चित्र-चरित्र

अमृता सुभाष
अमृता सुभाष
अभिनेत्री
१३ मे १९७९

अमृता सुभाष ह्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या कन्या. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. याचवेळी पं. सत्यदेव दुबे यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं. नवी दिल्ली येथे असतानाच सुभाष यांनी ‘ऊर्वशियम’ (१९९७), ‘बेला मेरी जान’ (१९९८), ‘हाऊस ऑफ बर्नाडा’, ‘अल्बा’ (१९९८), ‘मृगतृष्णा’ आदी नाटकांमध्ये कामं केली. ‘एनएसडी’तून शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रात परतल्यानंतर ही अभिनेत्री चमकली ती ‘ती फुलराणी’ या सदाबहार नाटकाद्वारे. पु. ल. देशपांडे लिखित आणि भक्ती बर्वे यांनी गाजविलेल्या या नाटकावर अमृता यांनीही आपली वेगळी छाप उमटवली. इथूनच त्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये आल्या. ‘श्वास’ (२००४) या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षी त्यांनी सागर सरहदी यांच्या ‌‘चौसार’ या चित्रपटात काम केलं. २००४ मध्येच ‘निर्मला’ मालिकेद्वारे सुभाष यांना विख्यात दिग्दर्शक गुलजार यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. अभिनेत्री नंदिता दासने दिग्दर्शित केलेल्या ‌‘फिराक’ चित्रपटात सुभाष यांनी नसिरुद्दीन शाह, परेश रावळ, दीप्ती नवल यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केलं. ‘वळू’ (२००८), ‘त्या रात्री पाऊस होता’ (२००९), ‘विहीर’ (२००९), ‘गंध’ (२००९), ‘हापूस’ (२०१०), ‘मसाला’ (२०१२), ‘बालक पालक’ (२०१३), ‘किल्ला’ (२०१५) हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. ‘साठेचं काय करायचं’, ‘श्री तशी सौ’, ‘लव्ह बर्डस’ या नाटकामधील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या. रंगभूमीवरील दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांच्याशी त्यांनी विवाह केला.

'गल्ली बॉय' या चित्रपटामधील अमृता सुभाषच्या अभिनयाचं खूपच कौतुक झालं होतं. 'ती आणि इतर', '६ गुण' (२०१७), 'झिपऱ्या' (२०१८), 'दिठी' (२०१९) हे तिचे अलीकडचे महत्त्वाचे चित्रपट.

२०२२ मध्ये अमृता सुभाष यांनी 'वंडर वुमन' या कलाकृतीमध्ये काम केलं.

-मंदार जोशी
(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)



चित्र-चरित्र