चित्र-चरित्र

प्रसाद ओक
प्रसाद ओक
अभिनेता
१७ फेब्रुवारी

प्रसाद ओक यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूल आणि ‘बीएमसीसी’ येथे झाले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासारखाच एक कार्यक्रम पुण्यात चारुदत्त आफळे सादर करायचे. यात चंद्रशेखर महामुनी गायक होते. त्यांच्या टीमसोबत प्रसाद ओक ‘कोरस’ म्हणून गात असत. प्रसाद ओक यांनी करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. ‘रणांगण’, ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकांमधून प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो ‘सारेगमप’ या ‘झी’च्या रिअॅलिटी शोचा. प्रसाद ओक यांच्या आई संगीत विशारद आहेत. पण प्रसाद ओक हे कधीच गाणे शिकले नव्हते, त्यांना उपजतच गात्या गळ्याची देणगी मिळाली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवातही गाण्याच्या कार्यक्रमातूनच केली होती, ‘सारेगमप’ स्पर्धेतून गायक म्हणूनही प्रसाद ओक यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. ‘सारेगमप’चा विजेता बनल्यानंतर प्रसाद ओक हे ‘झी मराठी’चा ब्रँड अँबेसेडर बनले, एका वाहिनीचा चेहरा बनणारा प्रसाद हा पहिला मराठी कलाकार. त्यानंतर ‘स्टार’ वाहिनीनेही प्रसाद ओक यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते. आतापर्यंत ७० ते ७५ सिनेमे, ८० ते ८५ मालिका आणि २५ नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा प्रसाद ओक यांनी उमटवला आहे. ‘अवघाचि संसार’ मालिकेतली खलनायकी वळणाची भूमिकाही असो वा ‘नांदी’ नाटकातली स्त्री भूमिका, प्रसाद ओक यांनी सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘नांदी’ या संगीत नाटकांतील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक झाले. ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाची संसार’, ‘असंभव’, ‘वादळवाट’ आणि ‘होणार ‘सून मी ह्या घरची’ या प्रसाद ओक यांच्या मालिका विशेष लोकप्रिय ठरल्या. ‘धतिंग धिंगाणा’, ‘खेळ मांडला’, ‘हाय काय नाय काय’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा’, ‘क्षण’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हे प्रसाद ओक यांचे गाजलेले सिनेमे. अगदी अलीकडेच ओक यांनी दिग्दर्शित केलेला ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट विशेष लक्षणीय ठरला होता.

'धुरळा', 'ये रे ये रे पैसा २', 'फर्जंद', 'शिकारी', 'होम स्वीट होम' हे त्याचे अलीकडचे अभिनय केलेले चित्रपट. 'हिरकणी' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले आहे.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर' या चित्रपटामध्ये प्रसाद ओक यांनी साकारलेली आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय ठरली. २०२२ मधेच ओक यांनी 'चंद्रमुखी' चित्रपट दिग्दर्शित केला होता.

मंदार जोशी



चित्र-चरित्र