चित्र-चरित्र

सुप्रिया सचिन पिळगावकर
सुप्रिया सचिन पिळगावकर
अभिनेत्री
१६ ऑगस्ट १९६७

सुप्रिया सचिन पिळगावकर म्हणजे मूळची सुप्रिया अरुण सबनीस. त्यांचा जन्म मुंबईतच झाला. विलेपार्ले येथे राहणार्‍या सुप्रिया यांनी शाळेत असतानाच नाटकातून कामे करायला सुरुवात केली. सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’च्या ‘हिमगौरी आणि सात बुटके’ या नाटकात त्यांनी काम केले. त्याच वेळी त्या दूरदर्शनवरील ‘किलबिल’ या कार्यक्रमाचेही संचालन करीत असत. त्यातीलच ‘भामटी आणि बावळे’ या नाटकातील त्यांची भूमिका पाहून सचिन पिळगावकर प्रभावित झाले. ही भूमिका लक्षात ठेवून सचिन यांनी ‘नवरी मिळे नवर्‍याला’साठी सुप्रिया यांची निवड केली. चित्रपटातील अभिनयामुळे खूश झालेल्या सचिन यांनी सुप्रियाला लग्नाची मागणी घातली व २१ डिसेंबर १९८५ रोजी सचिन व सुप्रिया विवाहबद्ध झाले. त्याच वेळी त्यांचे एकीकडे रुपारेल महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण सुरू होते. विवाह झाल्यावरही त्यांची स्वत:ची ओळख व अभिनयशैली कायम राहिली, हे विशेष. लग्नानंतर दोघांनी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातून अभिनय केला. ‘तू तू मैं मैं’ या हिंदी मालिकेतील अभिनयामुळे त्या घराघरात पोहोचल्या. कालांतराने ‘नच बलिये’ या रिऍलिटी शोमध्ये त्यांनी उत्स्फूर्त नाचून विजेतेपद पटकावले. दोघांची एकमेकांना कायम साथ मिळाली.
सुप्रिया यांनी गृहिणी व आई या भूमिका सांभाळतानाच आपली कारकिर्ददेखील अगदी व्यवस्थित जपली. त्यांनी एशियन पेन्ट्स, प्रॉमिस इत्यादी उत्पादनांसाठी मॉडेलिंग केले, त्याचबरोबर ‘कुंकू’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’ अशा मराठी चित्रपटांतून आपली वाटचाल कायम ठेवली. ‘ऐतबार’, ‘बरसात’, ‘तुझे मेरी कसम’ इत्यादी हिंदी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या. ‘आम्ही दोघे राजाराणी’ या मराठी नाटकातूनही त्यांनी आपले अभिनयगुण दाखवले. या प्रवासात त्यांच्या अभिनयाची दखल घेत त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले. ‘नवरी मिळे नवर्‍याला’साठी फिल्मफेअर, तर ‘माझा पती करोडपती’साठी राज्य पुरस्कार पटकावला. पुरस्कार म्हणजे सुप्रिया यांच्यासाठी पुढील प्रवासासाठीचा खूप मोठा आनंदठेवा असतो. पुरस्कारांमध्येच त्यांच्यासारखे कलाकार अडकून पडत नाहीत, तर आपला चौफेर प्रवास कायम ठेवतात.

'सूरज पे मंगल भारी', 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज', 'बत्ती गुल मीटर चालू', 'हिचकी' हे सुप्रिया यांचे अलीकडच्या काळातील काही महत्त्वाचे हिंदी चित्रपट. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं.

- दिलीप ठाकूर
(मजकूर लेखन सौजन्य : विवेक मासिक, आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण, शिल्पकार चरित्रकोश)



चित्र-चरित्र