अतिथी कट्टा

दिनांक : १-११-२०१७

कण्टेण्ट इज किंग…


वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते महेश मांजरेकर ‘थॅंक यू विठ्ठला’ या चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत झळकले आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
———-

हल्ली तुम्ही खूप कमी चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसता. हा चित्रपट स्वीकारण्यामागचं कारण काय होतं?

– ‘थॅंक यू विठ्ठला’चा विषय मला अधिक भावला. हल्ली प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. मग तो करोडपती असो की रस्त्यावरचा साधा माणूस. आहे त्या परिस्थितीत आपल्याला कोणालाच सुख दिसत नाही. खरं तर हे सुख आपल्याकडेच असतं. ते आपण ओळखू शकत नाही. ते ओळखायला शिकण्याचा प्रयत्न म्हणजे ‘थॅंक यू विठ्ठला’ हा चित्रपट आहे. दिग्दर्शक देवेंद्र जाधवनं तो खूप छान पद्धतीनं मांडला आहे.

तुमची या चित्रपटातील नेमकी भूमिका काय?

– याबद्दल तपशीलात मी आत्ताच सांगू शकत नाही. ते तुम्ही चित्रपटातच पाहा. परंतु, एवढंच सांगेन की, विठ्ठल हा माणसाच्या रुपात येथे पाहायला मिळतो. या चित्रपटाचं मला सर्वात मोठं आवडलेलं वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील ‘व्हीएफएक्स’ इफेक्टस. एवढं चांगलं काम यापूर्वी मराठी चित्रपटांमध्ये झालेलं नव्हतं. चित्रपटात एकूण तीन गाणी असून ती कथानकाच्या प्रवाहाबरोबर आहेत.



या चित्रपटात मकरंद अनासपुरेबरोबर काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?

– छान. मकरंद अनासपुरेबरोबर मी अनेक वर्ष केलं आहे. किंबहुना मकरंद काही दशकांपूर्वी मुंबईत पहिल्यांदा आला तेव्हापासून तो माझ्यासोबत आहे. ‘वास्तव’, ‘जिस देशमें गंगा रहता है’, ‘प्राण जाए पण शान ना जाए’, ‘दे धक्का’ असे अनेक चित्रपट आम्ही केले आहेत. माझा तो फेवरेट अॅक्टर आहे. गेल्या काही काळात त्यानं विश्रांती घेतली होती. परंतु, या चित्रपटात तो एका मस्त रोलद्वारे प्रेक्षकांसमोर आला आहे.

हल्ली मराठी चित्रपटांचा लोकाश्रय घटत चालला आहे. त्यासाठी तुम्ही कोणाला दोषी मानाल?

– काही जण मल्टिप्लेक्सवाल्यांना दोष देतात. ते काही योग्य नाही. एका आठवड्यात जर आपणच चार-पाच मराठी चित्रपट प्रदर्शित केले तर मग ते तरी काय करणार? चित्रपट चांगला असला तर ही मंडळी नक्कीच आपणास ‘शोज’ वाढवून देतात. कोणत्याही चित्रपटाचं यश-अपयश हे त्याच्या ‘कण्टेण्ट’वरच अवलंबून असतं. हे फक्त मराठी चित्रपटांपुरतंच मर्यादित नाही. ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘ट्युबलाइट’ या चित्रपटांची ‘स्टारकास्ट’ मोठी असूनही त्याला मोठं यश मिळालं नाही. तसेच ‘बरैली की बर्फी’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हे चित्रपट छोटे असूनही ते चालले. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, असा बाऊ करण्याची गरज नाही. कण्टेण्ट इज अ किंग. तो चांगला असेल तर प्रेक्षक कुठंही येतीलच.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

मकरंद डोईजड

अभिनेत्री अनुपमा यांच्या फेसबुकवर दिलेल्या माहितीवर आलेली प्रतिक्रिया
:-गेली १ वर्ष या अभिनेत्रीचे पूर्ण नाव शोधत होतो. खूप खुप धन्यवाद.💐
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया