चित्र-चरित्र

अश्विनी भावे
अश्विनी भावे
अभिनेत्री
७ मे १९६७

सौंदर्य, अभिनय व नृत्य यांचे उत्तम समीकरण असलेल्या अश्विनी भावे यांची सगळ्यात मोठी मिळकत म्हणजे, आपल्या विविध प्रकारच्या भूमिकांतून त्यांनी कमावलेली विश्वसनीयता व त्यातून निर्माण झालेला त्यांचा चाहता वर्ग. अश्‍विनी शरद भावे यांचा जन्म अलिबाग येथे झाला. मुंबईच्या शीव भागातील साधना विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. अश्विनी यांना शाळेत असल्यापासूनच कलेची आवड. तेव्हा जवाहर बालभवनच्या नाट्यवाचन स्पर्धेत भाग घेत त्या बक्षिसे मिळवीत असत. आठवी, नववी व दहावी अशा लागोपाठच्या इयत्तेत `गोवा हिंदू असोसिएशन`च्या अभिनय स्पर्धेत त्यांनी पारितोषिके पटकावली. मुंबईच्या एस.आय.ई.एस. आणि रुपारेल या महाविद्यालयांतून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. अश्‍विनी भावेंनी रुपारेल महाविद्यालयामधून तत्त्वज्ञान विषयात बी.ए. पदवी मिळवली आहे. अकरावीला असताना त्यांनी ‘गगनभेदी’ नाटकात केलेले काम बघूनच भालजी पेंढारकर यांनी ‘शाबास सूनबाई’ या चित्रपटासाठी अश्‍विनी भावे यांची निवड केली. ‘सूनबाई’ या त्यांच्याच चित्रपटाची ही ‘पुनर्निर्मिती (रिमेक)’ होती. प्रभाकर पेंढारकर अर्थात दिनेश यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अजिंक्य देव त्यांचे नायक होते.

मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून भूमिका साकारलेल्या अश्विनी यांना खरी ओळख दिली, ती ‘आहुती’, ‘वजीर’, ‘एक रात्र मंतरलेली’, ‘कळत नकळत’, ‘सरकारनामा’ अशा वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांनी!

या माध्यमांबाबत त्या खूप गंभीर आहेत, अशी त्यांची सकारात्मक प्रतिमा या प्रकारच्या भूमिकांमुळेच आकाराला आली. आर.के. फिल्म्सच्या ‘हीना’द्वारे त्यांनी हिंदी चित्रपटांत भूमिका केली. मराठी समाजानेही या गोष्टीची विशेष ‘दखल’ घेतली. रणधीर कपूर दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर व झेबा यांच्यासोबत अश्विनी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. लहानमोठ्या गोष्टींची अनुभूती घेण्याचे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देते. हिंदीतही त्यांनी ‘पुरुष’, ‘भैरवी’ अशा काही वेगळ्या चित्रपटांतून भूमिका केल्या. व्यावसायिक वाटचालीत काही मसालेदार चित्रपटांतून स्वत:ला ‘कार्यमग्न’ ठेवण्याचे कर्तव्यही पार पाडावे लागते, तेही त्यांनी केले.

‘एवढंसं आभाळ’ हा त्यांनी निर्माण केलेला पहिला मराठी चित्रपट, लहान मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखवण्यात यशस्वी ठरला. चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शकासोबत त्यांनी ‘कदाचित’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या कथानकाला अश्‍विनी भावे यांनी आपल्या अभिनयाद्वारे न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ‘वारली चित्रकले’वर एका लघुपटाची निर्मिती करून त्यांनी आपल्या सर्जनशीलतेचाही प्रत्यय रसिकांना करून दिला. त्याचे वडील एस.आय.ई.एस. महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते, तर आई साधना विद्यालयात शिक्षिका होत्या. अमेरिकेतील उद्योगपती किशोर बोपर्डीकर यांच्याशी विवाह करून आपल्या दोन मुलांसह (एक मुलगी व एक मुलगा) त्या सॅनफ्रॅन्सिस्को येथे स्थायिक झाल्या आहेत. अश्विनी भावे या अत्यंत प्रगल्भ व स्वतंत्र बाणा असणार्‍या अभिनेत्री आहेत. अलीकडेच `ध्यानीमनी` चित्रपटात त्यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

- दिलीप ठाकूर



चित्र-चरित्र