हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वावरणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे मिलिंद गुणाजी. जाहिरात क्षेत्रापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून गुणाजी यांनी कला क्षेत्रामध्ये मोठं नाव कमावलं. अनेक मोठमोठ्या ब्रॅंडसाठी त्यांनी मॉडेलिंग केलं आहे. विख्यात दिग्दर्शक गोविंद निहालाणी यांच्या ‘द्रोहकाल’ चित्रपटामधून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर 'फरेब', 'विरासत', गॉडमदर', ‘देव’, ‘देवदास’ यांसह इतर अनेक मराठी सिनेमांमधून मिलिंद गुणाजी यांनी काम केलं. ‘सरकारनामा’, ‘मंथन’, ‘मेड इन चायना’, ‘ठण ठण गोपाळ’, ‘टपाल’, ‘बापू बिरू वाटेगावकर’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांवर त्यांचं मनापासून प्रेम. ‘भटकंती’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी महाराष्ट्राचा परिचित तसेच अपरिचित भाग प्रेक्षकांसमोर आणला. आतापर्यंत त्यांनी विविध भाषांमधील जवळपास अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांबरोबरच अनेक मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.
'पानीपत', 'मिरांडा हाऊस', 'द वॉरिअर क्वीन ऑफ झाशी', 'रेस ३', 'माणूस एक माती', 'द गाझी अॅटॅक' या अलीकडच्या काळातील काही हिंदी-मराठी चित्रपटांमधून गुणाजी यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचे प्रेक्षकांनी कौतुक केलेले आहे.
मंदार जोशी