चित्र-चरित्र

अजिंक्य देव
अजिंक्य देव
अभिनेता
१७ जानेवारी

अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखनाबरोबरच चित्रकलेची आणि अनेक खेळांचीही आवड जोपासणार्‍या अजिंक्य देव यांचा जन्म मुंबईत झाला, बालपणही मुंबईतच गेले. बी.डी.एम. हायस्कूलमध्ये आणि साठे महाविद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. प्रख्यात अभिनेते रमेश देव व सीमा देव हे आई-वडील, अभिनय हे दिग्दर्शक असलेले धाकटे भाऊ असे हे देव कुटुंब चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे. आई-वडिलांच्या व्यग्रतेच्या काळात त्यांना आजी आणि मामा यांचा प्रेमळ सहवास लाभला. अभिनयासाठी असलेल्या आई-वडिलांची चित्रपट जगतातली कारकीर्द जवळून आणि सजगपणे अनुभवणार्‍या अजिंक्य यांनी उपजतच अभिनयाकडे असलेला कल आणि घरातला हा वारसा घेऊन चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले ते ‘अर्धांगी’ या चित्रपटाद्वारे १९८४ मध्ये. त्यानंतर त्यांचे १९८५ साली ‘वहिनीची माया’ आणि १९८६ साली ‘शाब्बास सूनबाई’ हे चित्रपट प्रदर्शित झाले, पण अजिंक्य देव यांचे नाव सर्वतोमुखी झाले ते १९८७ झाली, रमेश देव यांची निर्मिती असलेल्या, राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सर्जा’ या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीच्या चित्रपटामुळे.

अजिंक्य यांनी ‘सर्जा’ चित्रपटासाठी ‘सर्जा दोर न बांधता गड चढतो’ हे दृश्य जमिनीपासून ३५०-४०० फुटांवर जेमतेम उभे राहता येईल अशा जागी उभे राहून, अंगावर सोसाट्याचा वारा झेलत, दगडांच्या कपारीला धरून ३-४ फूट वर चढण्याचे धाडस करून चित्रित करून दिले. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी आणि तमाशाप्रधान चित्रपटांची चलती होती, त्या काळात ‘सर्जा’च्या कथानकावर चित्रपट करणे आणि तो चालणार नाही अशी शंका व्यक्त होत असतानाही रमेश देव यांनी केलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. ही भूमिका अजिंक्य यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरली. या भूमिकेसाठी अजिंक्य यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य शासनाचे विशेष पारितोषिकही मिळाले.

‘माझं घर माझा संसार’ हा त्यानंतर प्रदर्शित झालेला अजिंक्य यांचा लोकप्रिय चित्रपट. नायिका होती मुग्धा चिटणीस. या चित्रपटातली ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’, ‘हसणार कधी, बोलणार कधी’ ही गीतेही लोकप्रिय झाली. ‘कशासाठी प्रेमासाठी?’, ‘माहेरची साडी’, ‘जसा बाप तशी पोरे’, ‘जिवलगा’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘कुंकू’, ‘चल गंमत करू’, ‘विश्वविनायक’, ‘पैंजण’, ‘लपंडाव’, ‘अवगत’, ‘एक क्रांतिवीर ः वासुदेव बळवंत फडके’, ‘रिंगा रिंगा’, ‘जेता’, ‘दुभंग’ हे अजिंक्य देव यांचे मराठीतले निवडक पण लक्षणीय चित्रपट. ‘माहेरची साडी’ या भावुक-कौटुंबिक, कमालीच्या लोकप्रिय चित्रपटातली अलका कुबल यांच्या भावाची भूमिका असो किंवा त्याहून अगदी वेगळ्या अशा राजकीय पार्श्वभूमीवरच्या ‘सरकारनामा’मधली सरकारी अधिकार्‍याची भूमिका असो - अजिंक्य यांनी सर्वच भूमिका ताकदीने साकारल्या.

अजिंक्य यांची भूमिका असलेला ‘वासुदेव बळवंत फडके’ हा चित्रपट हे रमेश देव यांचे स्वप्न होते. क्रांतिकारकाचा जीवनपट उलगडून दाखवणारा हा मराठीतला पहिलाच ऐतिहासिक चित्रपट. हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला. त्यासाठी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला. २०१० साली ‘जेता’ या चित्रपटाद्वारे अजिंक्य दिग्दर्शक आणि पटकथाकारही बनले. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली. एका वृद्धाचा यंत्रणेविरुद्धचा लढा यात केंद्रस्थानी आहे. नायकाची भूमिका रमेश देव यांनी साकारली. या चित्रपटाच्या माध्यमातून अजिंक्य यांना आई-वडिलांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात २४ वर्षांनंतर या तिघांनी पुन्हा एकत्र काम केले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा तसेच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही मिळाला.

अजिंक्य देव यांनी हिंदी चित्रपटातही मोजक्या पण लक्षात राहणार्‍या भूमिका केल्या. ‘संसार’, ‘कच्ची कली’, ‘सोने पे सुहागा’, ‘प्यासी निगाहे’, ‘परवाने’, ‘फूल और अंगार’, ‘पांडव’, ‘छोटासा घर’, ‘आन ः मेन ऍट वर्क’, ‘डेव्हीड’ हे त्यांचे हिंदी चित्रपट. याचबरोबर त्यांनी काही तेलगू चित्रपटात आणि ‘द पिकॉक स्प्रिंग’ या इंग्रजी दूरदर्शन चित्रपटातही काम केले आहे. ९० पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय करणार्‍या अजिंक्य देव यांनी रेणुका शहाणे यांच्यासह केलेली रवी राय यांची ‘सैलाब’ ही हिंदी मालिका अतिशय गाजली. ‘सैलाब’नंतर अजिंक्य यांच्याकडे भूमिकांचा ओघ सुरू झाला. ‘युनिट ९’ ही त्यांची गाजलेली मराठी मालिका. त्यांनी रेणुका शहाणे यांच्याबरोबर ‘अंतर’ नावाची टेलिफिल्मही केली आहे. मालिकांमधल्या आणि चित्रपट क्षेत्रातल्या या कारकिर्दीबरोबरच अजिंक्य देव यांनी ‘प्रभात एन्टरटेन्मेंट’ या दूरदर्शन वाहिनीचे संचालक म्हणूनही काही काळ काम केले. या वाहिनीच्या कामात अजिंक्य यांची पत्नी आरती यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता.

‘थोडं तुझं थोडं माझं’ हा अजिंक्य देव यांचा २०१३ मधील चित्रपट. अजिंक्य देव आणि देव कुटुंबीय यांनी विशेष मुलांसाठी मुंबईत सुरू केलेली ‘ऍकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ ही शाळा त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते.

'तानाजी', 'क्वीन ऑफ झाशी' ह्या हिंदी चित्रपटांमध्येही अजिंक्यने अभिनय केला आहे. 'जय भवानी जय शिवाजी' ह्या मालिकेत अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू देशपांडे ह्यांची भूमिका साकारली होती.

- स्वाती प्रभुमिराशी



चित्र-चरित्र