुंता सुटल्यावर सुद्धा प्रेक्षकाने हर्षभराने म्हटले पाहिजे, ‘असं होय! हे माझ्या लक्षात कसं आलं नाही?’
प्रेक्षकांना असा पदोपदी चकवा देत जाणं, हे चित्रकथा लेखकाचं फार मोठं यश आहे. हे मी कथारचनेचा तांत्रिक सिद्धांत म्हणून सांगत नाही. या पद्धतीने एकच कथा अनेक प्रकारांनी सांगता येईल. ती कशीही सांगा, आकर्षक आरंभ, उत्कंठापूर्ण मध्यंतर आणि संस्मरणीय शेवट या तीन जागा कटाक्षाने सांभाळल्या पाहिजेत. तरच चित्रकथेला आवश्यक असा आकार प्राप्त होतो. तो नसेल तर कथा प्रवाही आणि प्रभावी वाटणार नाही. यासाठी एक सोपा उपायही तुम्हांला सांगून ठेवतो. प्रेक्षागारात आहे तोपर्यंत त्याला इतके गुंतवून ठेवा, की चित्रपट संपला केव्हा हे त्याला कळताच कामा नये. भले चित्रपट संपल्यावर घरी जाता जाता तो म्हणू दे- ‘काय चकवलंय लेखकाने आपल्याला! दिग्दर्शकही त्याचाच साथीदार दिसतोय!’
प्रेक्षकांचे हे उद्गार म्हणजे लेखक-दिग्दर्शकाच्या यशाची पावती होय.
शेवटी मला अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे वळले पाहिजे. कथा कशीही लिहा, पडद्यावर ती विविध पात्रांच्या संवादांनीच उलगडत जाते. म्हणजेच संवाद हे चित्रकथालेखनाचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. माझे संवाद अनेकांना आवडतात. त्यांचा मला एकच सवाल असतो, ‘तुम्ही संवाद कसे लिहिता?’
काय सांगणार मी त्यांना? फौंटनपेनने लिहितो म्हणून? खरं सांगूनही त्यांना खरं वाटणार नाही. मी संवाद कधीच लिहित नाही. मी ते बोलतच जातो. म्हणजे आधी बोलतो, आणि नंतर लिहितो. माझा अनुभव आहे, कथा दमदार असली की संवाद लिहावे लागत नाहीत. ते आपोआप जिभेवर येतात. तेच डोके खाजवायची पाळी आली, की समजावे, कथेचं घोडं कुठेतरी पेंड खातंय. चांगल्या कथेत लेखक संवादाकरता सहसा अडत नाही. तो संवाद बोलतच जातो. त्यामुळे एक तर हे संवाद बोलीभाषेत लिहिले जातात व त्याला गती येते. संवाद बोलीभाषेत असणे ही संवादलेखनाची गुरुकिल्लीच समजतो मी! यावर तुम्ही म्हणाल, ‘असं? मग ते काम अगदी सोपं आहे.’
हो ना? मग लिहून पहाच एकदा! तुमच्या ध्यानी येईल की, लिहिणं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. ते अत्यंत कठीण आहे. ×उत्कटकठीण लिहिणेच सोपं आहे. म्हणून सोपं लिहिण्यासाठी सराव असावा लागतो. त्यात अधूनमधून प्रचलित म्हणींचा किंवा सुभाषितांचा वापर करता आला तर दुधात साखरच! सोप्या भाषेचा मी एवढा आग्रह धरतो. याला कारण एकच. कथा-कादंबरीत एखादे वाक्य नाही समजले तर वाचक क्षणभर थांबू शकतो. पुन:पुन्हा वाचून ते समजून घेऊ शकतो. चित्रपटांच्या बाबतीत हे शक्य होत नाही. चित्र एकसारखे पळतच असते. त्या करता चित्रपटाचे संवाद हे ऐकल्याबरोबर समजले पाहिजेत. एखादे वाक्य जरी प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेलं तरी समजावं, संवादलेखकाचा तो पराभव आहे.
या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे. संवाद सोपे असावेत याचा अर्थ ते सर्व सारखेच असावेत असा नव्हे. चित्रपटातील कोणते पात्र बोलते याचे भान संवादलेखकाने सतत ठेवले पाहिजे. बोलणारा पाटील आहे की रयत आहे, मालकीण आहे की नोकराणी आहे, शिक्षक आहे की तमासगीर आहे, याचा विचार करूनच त्या त्या व्यक्तींना साजेसे संवाद लिहिले पाहिजेत. कारण वरील प्रत्येक संस्कार वेगवेगळे आहेत, शिक्षण वेगळे आहे, साहजिकच त्यांचे संवादही वेगवेगळ्या म्हणजे नागरी वा ग्रामीण पातळीवर असेच असतील नाही का? तरीही माझा आग्रह आहे, संवाद कोणी का बोलेनात, ते प्रेक्षकांस विनासायास पाहिजेत.
चित्र नागरी असो वा ग्रामीण असो, दोन्ही चित्रं मी सामाजिकच समजतो. एवढंच नव्हे तर पौराणिक व ऐतिहासिक चित्रं ही तत्त्वत: सामाजिकच असतात. कारण चित्रपट डोळ्यांसमोर घडताना दिसत असतो. म्हणजे एका अर्थाने त्याचा काळ वर्तमानकाळ असतो नाही का? मग भाषेच्या फरकानेच भेदाभेद कराच कशाला? मला वाटतं, आपण चातुर्वर्णाच्या एवढं आहारी गेलो आहोत की, ते पडद्यावरही दाखवायला आपण तयार नाही. कृत्रिम भेदाभेद प्रत्यक्ष जीवनातून नाहीसे होत असताना पडद्यावर टिकून राहतील कसे? आणि किती दिवस पडद्यावर कोणत्या ना कोणत्या समाजाचे दर्शन घडतच असते ना? ही सर्व सामाजिक असतात ती याच अर्थाने! ते सर्व थरांतील लोकांना समजलं तर पाहिजे. आता चित्रपटांचा प्रेक्षक हा सर्वसामान्य असतो. म्हणून चित्रपटांचे संवाद सोपे म्हणजे अतिसामान्य होऊनही चालणार नाही. त्यामुळे संवाद एकदम सपक होतील. तसं झालं तर चित्राचं ते गालबोट ठरेल. संवादांना, ते कितीही सोपे असले तरी, स्वत:चं असं सौंदर्य हे पाहिजेच- चमकदारपणाचं!
टेनिसचा खेळ तुम्ही पाहिला असेल. त्यात प्रतिस्पर्धी खेळाडून एकमेकांना चकवण्याचा सारखा प्रयत्न करतात. अगदी त्याच प्रद्धतीने पडद्यावरील पात्रंही एकमेकांना खेळवत राहिली की प्रेक्षकांना आनंद होतो. त्याकरताही एक पथ्य मी कसोशीने पाळतो. माझे प्रत्येक पात्र समोरच्या पात्रावर कुरघोडी करण्याच्या दृष्टीने बोलताना मी दाखवतो. साहजिकच समोरचे पात्रही जेव्हा टोल्याला प्रतिटोला देते, तेव्हा संवादाची जणू जुगलबंदी रंगणार्‍या संवादाना खटकेदार असं म्हणतात. संवादाच्या जुगलबंदीचे हे मार्मिक वर्णन नाही का?
वास्तविक जुगलबंदी ही बहुधा संगीतातच असते. संवादांच्या जुगलबंदीचा ध्वन्यर्थ हाच की, संवादसुद्धा संगीतासारखे रंगले पाहिजेत. गायक जसे आपापली गाणी निरनिराळ्या रागांत आणि तालात गाऊन रंगवतात. त्याप्रमाणे संवादही विविध सत्रात आणि तालात रंगवता आले पाहिजेत. विविध लयींचे मनोज्ञ दर्शन प्रेक्षकांना घडले पाहिजे. अगदी खर्जापासून टिपेपर्यंत चढत्या स्वरात म्हणा ना!
लेखकाची शैली म्हणतात ती हीच ! शेवटी एक इशारा देऊन आटोपते घेतो. व्यक्ती तितक्या प्रकृती, या न्यायाने प्रत्येक लेखकाची शैली निरनिराळी असू शकते. नव्हे, त्याशिवाय शैलीला शोभा नाही. हे ओळखून एखादा लेखक कितीही प्रथितयश असला तरी त्याच्या शैलीचे अंधानुकरण इतरांनी करू नये. नक्कल ती नक्कल! अस्सलतेची सर तिला येत नाही. अस्सलपणाला स्वत:चं असे खास सौष्ठव असतं. कोणतीही शैली असल्या सौष्ठवाने चिरंजीव होत असते. ती हस्तगत करण्याकरता एकच केले पाहिजे, गाता गळा, लिहिता हातोळा, म्हणतात ना! हा हातोळा म्हणजेच शैली, त्याकरता सारखे लिहित राहिले पाहिजे. स्फूर्तीची वाट पहात बसाल तर संपलंच! स्फूर्ती हीसुद्धा एक स्त्री आहे; लक्षात घ्या. तिचा अनुनय कराल तर ती फार नखरा करते. तेच तिच्याकडे पाठ फिरवाल तर ती तुमच्या पाठोपाठ येेते. या विश्‍वासाने तुम्ही लिहित चला. आवडले नाही तर ते फाडून टाका, आणि नव्याने लिहा. एके दिवशी तुम्हीच म्हणाल, ‘हे ठीक आहे हं!’
त्याच वेळी तुमच्या ध्यानी येईल , शैली शैली म्हणतात ती हीच! ती प्रत्येकाला असते. कथेला असते. पटकथेला असते. त्याचप्रमाणे संवादालासुद्धा असते.
– दिनकर द. पाटील
(सौजन्य : मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई)

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

मकरंद डोईजड

अभिनेत्री अनुपमा यांच्या फेसबुकवर दिलेल्या माहितीवर आलेली प्रतिक्रिया
:-गेली १ वर्ष या अभिनेत्रीचे पूर्ण नाव शोधत होतो. खूप खुप धन्यवाद.💐
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया