चित्र-चरित्र

आदिनाथ कोठारे
आदिनाथ कोठारे
अभिनेता
१३ मे १९८४

प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचा आदिनाथ हा मुलगा. कला क्षेत्र रक्तातच असल्याने आदिनाथची या क्षेत्रामधील वाटचाल अगदी लहानपणापासूनच झाली. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी तो महेश कोठारे यांचेच दिग्दर्शन असलेल्या ‘माझा छकुला’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकला. त्यानंतर आदिनाथने महेश कोठारे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘पछाडलेल्या’, ‘खबरदार’, ‌‘चिमणी पाखरं’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. ‌‘दुभंग’, ‘सतरंगी रे’, ‘झपाटलेला २’, ‘इश्कवाला लव्ह’, ‘अवताराची गोष्ट’, ‘निळकंठ मास्तर’, ‘अनवट’ हे त्याचे काही उल्लेखनीय चित्रपट. चित्रपटांखेरीज मालिका निर्मितीमध्येही आदिनाथने मोठी भूमिका निभावली. ‘जय मल्हार’, ‘हंड्रेड डेज’ या मालिकांच्या निर्मिती त्याने केली. ‘माझा छकुला’मधील भूमिकेसाठी १९९५ मध्ये त्याला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.

'15 ऑगस्ट', 'टेक केअर गुड नाइट' हे आदिनाथचे अलीकडचे चित्रपट. 'पाणी' चित्रपटाद्वारे त्यानं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. परंतु, हा चित्रपट अजूनपर्यंत प्रदर्शित झालेला नाही. त्याखेरीज '८३' या हिंदी चित्रपटामध्येही त्याची महत्त्वाची भूमिका असून त्याचंही प्रदर्शन कोरोना साथीमुळे सध्या थांबलेले आहे. 'शेवंता' या लघुपटातील त्याची भूमिका रसिकप्रिय ठरली. 'पाहिले न मी तुला', 'विठू माऊली' या त्यानं निर्मिलेल्या मालिका लोकप्रिय ठरल्या.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटामधील आदिनाथच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र