चित्र-चरित्र

के.नारायण काळे
के.नारायण काळे
पटकथा, संवाद व गीतलेखक, अभिनेता
२४ एप्रिल १९०४ --- २० फेब्रुवारी १९७४

केशव नारायण काळे हे ‘के नारायण काळे’ या नावाने साहित्य जगतात, नाटकात आणि चित्रपटात वावरत असत. काळे त्या काळचे बी.ए., एलएल.बी. होते. पण त्यांना रस होता तो साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रांत. ‘इम्पिरियल’ कंपनीने १९२८ साली ‘जगद्गुरू शंकराचार्य’ अर्थात ‘द वर्ल्ड टीचर’ हा मूकपट काढण्याचे ठरवले आणि पार्श्वनाथ आळतेकर यांच्यावर त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. आळतेकरांनी मामा वरेरकर यांच्याकडून चित्रपटाची पटकथा लिहून घेतली आणि शंकराचार्यांच्या भूमिकेसाठी के. नारायण काळे यांची निवड केली. काळे यांनी अभिनय केलेला हा पहिलाच चित्रपट होय. त्यानंतर काळे यांनी १९३० सालामध्ये ‘हूज फॉल्ट’ या आणि १९३१ मध्ये एक-दोन मूकपटांतून काम करून ‘रत्नाकर’ या उत्कृष्ट मासिकाचे संपादकपद स्वीकारले. काळे हे ‘नाट्यमन्वंतर’ या नाटक संस्थेमध्ये हिरिरीने भाग घेत. ‘नाट्यमन्वंतर’मध्ये के. नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे, केशवराव दाते आणि वर्तक यांसारखी मंडळी काम करत. ‘आंधळ्यांची शाळा’ हे काळे यांचे नाटक खूपच गाजले होते. ते पाहून शांतारामबापूंनी के. नारायण काळे यांना ‘प्रभात’मध्ये येण्याचे निमंत्रण दिले. त्या वेळेस ‘प्रभात’मध्ये ‘अमृतमंथन’ या चित्रपटाची निर्मिती चालली होती. ‘अमृतमंथन’चे गीत-संवादलेखन काळे यांनी केले. पुरोगामी लेखक म्हणून काळे प्रसिद्ध होते. त्यांनी शांतारामबापूंना ‘संत एकनाथ’ यांच्या जीवनावर चित्रपट करण्यास सांगितले. कारण एकनाथांनी आपल्या काळी हरिजनोद्धाराची क्रांतिकारक सुधारणा प्रत्यक्ष कृतीने अमलात आणली. त्यांच्या या चरित्रविशेषांवर काळे यांनी भर दिला होता. त्यांनी ‘धर्मात्मा’ या चित्रपटाचे संवादलेखन, पटकथालेखन पार पाडले आणि चित्रपटातून एकनाथांच्या मुलाचे कामही केले. काळे यांनी ‘प्रभात’साठी ‘अमरज्योती’ नावाची एक कल्पनारम्य कथा लिहिली. हा चित्रपट फक्त हिंदी भाषेत होता व त्यात दुर्गा खोटे, शांता आपटे, वासंती आणि चंद्रमोहन यांच्याबरोबर काळे यांनीही भूमिका निभावली होती. शांतारामबापूंनी काळे यांना स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी दिली, तो चित्रपट होता ‘वहॉं’. या चित्रपटामध्ये आर्य आणि अनार्य यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला होता. ‘प्रभात’ने काळे यांना दिग्दर्शनासाठी ‘माझा मुलगा’ हा पुढला चित्रपट दिला. या चित्रपटानंतर काळे ‘प्रभात’मधून बाहेर पडले. त्याबरोबर ‘नवयुग पिक्चर्स’ने त्यांना ‘लपंडाव’ हा आपला चित्रपट दिला. या चित्रपटामध्ये मा. विनायक, मीनाक्षी, वनमाला आणि बाबूराव पेंढारकर यांसारखे दिग्गज कलाकार होते. काळे यांनी स्वत:ची चित्रपट कंपनी स्थापन करून ‘म्युन्सिपालटी’ हा चित्रपट निर्माण केला. त्याचे दिग्दर्शन मात्र बाबूराव आपटे यांच्याकडे सोपवले होते. त्यानंतर काळे यांनी अत्र्यांचा ‘बाईलवेडा’ हा चित्रपट दिग्दर्शित करून दहा वर्षांची दीर्घ विश्रांती घेतली. १९५३ साली त्यांनी पुलंचा ‘अंमलदार’ आणि सदाशिवराव कवी यांचा ‘दीदी’ हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित करून चित्रपट जगताचा संन्यास घेतला.

के.नारायण काळे



चित्र-चरित्र