चित्र-चरित्र

पुष्कर श्रोत्री
पुष्कर श्रोत्री
अभिनेता
३० एप्रिल १९७४

एक अष्टपैलू अभिनेता अशी पुष्कर श्रोत्री याची ओळख आहे. चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा असा हा अभिनेता आहे. पुष्करचं बालपण मुंबईतील विलेपार्ले येथे गेलं. मुंबईतील डहाणूकर महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर पुष्करनं कलाक्षेत्र पसंत केलं. जवळपास २५हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यानं आतापर्यंत काम केलं आहे. ‘कायद्याचं बोला’, ‘जबरदस्त’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘सखी’, ‌‘रीटा’, ‘हापूस’, ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘रेगे’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘कट्यार काळजात घुसली’ हे त्याचे काही उल्लेखनीय चित्रपट. ‌‘फू बाई फू’, ‘एकापेक्षा एक’, ‘जोडी जमली रे’, ‘दामिनी’, ‌‘बंदिनी’, ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘दौलत’ या त्याच्या लोकप्रिय मालिका. ‘हसत खेळत’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘हसवाफसवी’ ही त्याची गाजलेली नाटके. ‌‘हसवाफसवी’मधील त्याच्या सहा भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध असलेल्या पुष्करनं आतापर्यंत दोन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हाय काय नाय काय’ हा चित्रपट त्यानं प्रसाद ओक याच्यासोबत दिग्दर्शित केला होता. ‘उबंटु’ हा त्यानं दिग्दर्शित केलेला चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'हिरकणी', 'ये रे ये रे पैसा २', 'स्माइल प्लीज', 'मंकी बात', 'शेंटिमेंटल', 'चुंबक' हे त्याचे अलीकडील काही उल्लेखनीय चित्रपट.

२०२२ मध्ये पुष्करचे 'दिल दिमाग और बत्ती' आणि 'एकदा काय झालं' हे चित्रपट प्रदर्शित झाले.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र