सुशांतचा जन्म मुंबईचा. दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण झालं. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर त्यानं अनेक एकांकिका तसेच नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. सुरुवातीच्या काळात त्यानं छोट्या पडद्यासाठी भरपूर काम केलं. ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘मयूरपंख’, ‘आभाळमाया’, ‘किमयागार’, ‘घे मराठी’, ‘काटा रुते कुणाला’, ‘अग्निशिखा’ या त्याच्या काही उल्लेखनीय मालिका. ‘दुनियादारी’ या चित्रपटानं त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ‘वंशवेल’, ‘क्लासमेटस’, ‘मॅटर’, ‘तू ही रे’, ‘संघर्ष’ हे त्याचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘दांडेकरांचा सल्ला’, ‘आधी बसू मग बोलू’, ‘आयत्यावर कोयता’ या मराठी नाटकांमध्येही त्यानं काम केलं आहे.
अंड्याचा फंडा (२०१७), गर्भ (२०१७), खारी बिस्कीट (२०१९) या चित्रपटांमध्येही त्यानं आपली अभिनयाची चमक दाखवली आहे. गेल्या काही वर्षांपासून तो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा प्रमुख कार्यवाह या पदाची जबाबदारी निभावत आहे.
-मंदार जोशी