चित्र-चरित्र

अरुण नलावडे
अरुण नलावडे
अभिनेते
२६ ऑगस्ट

मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिका या तीनही माध्यमांवर आपला ठसा उमटविणारे अभिनेते म्हणजे अरुण नलावडे. चित्रपट माध्यमाचं त्यांना लहानपणापासूनच वेड. सातवी-आठवीत असतानापासूनच त्यांनी असंख्य चित्रपटांचा आस्वाद घेतला. गावातील गल्लीत दाखवला जाणारा प्रत्येक चित्रपट मी पाहत असे. त्या चित्रपटांनी त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवले. गुरुदत्त यांचे ‘प्यासा’, ‘साहेब बीबी और गुलाम’ हे त्यांचे आवडीचे चित्रपट. मराठी चित्रपटसृष्टीला अलीकडच्या काळात जागतिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या ‘श्वास’ चित्रपटामधील भूमिकेमुळे अरुण नलावडे यांचं नाव देशभर पोचलं. या चित्रपटामधील त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. ‘रेशमगाठ’, ‘अकल्पित’, ‘पैलतीर’, ‘काय द्याचं बोला’, ‘साडे माडे तीन’, ‘रिंगण’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘दिवसेंदिवस’, ‘माझी शाळा’ हे त्यांचे काही इतर उल्लेखनीय चित्रपट. ‘ताटवा’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शनही केलं होतं. मराठी रंगभूमीवरही नलावडे यांनी दीर्घ काळ काम केलं आहे. अलीकडेच त्यांचं ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे नाटक रंगभूमीवर आलं आहे. मालिका क्षेत्रामध्येही नलावडे यांचा सातत्यानं वावर राहिला आहे. ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, ‘नातीगोती’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘का रे दुरावा’, ‘अवघाचि संसार’ या मालिकांमधील त्यांचा अभिनय प्रेक्षकप्रिय ठरला.
- मंदार जोशी



चित्र-चरित्र