चित्र-चरित्र

चंद्रकांत मांडरे
चंद्रकांत मांडरे
अभिनेता
१३ ऑगस्ट १९१३ --- १७ फेब्रुवारी २००१

मूकपटापासूनच आपल्या कसदार अभिनयाने आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाने मराठी चित्रपटसृष्टीवर स्वतंत्र ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे चंद्रकांत. चंद्रकांत जवळपास पाच दशके चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. या काळात शंभराहून अधिक चित्रपटात भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. चंद्रकांत उर्फ गोपाळ तुकाराम मांडरे यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांना एक बहीण आणि वामन उर्फ सूर्यकांत हे भाऊ होते. त्यांच्या वडिलांचा लुगडी विकण्याचा व्यवसाय होता. चंद्रकांत यांचे इंग्रजी सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण कोल्हापूरलाच हरिहर विद्यालयात आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झाले. त्या वेळीच त्यांच्यावर चित्रकलेचेही संस्कार झाले. त्या लहान वयात माधवराव बागल यांच्या निसर्गचित्रांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. वडिलांनी त्यांना बाबूराव पेंटर यांच्याकडे नेले. मात्र बाबूरावांनी त्यांना बाबा गजबरांकडे पाठवले. गजबर तेव्हा ओब्रायन टेक्निकल स्कूलमध्ये कलाशिक्षक होते.
चंद्रकांत यांनी गजबरांकडूनच चित्रकलेचे पहिले धडे घेतले आणि चित्रकलेत कसब मिळवून इंटरमिजिएट ही चित्रकलेची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. १९३२ मध्ये कोल्हापूरच्या राजाराम आर्ट सोसायटीतर्फे भरलेल्या प्रदर्शनात चंद्रकांत यांच्या पन्हाळा किल्ल्याच्या जलचित्राला पहिले रौप्यपदक मिळाले. बाबा गजबरांनी त्यांचे चित्रकलेतले प्रावीण्य पाहून बलवंत सिनेटोन कंपनीत पोस्टर तयार करण्याची नोकरी मिळवून दिली. पण बलवंत सिनेटोन कंपनी लवकरच बंद पडली. त्यानंतर शालिनी सिनेटोन या बाबूराव पेंटर यांच्या चित्रकंपनीत महिना २५ रुपये पगारावर ते नोकरी करू लागले. शालिनी सिनेटोनतर्फे सुरू असलेल्या ‘उषा’ या भव्य पौराणिक चित्रपटांची पोस्टर्स चंद्रकांत यांनी बनवली. पुढे बाबूराव पेंटर यांनी ‘सावकारी पाश’ या मूकपटाचे बोलपटात रूपांतर करण्याचे काम सुरू केले. या चित्रपटाचा नायक म्हणून बाबूरावांनी चंद्रकांत यांची निवड केली. या पहिल्याच चित्रपटात बाबूराव पेंटर यांनी त्यांच्याकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला. ‘सावकारी पाश’ हा त्यांचा पहिलाच सामाजिक चित्रपट यशस्वी ठरला होता.
चंद्रकांत यांनी १९३८ मध्ये ‘ज्वाला’ या चित्रपटात अभिनेते चंद्रमोहन यांच्याबरोबर अभिनय केला. त्याच वर्षी भालजी पेंढारकर यांनी सरस्वती सिनेटोनतर्ङ्गे ‘राजा गोपीचंद’ या चित्रपटाची निर्मिती करताना चंद्रकांत यांना बोलावून घेतले आणि चित्रपट पूर्ण झाल्यावर चित्रपटाची जाहिरात करताना त्यांचे नाव ‘चंद्रकांत’ असे ठेवले. त्यानंतर चंद्रकांत यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘शेजारी’ या चित्रपटात भूमिका केली आणि ‘प्रभात’मध्ये ते पूर्णवेळ नोकरीही करू लागले. पुढे त्यांनी ‘थोरातांची कमळा’, ‘भरतभेट’, ‘रामराज्य’, ‘जय मल्हार’, ‘मानाचं पान’, ‘मीठभाकर’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘वादळ’, ‘मुकं लेकरू’, ‘भाऊबीज’, ‘सांगते ऐका’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘मानाचा मुजरा’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘ईर्षा’, ‘अष्टविनायक’, ‘भालू’, ‘पतिव्रता’, ‘बनगरवाडी’ अशा अनेक चित्रपटांत उल्लेखनीय भूमिका केल्या. ‘राजा गोपीचंद’सह ‘असीरे हवीस’, ‘महारथी कर्ण’, ‘जीवनयात्रा’, ‘मेरे लाल’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘नवरंग’, ‘सुवर्णभूमी’, ‘शेरशिवाजी’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला आणि ‘लाईन्स ऑन द रॉक’ या इंग्रजी चित्रपटातही विशेष भूमिका केली.
‘युगे युगे मी वाट पाहिली’ (१९६५), ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९६६) आणि ‘संथ वाहते कृष्णामाई’ (१९६७) या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला राष्ट्रीय सन्मान मिळाला; तर ‘संथ वाहते कृष्णामाई’ (१९६७) आणि ‘खंडोबाची आण’ (१९६८) या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने पारितोषिक देऊन गौरवले होते. चंद्रकांत यांनी भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटातील शिवाजीराजे इतक्या ताकदीने, समरसतेने उभे केले की, महाराष्ट्रातील रसिकांनी त्यांच्या रूपातील छायाचित्रे घराघरांत जपून ठेवली. त्याचबरोबर संभाजी, शहाजी यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांतही त्यांनी इतिहासातली सजीवता आणली आणि ‘राम’, ‘कृष्ण’ अशा पौराणिक अवतारातही त्यांच्या व्यक्तित्वाने रसिकांना भारावून टाकले होते.
भूमिका नेमकी समजून, अचूक संवादफेकीने त्यांनी लोहारापासून गावपाटलापर्यंत आणि शेतकर्‍यापासून नेत्यापर्यंत विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांना पुरेपूर न्याय दिला. सूर्यकांत या त्यांच्या अभिनेते बंधूंबरोबरही ते अनेक चित्रपटांत दिसले.
चंद्रकांत यांनी १९८० साली चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती पत्करली. मात्र अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या आग्रहास्तव त्यांनी १९९७ साली ‘बनगरवाडी’ चित्रपटात भूमिका केली. हाच त्यांचा अखेरचा चित्रपट.
चित्रपटसृष्टीतल्या रुपेरी कारकिर्दीबरोबरच त्यांच्यातल्या संपन्न चित्रकाराने चित्रकार म्हणूनही मान्यता मिळवली. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या मधल्या वेळात त्या त्या ठिकाणी त्यांनी जलरंगात अनेक निसर्गचित्रे रेखाटली. यासाठी त्यांनी ङ्ग्रान्स, नेपाळ, अमेरिकेसह अनेक परदेशदौरे केले. भारतभर चित्रप्रदर्शनेही भरवली. चित्रकला क्षेत्रातल्या या योगदानासाठी त्यांना जागतिक मराठी परिषद (१९८९), फाय फाऊंडेशन (१९३०), छत्रपती शाहू पुरस्कार (१९९४), व्ही. शांताराम पुरस्कार (१९९४), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार (१९९८) यांसह महत्त्वाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
दर वर्षी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना निसर्गचित्राच्या आणि पावडर शेडिंगच्या वर्गात चंद्रकांत मांडरे स्वत: शिकवत असत. १९८४ साली चंद्रकांत यांनी स्वत: काढलेली ४०० चित्रे शासनाच्या स्वाधीन केली आणि त्या चित्रांचे ‘चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय’ही उभे राहिले. त्यांनी १९९७ साली चंद्रकांत मांडरे कला अकादमी स्थापन केली. या अकादमीतर्फे दर वर्षी कष्टाळू, गुणवंत कलावंतांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मानही केला जातो.
आपल्या अखेरच्या काळातही कलासाधनेत व्यस्त असतानाच चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले एक समर्थ, तेजस्वी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
- स्नेहा अवसरीकर



चित्र-चरित्र