अतिथी कट्टा

दिनांक : १०-०८-२०१७

‘कच्चा लिंबू’ असा घडला…मंदार देवस्थळी निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ चित्रपट येत्या ११ तारखेला प्रदर्शित होत आहे. रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत प्रेम यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ‘कृष्णधवल’ आहे. या चित्रपटाबद्दल त्याचा दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांचं हे मनोगत.
——-

प्रसाद ओक : पुणे सोडून मुंबईला येऊन मला आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. एक अभिनेता म्हणून खूप चांगलं काम करण्याची संधी मला मिळायला हवी होती. परंतु, ती दुर्दैवानं अजूनपर्यंत मिळालेली नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. ती सगळी एनर्जी, जोश, उत्साह मला अभिनयात दाखवायचा होता. ते काही जमलं नाही. मात्र मुळात मी मुंबईत दिग्दर्शक होण्यासाठीच आलो होतो. परंतु, ‘कच्चा लिंबू’ घडेपर्यंत त्या दृष्टीनं माझ्याकडून एकही पाऊल उचललं गेलं नव्हतं. ते पाऊल यावेळी उचललं गेलं ते माझा वीस वर्षांपासूनचा असलेला मित्र मंदार देवस्थळीमुळं. तोदेखील काहीतरी वेगळं करण्याच्या वळणावर उभा होता. त्यानं मला हात दिला नि ‘कच्चा लिंबू’ घडला. नायिकेच्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’तून अख्खा चित्रपट उलगडतो. नायिकेच्या आयुष्यातले रंग उडालेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट ‘कृष्णधवल’ करण्यात आला आहे. तरीदेखील चित्रपटात अधूनमधून आम्ही रंगांचे काही खेळ केले आहेत. त्यामुळे केवळ गंमत म्हणून तो ‘ब्लॅक अॅंड व्हाइट’ केलेला नाही. त्यामागे विचारांची पक्की बैठक आहे. माझ्या असं लक्षात आलं की जयवंत दळवी हा खूप मोठा साहित्यिक आहे. दळवी हे अस्सल नाटककार होते. त्यांचं कुठलंही नाटक हे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन किंवा इतर भाषेमधील साहित्य कृतीवर आधारलेलं नव्हतं. त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या कलाकृती या अस्सल आहेत. त्यामुळेच त्यांच्या साहित्यावर एखादा चित्रपट व्हावा असं मला मनापासून वाटत होतं. ‘पुरुष’सारखा एक उत्तम चित्रपट झाला. नाही असं नाही. इथून पुढे मी त्यांच्या अजून काही कादंबऱ्यांवर निश्चित चित्रपट करीन.

चिन्मय मांडलेकर : २०१३ मध्ये एका नाट्यप्रयोगानंतर प्रसादनं मला माझ्या हातात एक झेरॉक्स प्रत दिली. ‘ही कादंबरी वाच, याच्यावर चित्रपट करूया’, असं तो म्हणाला. जयवंत दळवींची ‘ऋणानुबंध’ अशी ती कादंबरी होती. मी ती वाचली. ही कादंबरी वाचून मला खूप ‘डिप्रेशन’ आलं होतं. यावेळी मला प्रसाद म्हणाला की, ‘या कादंबरीवर ‘नातीगोती’ नावाचं चांगलं नाटक झालं आहे. याच्यावर चांगला चित्रपटही होऊ शकतो. तू जरा विचार कर.’ तसा मी केल्यानंतर जाणवलं की या कथानकातील पात्रांच्या सिच्युएशनमध्ये जर आपल्याला थोडी ‌‘फ्लाइट’ घेता आली तर एक सुंदर सिनेमा करता येईल. कादंबरीचा सिनेमा करण्यासाठी जे काही स्वातंत्र्य हवं होतं, ते आम्हाला जयवंत दळवींच्या मुलानं दिलं. त्यामुळे त्यांचे आभार. कारण, जशी कादंबरी तसाच सिनेमा हवा, यावर जर ते अडून बसले असते तर मग हा चित्रपट आम्हाला करता आला नसता. कादंबरीचा काळ आम्ही तसाच ठेवलाय. प्रसादचा मी खूप आभारी आहे. कारण दिग्दर्शक हा नटांना दिग्दर्शन करतो, असं माझं आतापर्यंतचं मत होतं. पण मला हा पहिला दिग्दर्शक भेटला की जो लेखकालाही दिग्दर्शन करीत होता. हे मी खूप चांगल्या अर्थानं म्हणतोय. या चित्रपटाच्या लेखन प्रक्रियेवेळी आम्ही दररोज भेटायचो. त्यावेळी आम्ही दोघं एकाच नाटकात अभिनेते म्हणून काम करीत होतो. परंतु, तो असा सारखा काय लिहिलंस आता, म्हणून सारखं माझ्या मागे लागायचा नाही. ठरलेल्या तारखेच्या वेळीच तो विचारणा करायचा. पण मी जे काही लिहायचो, त्यावर त्यानं केलेली तयारी खूपच ‘अमेझिंग’ होती. अशी तयारी मी खूप कमी दिग्दर्शकांकडे पाहिलीय. या चित्रपटाचा ‘सेकंड ड्राफ्ट’ मी लिहिला तेव्हा प्रसादच्या ‘व्हिजन’ची मला खूप मदत झाली. या चित्रपटाला जे ‘अॅक्टर्स’ मिळालेत, त्यांनी तर कमालच केलीय. साधारपणपणे लेखक हा आपल्या लिहिलेल्या कलाकृतीचं पडद्यावर जे रूप दाखवलं जातं, त्याच्यावर खूश नसतो. परंतु, प्रसादनं ‘कच्चा लिंबू’ ज्या पद्धतीनं साकारलाय त्यावर पूर्णपणे खूश आहे.
——–

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

नारायण केशव


सुधीर फडके, पु . ल. देशपांडे आणि ग. दि. माडगुळकर यांच्या जीवनावरील आपण सादर केलेले AV व्हिडीओ खूप सुंदर होते. सुधीर नांदगावकरजींनी ती माहिती व्हिडीओ रूपात सादर केली या बद्दल त्यांचे आभार.
संदर्भ:- प्रतिक्रिया