चित्र-चरित्र

निशिगंधा वाड
निशिगंधा वाड
अभिनेत्री
११ ऑक्टोबर १९६९

चित्रपटसृष्टीत अनेक विद्वानांनी आपल्या अभिनयाचे नाणे वाजवून पाहिले. त्यांनी जसे इतर क्षेत्रात आपले नाव कमावले, तसेच चुकून, अपघाताने, अनवधानाने येऊन या क्षेत्रात आपली छाप पाडलीच. त्यातीलच एक नाव म्हणजे निशिगंधा वाड.

निशिगंधा वाड या लेखिका विजया वाड आणि डॉ. विजय वाड यांच्या कन्या असून त्यांची बहीण प्राजक्ता डॉक्टर आहेत. सुसंस्कारित व कुठलाही अहं नसलेल्या निशिगंधा यांनी आईच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, वयाच्या ५-६व्या वर्षापासूनच आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवायला सुरुवात केली. त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती, म्हणून इयत्ता दुसरीत असताना त्यांनी शालेय पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमातून काम करायला सुरुवात केली. शाळेतील नाटकात बक्षीस मिळवून त्याची पोचपावतीही सर्वांना दिली. सहावीत असताना त्यांना शासनाच्या सांस्कृतिक विभागाद्वारे राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी पुढे पी.एचडी.पर्यंतच्या आपल्या अभ्यासात त्या शिष्यवृत्तीचे सोने केले. दहावीच्या परीक्षेत त्या बोर्डात ४४ व्या, तर बारावीच्या परीक्षेत बोर्डात तिसर्‍या आल्या होत्या.

घरात साहित्यिक वातावरण आणि सामाजिक पातळीवर आईची भरारी असताना निशिगंधा यांनीही त्या-त्या वयात शोभेल असाच आपल्या आनुवंशिकतेचा ठसा उठवला. म्हणूनच विजया वाड यांनी त्यांना सुलभा देशपांडे यांच्या नाट्यशिबिरात पाठवून त्यांच्या कलेला जोपासण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात भाग घेतल्यामुळे ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातील भूमिका सहजच त्यांच्या वाट्याला आली. नववीत असताना त्यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते अमोल पालेकर यांच्या ‘मुखवटा’ या नाटकात काम केले. तर दहावीत असताना त्यांना ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘मोरूची मावशी’ आदी व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ११वीत व १२ वीत असताना त्यांना चंद्रलेखाच्या ‘असं घडलं कसं’ या नाटकात भूमिका मिळाली. याच दरम्यान त्यांना व्यावसायिक नाटकासोबत दूरदर्शन मालिकाही मिळू लागल्या होत्या. जयवंत दळवी लिखित ‘आव्हान’ ही त्यांची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे निशिगंधा वाड सर्वसामान्य लोकांच्या घराघरात पोहोचल्या, त्यांना खर्‍या अर्थाने नावलौकिक मिळाला. त्यांनी पुढे ‘बंदिनी’, ‘हद्दपार’ आदी २७ मराठी मालिका, तर ‘दास्तान’, ‘विराट’ आदी २१ हिंदी मालिका केल्या. अशी कामे करता करता बी.ए.ला असताना ‘कुणीतरी आहे तिथं’ या नाटकात सर्वप्रथम नायिकेची भूमिका त्यांच्या वाट्याला आली. या नाटकाचे १२१ प्रयोग हाऊसङ्गुल्ल झाले होते.

सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकापेक्षा एक’ हा निशिगंधा वाड यांनी अभिनय केलेला पहिला मराठी चित्रपट होता. यात अशोक सराङ्ग त्यांचे नायक होते. येता-जाता नवर्‍याला वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणारी पत्नी त्यांनी यात साकारली होती. ‘शेजारी शेजारी’ (१९९०) या चित्रपटामध्ये त्यांनी अशोक सराङ्ग यांच्यासोबत पुन्हा एकदा काम केले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगावकर हे कलाकारदेखील या चित्रपटात होते. यातही त्यांची भूमिका एका पत्नीचीच होती. शेजार्‍याच्या मदतीसाठी धावणारी, पतीलाही मदतीसाठी पाठवून नंतर पश्चात्तापदग्ध होणारी विनोदी भूमिका त्यांनी या चित्रपटात रंगवली. ‘वाजवा रे वाजवा’ (१९९२) मध्ये त्यांनी महाविद्यालयीन मुलीची भूमिका साकारली. यात त्यांच्यासोबत प्रशांत दामले होते, तर त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत सतीश शहा आणि सासर्‍याच्या भूमिकेत अशोक सराङ्ग यांनी कामे केली होती. १९९३ मध्ये आलेल्या ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली होती. याच चित्रपटात त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला. दीपक देऊळकर यांच्यासोबत त्यांचे सूर जुळले. त्यानंतर १९९५ मध्ये आलेल्या ‘शिवरायांची सून’ या ऐतिहासिक चित्रपटातही त्यांनी भूमिका केली. ‘सासर-माहेर’ या चित्रपटामध्ये निशिगंधा वाड यांनी साकारलेली भूमिका विशेष लक्षणीय ठरली. त्यांनी केलेले अनेक चित्रपट नायिकाप्रधान असून त्यांनी त्यात तडङ्गदार स्त्रीची भूमिकाच प्रामुख्याने साकारली, त्यातून त्यांचा भूमिका निवडीमागचा उद्देश सहजपणे स्पष्ट होतो.

मोजकेच चित्रपट करून मराठी चित्रपटसृष्टीला दखल घ्यायला भाग पाडणार्‍या या नायिकेने हिंदी चित्रपटांतही चरित्रभूमिका साकारल्या आहेत. ‘सलीम लंगडे पे मत रो’ (१९९०), ‘कर्म योद्धा’ (१९९२), ‘तुम को ना भूल पाएंगे’ (२००२), ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ (२००२) या हिंदी चित्रपटांतही त्या दिसल्या.

आईकडून लेखनाचे बाळकडू मिळालेल्या निशिगंधा वाड यांनी ‘समाजातील स्त्रीची बदलती भूमिका आणि ब्रिटिश व मराठी नाटकात त्याचे पडलेेले प्रतिबिंब’ यावर मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आहे. एकीकडे ‘चारचौघी’ या अंकाच्या पाहुण्या संपादकाच्या भूमिकेत त्या वावरल्या, तर दुसरीकडे ‘इवलूं टिवलूं’ या त्यांच्या बालगीतांच्या संग्रहास शासनाचे १९८४ चे पारितोषिक लाभले. ‘ङ्गुलपंखी’ या त्यांच्या पुस्तकासही उत्तम साहित्याचे १९९१ चे शासनाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. ‘अनुष्का’ या काव्यसंग्रहासही शासनाचा १९९३ सालचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.

याच बरोबरीने निशिगंधा वाड यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर निबंधवाचन केलेले आहे. तर कोलंबो विद्यापीठाने त्यांना २०१३ मध्ये ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानांमुळे डी.लिट. ही पदवी देऊन त्यांच्या कामाचा उचित गौरव केलेला आहे. चतुरस्र व्यक्तिमत्त्व असणार्‍या निशिगंधा वाड या सामाजिक कार्यही तितक्याच तळमळीने करतात. त्यासाठी त्यांनी गरीब मुलींसाठी संस्था स्थापन केलेली आहे.

- शारदा गांगुर्डे
संदर्भ १) प्रत्यक्ष मुलाखत.

'राडा', 'आश्चर्य' (मराठी) तसेच 'रेस ३' (हिंदी) हे निशीगंधा वाड यांचे अलीकडचे चित्रपट आहेत.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र